लेख : प्लॅस्टिकला पायबंद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी 

एकेकाळी माणसाला वरदान वाटलेले प्लॅस्टिक आता जगभरच्या पर्यावरणासाठी महाशाप ठरत आहे. 1950 पासून वाढता वाढता वाढत गेलेल्या प्लॅस्टिकच्या भस्मासुराने आता एकूणच सजीव सृष्टीच्या डोक्यावर विनाशाचा दबाव टाकायला सुरुवात केली आहे.

साठेक वर्षांपूर्वी आपल्याकडे प्लॅस्टिकचा वापर अगदी नगण्य होता. घरात वापरले जाणारे धान्य साठवण्याचे डबे पत्र्याचे तर बरण्या काचेच्या, चिनी मातीच्या असायच्या. घमेली, बादल्या अशा गोष्टी जाड लोखंडी किंवा गॅल्व्हनाइज्ड पत्र्यापासून बनलेल्या असायच्या. या काळातली खेळणीसुद्धा पत्र्याची किंवा लाकडाची असायची. प्लॅस्टिकचे फर्निचर वगैरे फारच दूरची गोष्ट. भाजीसाठीच्या पिशव्या  कापडीच असायच्या. अगदी क्वचित मेणकापडाच्या पिशव्या आणि टेबल क्लॉथचा वापर व्हायचा. ते टिकाऊ असायचे.

जगात सतराव्या आणि अठराव्या शतकात औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ पाश्चात्त्य राष्ट्रांत रोवली गेली आणि यंत्रयुगाच्या आरंभी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा खूप बोलबाला झाला. कालांतराने रासायनिक प्रयोगांमध्ये यश प्राप्त होऊ लागल्यावर केमिकल टेक्नॉलॉजी किंवा रासायनिक तंत्रज्ञानाचा विकास होत असताना अनेक विस्मयकारी उत्पादने जगात अवतरली. त्यातलेच एक प्लॅस्टिक.

‘प्लॅस्टिकॉस’ या मूळ ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थ आहे सहज साच्यात बसवता येणारा किंवा ‘मोल्ड’ होणारा पदार्थ, सिंथेटिक प्लॅस्टिक तसेच होते. आजच्या आधुनिक प्लॅस्टिकचा जनक मानला जातो इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील संशोधन अलेक्झांडर पार्केस. आज त्याच्या नावे लंडनमधील बर्मिंगहॅम येथे ‘प्लॅस्टिकचा जनक’ असे नोंदलेली ‘ब्लू फ्लेक्स’ (नील–फलक) आहे. 1813 ते 1890 या कालखंडातील पार्केसने ‘पार्केसाइन’ हा प्लॅस्टिकचा पहिला–वहिला प्रकार शोधून काढला. आपण संशोधित केलेल्या या वस्तूची कालांतराने प्रतिसृष्टी तयार होऊन माणसाचे अवघे जीवन व्यापेल आणि नंतर त्याच्या अस्तित्वालाच प्रदूषणाचे ग्रहण लावेल याची पार्केस यांना त्यावेळी काय कल्पना असणार! परंतु पॉलिस प्लॅस्टिकने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अशी काही प्रगती केली की, अनेक वस्तू प्लॅस्टिकपासून बनवण्याची सोय झाली. 1950 मध्ये आलेल्या प्लॅस्टिकच्या भांडय़ांनी इंग्लंडमधले लोकही चकित झाले होते. मग 1960 नंतरच्या काळात आपल्याकडे कोणी ‘प्लॅस्टिक’ची बादली आणली तर किती कौतुक व्हायचे! न गंजणारे, डागडुजीची गरज नसलेले, पत्रा लागून गॅन्गरिन होते अशा संकटांपासून वाचवणारे, त्यातही ‘स्वस्त नि मस्त’ म्हणून प्लॅस्टिक जगाने आनंदाने स्वीकारले.

सगळ्या जगात प्लॅस्टिकने यथावकाश हातपाय पसरले. यंत्रामध्ये प्लॅस्टिकची दातेरी चाके आली. एखाद्या वस्तूचे नाव घ्या आणि त्यात प्लॅस्टिकचा अंश नाही असे क्वचितच होऊ लागले. प्लॅस्टिकचे रेनकोट, भांडी, फर्निचर, टीव्ही, रेडिओ कॅबिनेट… किती सांगावे! प्लॅस्टिकचा महिमा सर्वदूर पसरला. रेडिओची कॅबिनेट पूर्वी लाकडाची असायची याचा तर विसरच पडला. असे अनेक गोष्टींबाबत झाले. दुधाच्या काचेच्या बाटल्या आणि पितळी किंवा स्टीलच्या बरण्या जाऊन ‘पिशव्या’ आल्या तेव्हा आश्चर्याने घरात झालेली चर्चा आजही आठवते.

थोडक्यात, प्लॅस्टिक सर्वव्यापी झाले. त्याचे वरदान सुखावह वाटू लागत असतानाच अर्ध्या शतकातच त्याचे दुष्परिणामही जाणवू लागले. मोडके–तोडके, वापरून निकामी झालेले प्लॅस्टिक टाकायचे कुठे? हा प्रश्न निर्माण झाला. नित्याच्या सवयीने लोक ते ‘कचऱ्या’त टाकू लागले. प्लॅस्टिक अवतरण्यापूर्वी जगातला कचरा नाशिवंत म्हणजे बायोडिग्रेडेबल होता. खोके कागदी वेष्टने, पानांच्या पत्रावळी, लाकडी वस्तू खराब झाल्यावर टाकून दिल्या तरी त्या कालांतराने मातीत मिसळून जात असत. प्लॅस्टिक मात्र ‘आत्म्यानंतरची अमर गोष्ट’ असल्याचे गंमतीने म्हटले जाते ते खरेच आहे.

वर्षानुवर्षे प्लॅस्टिकचा कचरा तसाच राहतो. गेल्या अर्धशतकात जगाची लोकसंख्याही अफाट वाढली, तसा प्लॅस्टिकचा वापरही वाढला. आता त्यावर अंकुश आणावा लागेल असे आपल्या प्रधानमंत्र्यांनीही स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात सांगितले. महाराष्ट्राने प्लॅस्टिकबंदीचे पाऊल आधीच उचललेय, पण त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायची असेल तर दूध, तेल आणि अशा काही गोष्टींसाठी किफायतशीर पर्याय कसे उपलब्ध होतील आणि जनजागृतीतून ही मोहीम कशी यशस्वी होईल याची कालबद्ध, सूत्रबद्ध योजना टप्प्याटप्प्याने अमलात आणली पाहिजे. उद्याचे जग स्वच्छ नि प्रदूषणमुक्त ठेवायचे असेल, माणसाबरोबरच प्राणी, वनस्पती आणि सागरी जीवनाचे रक्षण, संवर्धन करायचे असेल तर प्लॅस्टिकासुराला आवर घालणे गरजेचे आहे. हिमालयातील सर्वोच्च शिखरापासून ते पॅसिफिक महासागरातल्या सर्वात खोल ‘चॅलेंजर डीप’ या जागेपर्यंत सर्वत्र प्लॅस्टिकचा कचरा आढळतोय ही चिंतेची गोष्ट आहे. सकारात्मक चिंतनानेच ही चिंता दूर होऊ शकेल.

 [email protected]