
>> डॉ. प्रीतम भि. गेडाम
पुस्तके मानवाचे चांगले मित्र असतात आणि ते जीवनाच्या शेवटपर्यंत साथ देतात. आजच्या युगात तर ग्रंथालयाचे महत्त्व फार वाढले आहे. सार्वजनिक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालय, व्यावसायिक ग्रंथालय अशा प्रकारे ग्रंथालय समाजात आढळतात. पारंपरिक ग्रंथालयापासून आजच्या ऑटोमेशन, यांत्रिकी, डिजिटल व व्हर्च्युअल ग्रंथालयापर्यंत विकास झालेला आहे. आजच्या वेळेला वाचकांची गरज ओळखून योग्य वेळेत ती सेवा पूर्ण करणे हेच ग्रंथालयाचे मुख्य ध्येय आहे. डॉ. एस. आर. रंगनाथन यांना हिंदुस्थानमधील ग्रंथालय शास्त्राचे जनक मानले जाते. यांचा वाढदिवस देशात ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ग्रंथालयाचा प्रत्येक विभागावर डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी खूप बारकाईने काम करून अतुलनीय योगदान दिले आहे आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी सांगितलेले ग्रंथालयशास्त्राचे पाच नियम (लॉ) ग्रंथालयात प्रत्यक्षात योग्यपणे उतरवणे हीच डॉ. एस. आर. रंगनाथन यांना सर्वोत्तम मानवंदना ही ठरेल.
आज आपल्याला समाजातील प्रत्येक क्षेत्रात ग्रंथालय आढळतात. ‘गाव तिथे ग्रंथालय’ हा संदेश देण्यात आला आहे. सार्वजनिक, शैक्षणिक, शासकीय, विशेष असे ग्रंथालय आहेत. ग्रंथालयाचे स्वरूप हे काळाप्रमाणे आणखी समृद्ध व सोयिस्कर होणे फार गरजेचे आहे. ग्रंथालय माहितीचे प्रमुख केंद्र आहे आणि अशा केंद्राला सतत विकसित व्हायलाच हवे तेव्हाच ग्रंथालयाचा उद्देश पूर्ण होईल. पण वास्तविक स्थिती अशी वाटत नाही. कारण ग्रंथालयात कुशल कर्मचारीवर्गाची उणीव दिसून येते. मोठय़ा संख्येने विद्यापीठात व महाविद्यालयात ग्रंथपालाचा व संबंधित कर्मचारीवर्गाच्या जागा रिक्त आहेत. दरवर्षी पुष्कळसे ग्रंथपाल सेवानिवृत्त होत असल्याने यात आणखी वाढच होत आहे. तसेच अनुदानित शाळेतही हजारोंच्या संख्येत ग्रंथालयीन कर्मचारीवर्गाच्या जागा खाली पडल्या आहेत. स्थानिक प्रशासन, महानगरपालिकाद्वारे संचालित ग्रंथालयांत ही अशीच वाईट परिस्थिती आहे. कित्येक ग्रंथालये तर कंत्राटी पद्धती व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्गाच्या भरवशावर चालत आहेत. मग अशा ठिकाणी डॉ. एस. आर. रंगनाथनचे पंचसूत्री नियमांचे पालन कोणत्या प्रकारे केले जात असावे? दुर्गम भागातील ग्रंथालयांची स्थिती तर फारच वाईट आहे. अशा समस्येमुळेच ग्रंथालयशास्त्र विषयाच्या तज्ञ शिक्षित तरुणांमधे मोठय़ा प्रमाणात बेकारी वाढतच आहे व मजुरांपेक्षाही कमी पगारावर काम करायला लाचार आहेत.
एकीकडे आपण आधुनिक व माहितीच्या काळात वावरण्याचा गोष्टी करतो. सोबत जागतिक स्तराचा शिक्षण व्यवस्थेकडे वाटचाल करायला प्रयत्नशील आहोत व दुसरीकडे शिक्षणाचा प्रमुख आधार म्हणजे ग्रंथालय व ग्रंथालयांचीच अशी खराब स्थिती असेल तर आपण कोणत्या आधुनिक काळाकडे विकसित होत आहोत? एक सरळ गोष्ट आहे की, कोणताही विभाग तेव्हाच यशस्वीरीत्या चालू शकतो जेव्हा तिथे त्या विषयाचा तज्ञ व्यक्ती कार्यशील असेल, नाही तर सर्व व्यर्थ. विदेशात तर अत्याधुनिक ग्रंथालयांचे जाळे पसरले आहे. माफक दरात ग्रंथालयीन सेवा प्रत्येक घराघरात व मानवांपर्यंत पोहोचल्या आहेत व मोठय़ा प्रमाणात निधी ग्रंथालयांवर खर्च केला जातो त्यामानाने आपण कुठे आहोत?
ग्रंथालयाच्या विकासाकरिता शासनाने नियम बनविले आहेत व वेळेप्रमाणे त्यांचा विकास व्हायला हवा, पण जास्त तर ग्रंथालयांची स्थिती समाधानकारक वाटत नाही. कित्येक मोठमोठय़ा संस्था, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये व इतर ग्रंथालयांत अद्ययावत साहित्य, आधुनिक सेवासुविधा व संसाधनांचा वापर आढळतच नाही आणि याचे मुख्य कारण आहे अपर्याप्त निधी. अनुदानित सार्वजनिक ग्रंथालयाचे निधी वाढायला हवे तसेच तेथील कर्मचारी वर्गाचेदेखील वेतन फारच कमी आहे त्यातही सुधारणा व्हावी. आजच्या महागडय़ा काळात कित्येक ग्रंथालय निधीच्या कमतरतेमुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करीत आहेत. योग्य सुविधांअभावी लाखो दुर्मिळ ग्रंथ नष्ट होत आहेत.
ग्रंथालयांचे महत्त्व न कळणे, बजेटची कमी, लोकांमधे जनजागृतेची कमी व संस्थापक व प्रशासकीय अधिकाऱयांद्वारे उपेक्षा, दुर्लक्ष, योग्य व्यवस्थापनाची कमी, कौशल्यपूर्ण कर्मचाऱयांची कमी व इतर गोष्टींमुळे हिंदुस्थानात ग्रंथालयाची स्थिती आजही समाधानकारक नाही. ग्रंथालयांना त्वरित हायटेक बनविणे अत्यंत गरजेचे आहे. इलेक्ट्रॉनिक ग्रंथालय, नेटवर्किंग, ऑनलाइन सेवा, यांत्रिकी संसाधन, उच्चशिक्षित तज्ञ कर्मचारी, कौशल्य प्रशिक्षण, योग्य प्रबंधन, बजेट, चांगले प्रशासन, योग्य वाचनसाहित्य इत्यादी गोष्टींकडे विशेष लक्ष देऊन ग्रंथालयाचा विकासाकडे जलदगतीने धाव घ्यायलाच पाहिजे. सुशिक्षित समाजाचे विकास होईल तरच देशाचा विकास होईल.































































