
>> दिलीप जोशी
गेल्या वर्षी होळीच्या सुमारासच ‘कोरोना’ची चाहूल लागली आणि ‘रंग’ उडवण्यावर निर्बंध आले. वर्षभराने परिस्थिती बदलेल आणि यंदाची होळी शतरंगात रंगेत असं वाटलं होतं, पण कोविड-कोरोनाच भीतीचे निरनिराळे रंगढंग दाखवतोय. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर या त्रिसूत्रीचं अजून तरी पालन करावंच लागणार, परंतु होळीच्या रंगांची उधळण मनात करायला काय हरकत आहे? आणि यासाठी अनेक कथा, कविता, गाणी आपल्याकडे आहेत.
पूर्वी राजेरजवाडय़ांच्या काळात राजमहालात या रंगपंचमीचा जल्लोष जास्त असायचा. राजस्थानातील एका उंच राजवाडय़ात रंग भरण्याचे प्रचंड दगडी पाट किंवा नाले (चॅनल) आणि त्यांच्या कलात्मक तोटय़ा उघडल्या की खाली जमलेल्या जमावावर विविध रंगांच्या धारा कोसळतील अशी राजस्थानातल्या ‘डिग पॅलेस’मध्ये व्यवस्था होती. तिथल्या रंगमंचमीच्या सोहळय़ाची विश्वास भट यांनी टिपलेली छायाचित्रं वैशिष्टय़पूर्ण आहेत. रंगपंचमीतील ही रंगत होळीनंतरच्या पंचमीच्या दिवशी जनसामान्यही सतत अनुभवत असतात. त्यात पंडित नेहरूंसारखे लोकप्रिय नेते गुलाल उधळत सामील होत असत. मुंबईत चेंबूरच्या राज कपूर यांच्या आर. के. स्टुडिओजच्या रंगीत पाण्याच्या हौदात डुंबायला आणि रंग खेळायला अवघी चित्रपटसृष्टी यायची. ‘रंग खेळणे’ असाच पारंपरिक शब्दप्रयोग आहे. पूर्वीचे रंग म्हणजे गुलाल किंवा वनस्पतीजन्यच असायचे. पिचकाऱयाही बांबूपासून बनवत. सारंच पर्यावरणस्नेही होतं. नंतर सगळय़ाला कृत्रिमतेचं ग्रहण लागलं आणि त्याचा त्रासही अनेकांना होऊ लागला, पण काळजी घेऊन रंग खेळण्यातली मजा काही औरच. उत्तर हिंदुस्थानात तर ‘बुरा न मानो होली है’च्या नावाखाली भरपूर चेष्टामस्करी चालायची. त्यातले अचकट विचकट प्रकार सोडले तर बाकी उत्साही जल्लोष असायचा. तसाच तो आपल्याकडेही दिसायचा. फक्त आपल्याकडे होळीच्या दुसऱया दिवसाला धुलीवंदन म्हणतात. त्याच दिवशी सार्वत्रिक सुट्टी असल्याने त्याचं रूपांतर रंगपंचमीत (खरं तर रंग प्रतिपदा) झालं. हे व्यावहारिक सोयीने केलेलं परिवर्तन सर्वांनी स्वीकारलं. कारण पौर्णिमेनंतरच्या पंचमीला पुन्हा सुट्टी मिळणं कठीण म्हणून हा पारंपरिक पाच दिवसांचा सण दोन दिवसांत आटोपता घेतला गेला. वेगवान जीवन पद्धतीचा हा अपरिहार्य भाग असतो.
आपल्या नाटकात, मराठी-हिंदी चित्रपटांत मात्र अगदी पूर्वीपासून रंग खेळण्याची दृश्ये येतच असतात. त्याची गाणीही छान असतात. पूर्वीचं साधारण सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीचं एक गाणं आमची आजी म्हणायची ‘नको रे कृष्णा रंग उडवू चुनरी भिजते, रात्री चांदण्यात थंडी वाजते’ या गाण्याची रेकॉर्डही होती. रंगाचा खेळ म्हणजे गोपी कृष्ण असायचेच. शांतारामबापूंच्या ‘नवरंग’ चित्रपटात ‘अरे जा रे हट नटखट’ हे गाणं रंगाच्या खेळाचं चित्रण करणारं आणि सी. रामचंद्र यांच्या मधुर संगीताने नटलेले आहे. याशिवाय मराठी चित्रपटातील ‘सख्या चला बागामधी रंग खेळू चला’पासून ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ किंवा ‘अगं नाच नाच नाच राधे उडवूया रंग’ अशी किती तरी गाणी वेळोवेळी येत राहिली. सिनेमाचा पडदा रंगीत होण्याआधीपासून रंगांची उधळण त्यावर दाखवली गेली आणि ती ‘ब्लॅक ऍण्ड व्हाईट’ ‘रंग’पंचमीही रसिकांनी मनात रंगवून पाहिली. ‘रंग बरसे भिगे चुनरवाली रंग बरसे’ या अमिताभच्या आवाजातील गाण्याने लोकप्रियता मिळवली तसंच ‘शोले’सारख्या ‘दे मार’ चित्रपटातही रंगपंचमीचा ‘सीन’ असणं लेखक-दिग्दर्शकांना आवश्यक वाटलं. ‘होली के दिन दिल खिल जाते है, रंगों में रंग मिल जाते है’ या गाण्याची धूनही बराच काळ वाजत राहिली. ‘आज हम ना छोडेंगे’ हे राजेश खन्नाचं होळी गीत किंवा अगदी पारंपरिक ब्रज धून असलेलं आणि चक्क मेहमूदवर चित्रित झालेलं ‘होली खेलत नंदलाल’ हे कृष्णधवल गाणं गमतीशीर आहे किंवा अगदी 1953 मधल्या ‘राही’ चित्रपटातलं देव आनंद आणि नलिनी जयवंत यांचं ‘मॉब सीन’ असलेलं गाणंही ‘होली खेले नंदलाला बिरज में’ असं आहे. ‘कोहिनूर’मधलं दिलीपकुमार आणि मीनाकुमारी यांचं ‘तन रंग लो जी आज मन रंगलो’ या गाण्याचं नौशाद यांचे अप्रतिम संगीत आणि लता-रफी यांचा सुरेल स्वर रंगपंचमीच्या वातावरणात घेऊन जातो.
‘रानी रूपमती’ चित्रपटात ‘बाट चलत नयी चुनरी रंग डाली’ हे युगुल गीत रफी आणि बालगंधर्वांबरोबर काम केलेले कृष्णराव चोणकर यांनी गायलं आहे. त्यात गुरूचा स्वर कृष्णरावांचा आणि शिष्याचा (भारत भूषण) महंमद रफी यांचा आहे. पस्तीस एक वर्षांपूर्वी एका संगीत कार्यक्रमात वृद्ध कृष्णराव चोणकरांची अचानक भेट झाली तेव्हा या गाण्याचा उल्लेख करताच ते म्हणाले, ‘आठवतं तुम्हाला ते?’
होळीची म्हणजे रंगपंचमीची बरीचशी गाणी श्रीकृष्णाशी निगडित आहेत. काही गाणी मात्र लोकगीतात येतात. ‘रंग बरसे’ या ‘सिलसिला’मधल्या गाण्यात तर ‘चांदी के थाली में जोना परोसा’ असं आहे आणि मराठीत ‘जेवण’ म्हणतो ते भोजपुरीत ‘जोना’ असं आहे. हे भाषिक नातं शोधलं तर गंमत वाटते. आधी म्हटलं तर रंग खेळाची बहुतेक गाणी कृष्णाची असली तरी अमिताभच्याच आवाजातलं ‘बागबान’ चित्रपटातलं गाणं मात्र ‘होली खेळत रघुवीरा अवध में’ हे गाणं श्रीरामाचं वर्णन करतं. असे हे हिंदुस्थानी उत्सवी परंपरेचे शाब्दिक रंग आणि त्यांना लाभलेल्या सुरावटीच्या रंगांमधून अनेक वर्षे रसिकांचं रंजन होतंय एवढं खरं.






























































