रावसाहेब सहस्रबुद्धे

81

>> विवेक दिगंबर वैद्य

सर्वसामान्यांमध्ये ‘कुतूहल’ निर्माण करणाऱया श्रीरावसाहेब अर्थात श्रीबाबामहाराज सहस्रबुद्धे यांच्याविषयीचा हा लेख.

श्री बीडकर महाराजांविषयी रावसाहेबांना पराकोटीची गुरूभक्ती होती. ‘सर्वत्र गुरू आहे आणि गुरूच सर्व काही करतो’ अशी त्यांची दृढ भावना होती. रावसाहेबांकडे येणार्या प्रत्येक भक्ताला ते ‘प्रथम श्री बीडकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्या आणि त्या नंतरच इथे या’ असे स्पष्टपणे सांगत असत. कुण्या भक्ताने आज्ञाभंग केल्यास रावसाहेब त्याच्या सोबत बोलत नसत हे ज्ञात असल्यामुळे रावसाहेबांकडे येणारी मंडळी सर्वप्रथम श्री बीडकर मठामध्ये जात असत. एरवी रावसाहेब घराबाहेर क्वचितच जात असले तरीदेखील श्री बीडकर मठांतील उत्सवास संपूर्ण दिवस उपस्थित राहत असत. इतकेच नाही तर त्यांच्याकडे येणाऱया मंडळींनाही उत्सवप्रसंगी मठामध्ये सेवा करण्यास सांगत असत शिवाय त्यांच्या हातून योग्य तशी सेवा होते अथवा नाही याविषयी बारकाईने निरीक्षण करीत.

श्रीगुरूंविषयी रावसाहेबांचे हृदय प्रेमाने ओथंबलेले होते तसेच गुरूबंधू-भगिनींसोबतचे त्यांचे वागणे-बोलणेदेखील नम्रतापूर्वक व प्रेमळ असे. रावसाहेबांचे समग्र जीवन गुरूमय होते. लौकिक आयुष्याचा प्रत्येक निर्णय त्यांनी गुरूआज्ञेनुसार घेतला. जन्मापासून विरक्तीशी साथ सोबत करणारे रावसाहेब इतरांना वरकरणी संसारी, प्रापंचिक गृहस्थ वाटत असले तरीही अंतर्यामी ते कमालीचे विरक्त होते. त्यांचा प्रपंच नाममात्र होता. वंदनभक्ती केवळ त्यांच्यासाठी स्थायी वृत्ती नव्हती तर त्यांच्या निरहंकारित्वाचे ते सोज्वळ रूप होते. श्रीगुरूंविषयीची लीनता रावसाहेबांमध्ये इतकी भिनलेली होती की श्री बीडकर मठात जेव्हा त्यांचे जाणे होत असे तेव्हा रावसाहेब पहिल्या पायरीपासून नमस्कार घालण्यास प्रारंभ करीत असत. श्रीगुरूसमाधीची सेवा करणाऱया आचारी, पाणकी अन् सेवेकऱयांना ते भावुकपणे नमस्कार करीत असत. श्रीगुरूंच्या दर्शनार्थ येणाऱया लहानग्या लेकरांच्या पायावरदेखील ते अपार कृतज्ञतेने मस्तक ठेवीत असत. त्यांच्याठायी अहंकाराचा लवलेशही नव्हता. सहजस्थिती अंगी बाणलेल्या रावसाहेबांच्या हातून घडणाऱया प्रत्येक क्रिया अकृत्रिमतेने व लीलया होत असे.
रावसाहेबांकडे येणाऱया प्रत्येकाला वासना व अहंकार यांचा त्याग करणे क्रमप्राप्त होते. थोडादेखील अहंकार त्यांना सहन होत नसे. ‘सहज बोलणे हाचि उपदेश’ या संतोक्तीनुसार रावसाहेब, समोर आलेल्या व्यक्तीसोबत जे उपदेशपर बोलत ते इतके प्रभावी असे की त्या कुणालाही रावसाहेबांच्या बोलण्याविरुद्ध वागण्याची हिंमत होत नसे, उलट योग्य वागल्यास चांगला परिणाम अनुभवावयास मिळत असे. रावसाहेबांठायी सुप्तावस्थेत असलेल्या असामान्यत्वाची, देवत्वाची प्रचीती व अनुभूती येऊ लागल्याने त्यांच्यापाशी येणाऱयांची संख्या वाढती झाली. त्यातही अखेरपर्यंत रावसाहेबांच्या सेवेत राहिलेल्या नरहरी भानुदास काळे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. श्रीबीडकर महाराजांचे चरित्र वाचून त्यांच्या समाधीमठात दर्शनास येणारे न. भा. काळे पुढे सन 1936 पासून रावसाहेबांच्या भक्तीकडे आकृष्ट झाले. जोशी-लोखंडे छापखान्यात नोकरीस असलेले न. भा. काळे कामावर जाता-येताना नित्यनेमाने दररोज रावसाहेबांकडे जात असत. त्यांना काय हवे-नको याची चौकशी करणे, त्यांची खोली स्वच्छ करणे, निगा राखणे आदी कामे सेवावृत्तीने करीत असत.
एकदा न. भा. काळे टायफॉइडने बेजार झाले. तापाने बेहोश झालेले काळे सलग दोन महिने रजेवर असल्याची माहिती रावसाहेबांना एका भक्ताने सांगितली तेव्हा ते ताडकन उठले आणि काळे यांच्या घरी आले. काळेंना अंथरुणात निपचित पडल्याचे पाहून रावसाहेबांनी काळे यांच्या सर्वांगाला भस्म चोळले त्या सरशी अंगातला ताप झपाटय़ाने कमी झाला. अल्पावधीतच न. भा. काळे खडखडीत बरे झाले हे पाहून त्यांचा उपचार करणारे डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. या काळात रावसाहेब औषधोपचाराकरिता काळे यांना पैसे पाठवीत असत. सदैव स्वरूपानुसंधानात मग्न राहणारे रावसाहेब अंतर्यामी, निजभक्तांकरिता जागरूक असत. पत्नीच्या निधनानंतर रावसाहेबांना त्यांचे काही निवडक भक्त दरवर्षी तीर्थयात्रेसाठी घेऊन जाऊ लागले. सन 1946 ते 1953 या कालावधीत दरवर्षी अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर, कोल्हापूर, नृसिंहंवाडी , भीमाशंकर, बेळगाव, मंत्रालय, गिरिबालाजी, मदुरा, रामेश्वर, नागरकोईल, त्रिवेंद्रम, गोकर्ण, महाबळेश्वर, कन्याकुमारी, शुचिद्रम या व अशा अनेकविध लहान-मोठय़ा पुण्यस्थळांची यात्रा रावसाहेबांच्या सान्निध्यात व सहवासात करण्याचे सद्भाग्य यातील काही भक्तमंडळींना वेळोवेळी लाभले.

यात्रेदरम्यान रावसाहेबांच्या हातून अनेक अतर्क्य व अलौकिक लीला घडल्या. अनेक भक्तांना यांच्या इष्टदेवतांचे दर्शन झाले. अनेक अद्भुत चमत्कारही घडले. जे जन्म व मृत्यू यांच्यावर सामर्थ्य व अधिकार गाजवतात अशा आध्यात्मिकदृष्टय़ा सर्वोच्च पातळी गाठलेल्या सिद्धसत्पुरुषांमध्ये रावसाहेब सहस्रबुद्धे हे महत्त्वाचे नाव आहे. गाणगापूर यात्रेत श्री. रा. देशपांडे यांच्या मातोश्रीस रावसाहेबांनी आयुष्यदान दिले अन् त्यांचा मृत्यू टळला. रावसाहेबांच्या कृपाशीर्वादाने कुणाच्या जिवावरचे संकट गेले, कुणाचे गंडांतर टळले, कुणी अवघड परीक्षेत उत्तीर्ण झाला, कुणाचे लग्न ठरले तर कुणाला नोकरी मिळाली असे एक ना अनेक शेकडो विलक्षण अनुभव रावसाहेबांच्या सहवासात येणाऱया भक्तांना नित्य प्राप्त झाले. जे कार्य परमेश्वरालाही करणे शक्य नाही ते कार्य सद्गुरू व संतसत्पुरुष करून दाखवितात आणि असे अशक्यासही शक्य करणारे शेकडो प्रसंग रावसाहेबांच्या श्री. रा. देशपांडे लिखित चरित्रग्रंथामध्ये नमूद केले आहेत. रावसाहेब त्यांच्या भक्तांना तत्कालीन संतसत्पुरुषांच्या दर्शनास आवर्जून पाठवीत असत. श्रीशंकर महाराज, श्रीगद्रूदेव रानडे, केडगावचे श्रीनारायण महाराज, श्रीमेहेरबाबा आदी सत्पुरुष रावसाहेबांच्या भेटीस येत असत. सोनगीरचे श्रीकेशवदत्त महाराज प्रतिवर्षी रावसाहेबांच्या दर्शनास येत असत आणि सर्वत्रांस ‘रावसाहेब हे ‘पूर्णब्रह्म’ आहेत’ असे आवर्जून सांगत असत.

श्रावण वद्य चतुर्थी. मंगळवार. अंगारकीचा योग साधून रावसाहेब रात्री 11.30 च्या सुमारास अनंतात विलीन झाले, श्रीवासुदेवानंत या नामाभिधानाने स्थिर झाले. रावसाहेब देहाने नसले तरीदेखील प्रचितीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. रावसाहेब ही सांगण्या-उमगण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे हे त्यांचे चरित्र वाचल्यावर समजते. ज्याला रावसाहेब समजले, तो ‘भाग्यवान’ समजावा.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या