चला वाचूया, स्वतःला घडवूया!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आकाश दीपक महालपुरे

वाचाल तर वाचाल
हे बोल आहेत खरे,
वाचन अन् शिक्षणाने
कळेल व्यवहार सारे!

इतर संपत्ती आज आहे, उद्या नाही. पण शब्दसंपत्तीच्या आधारे खऱया अर्थाने ज्ञानभांडाराचे दालन खुले होते आणि जीवनाला एक वेगळीच चकाकी मिळते. क्षेत्र कुठलेही असो, कर्तृत्वाला झळाळी द्यायची असेल तर माणसाने शब्दांवर प्रेम करावे आणि त्यासाठी अफाट वाचन करावे. जीवनात प्रगल्भ व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल तर वाचनाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही.

खरतरं ‘वाचाल तर वाचाल’ हे घोषवाक्य आजही सर्व जण जीवनाच्या पटलावर अगदी मिनिटा-मिनिटाला वाचतात, ऐकतात. पण खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ कोण पाहतं? किमान माणसाला माणूस म्हणून कसे असायला पाहिजे? याचं उत्तर जरी वाचनाने दिले तरी आयुष्याचे सार्थक झाले असे समजावे. आजकाल विशेषतः तरुण वर्गामध्ये कामाच्या व्यापात ‘वेळचं मिळत नाही हो वाचायला’ असं म्हणणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आपाल्याला दिसून येते. पण एखादे पान वाचायला कितीसा वेळ लागतो? प्रत्येकाने रोज एक पान जरी वाचले तरी तीन महिन्यांत एखादे शंभर पानी सुंदर पुस्तक वाचून पूर्ण होईल. पण जगण्याच्या या स्पर्धेत बरेच लोक विशेषतः तरुण-मुले जगायचं सोडून बाकी गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रीत करत आहेत. सर्वत्र फक्त पैशाच्या गुंतवणुकीचे महत्त्व सांगितले जात आहे. पण मनाची गुंतवणूक मात्र खऱया अर्थाने वाचनातील ज्ञानाच्या वाटेवरच कळते.

खरंतर कामाचे जसे ‘वेळापत्रक’ आपल्याकडे तयार असते. तसे उरलेल्या वेळेचेही म्हणजे वाचनाचेही वेळापत्रक प्रत्येक व्यक्तीकडे असायला हवे. हे कोणी सांगून नव्हे तर प्रत्येकाने स्वतःहूनच तयार करायला पाहिजे. जीवन जगत असताना विविध विषयावरच्या ग्रंथांचे वाचन करण्यासारखा दुसरा आनंद कशातही नाही. जगण्याच्या प्रत्येक क्षणाची लयलूट करायची असेल तर वाचनासारखा उत्तम पर्याय नाही. कारण याच मार्गावरून जीवनात अनंत खजिना लुटता येतो. ज्याने लुटला ते श्रीमंत झाले आणि ज्यांनी नाही लुटला ते आपल्या जन्मोजन्मीचं दारिद्रय़ उपभोगत आहेत. शेवटी कोणाला काय घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न? पण वाचनावर प्रेयसीसारखं प्रेम जडावं लागतं. हे प्रेम जडलं की, वाचनाचं आणि आपलं नातं बहारदार बनतं.