
>> दिलीप जोशी
काळ बदलतो आहे. त्याबरोबर नव्या संकल्पना पुढे येतायत. त्यातल्या अनेक मानवी कल्याणाच्याही आहेत. जगाची वाढती लोकसंख्या पाहता आज सात अब्जापलीकडे गेलेली माणसांची वस्ती वेळीच रोखली नाही तर पुढच्या शंभर वर्षांत त्यात आणखी दोन-तीन अब्जांची भर पडेल. त्या काळातही श्रीमंत चैनीतच जगतील, पण जेमतेम दोनवेळेचं अन्न मिळवणाऱ्यांची अवस्था बिकट होईल. या संभाव्य जनसंख्या उद्रेकाची जाणीव विसाव्या शतकाच्या आरंभीच झाली. आपल्याकडे रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यासारख्या समाजसुधारकांनी एकोणीसशे तीसच्या दशकात कुटुंब नियोजनाची कल्पना मांडली आणि एकच गदारोळ उठला. जगभरच्या पारंपरिक वृत्तीला छेद देणारे त्यांचे विचार त्या काळात तर जनसामान्यांच्या पचनी पडणारे नव्हते, पण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काळ तर त्याच्या गतीने पुढे जातच असतो. ‘जुने जाऊ द्या…’ म्हणत नव्या संकल्पना स्वीकारत असतो. कर्व्यांची दुर्लक्षित शिकवण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारी योजनेचा महत्त्वाचा भाग बनली. कुटुंब नियोजनाचा प्रचार जोरात सुरू झाला.
तरीसुद्धा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये चाळीस कोटींचा असलेला आपला देश आज एकशे पंचवीस कोटींवर जाऊन पोचलाय आणि चीन तर दीडशे कोटींच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु एका अंदाजानुसार पुढच्या पिढय़ांना छोटय़ा कुटुंबांचं महत्त्व अधिक पटेल आणि पुढच्या शंभर वर्षांत जगाची लोकसंख्या कदाचित आहे तेवढी स्थिरावेल किंवा कमीसुद्धा होऊ शकते. जागतिक लोकसंख्या दिन येईल त्यावेळी त्यावर जास्त माहिती घेता येईल.
इथे मुद्दा थोडा वेगळा आहे. तो म्हणजे छोटय़ा कुटुंबात अनेक नाती ‘हरवतायत’ का याचा. ‘हम दो, हमारे दो’ किंवा एक मूल असलेल्यांच्या मुलांना काका, मावशी, आत्या, मामा यापैकी कुठल्या तरी नात्याला वंचित राहावं लागतं. आमच्या लहानपणी मागच्या पिढीच्या विस्तारित कुटुंबात ‘लेकुरे उदंड जाली’ अशीच परिस्थिती असायची. आम्हालाच सहा आत्या, सहा मावश्या आणि पस्तीस चाळीस आते-मामे-चुलत-मावस भावंडे होती. आमच्या पिढीत अर्थातच ती स्थिती नाही. पूवी शेतीप्रधान संस्कृतीत राबणाऱ्या हातांची गरजही जास्त होती. उद्योगीकरणानंतर शहरात आलेल्या आणि इवल्याशा घरटय़ात राहणाऱ्यांना एवढा कुटुंबकबिला झेपणारा नव्हता. आता अनेक घरात एक किंवा फार तर दोन मुलं (किंवा मुली) असतात. हेसुद्धा कालसुसंगत आणि योग्यच आहे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही.
मध्यंतरी एक बातमी वाचली, ती वेगळाच विचार मांडणारी होती. एक किंवा दोन मुलांच्या घरात ‘मधलं भावंड’ आता प्रगत देशात आणि आपल्याकडेही अनेक ठिकाणी दिसत नाही. परदेशात पाहणी केलेल्या त्या वृत्तात असे म्हटलं होतं की, पहिल्या मुलाचं किंवा मुलीचं सहाजिकच घरात भरपूर कौतुक होतं. दुसरं मूल लहान असेपर्यंत त्याचंही कौतुक होतं, पण तिसरं आल्यावर ‘मधल्या’च्या वाटय़ाला उपेक्षा नव्हे, पण थोडंसं दुर्लक्ष येतं. मोठ्याचं ऐकणं आणि धाकटय़ाला सांभाळून घेणं अशी जबाबदारी त्याच्यावर पडते. याचा परिणाम म्हणून ‘मधली’ मुलं जास्त स्वावलंबी होतात. फारसं न कुरकुरता परिस्थितीशी जुळवून घेण्याची झालेली सवय पुढच्या आयुष्यात त्यांना उपयोगी पडते. त्यामुळे ती आपले यशाचे मार्ग स्वतःच शोधण्याइतपत चमकदार बनतात.
अर्थात मोठाच गोतावळा असेल तर मधल्या दोन-तीन मुलांप्रमाणेच सर्वात मोठ्यावरही घरची जबाबदारी येतेच. मात्र आपल्या दादाला किंवा ताईला मनापासून साथ देण्याचं काम मधली मुलं करतात. अगदी प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीतही अशी उदाहरणं आपल्याला आढळतील. आता या परदेशी निष्कर्षाशी शंभर टक्के सहमत होण्याची गरज नाही. कारण माता-पित्याला सर्व मुलं सारखीच असतात. मुद्दाम कुणाकडे दुर्लक्ष केलं जात नाही. उलट मधल्या मुलांना मोठय़ांचं मायेचं कवचही लाभतं. शेंडेफळाचं कौतुक मात्र सर्वत्र होतं. हा सगळा विचार तिकडे चाललाय. कारण कुटुंबांचा ‘संकोच’ होतोय. अनेक कुटुंबांत एकच मूल असतं. त्याचं संगोपन उत्तम होत असलं तरी बरोबर खेळायला, वाढत्या वयात भावंडांबरोबर आपल्या विचारांचं आदानप्रदान करायला, फार काय, लुटुपुटीचं भांडायलाही कोणी नसतं. काही वेळा अशी मुलं एकाकी किंवा प्रौढ होतात. अर्थात या साऱ्या ‘कदाचित’मध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. शेवटी प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व आसपासच्या परिस्थितीचं आकलन करत स्वतंत्रपणे घडत असतं, परंतु छोटय़ा कुटुंबात अनेक नाती ‘हरवतात’ हे खरंच.
पण म्हणून भरमसाट लोकसंख्यावाढही ‘भुईला भार’ ठरणार म्हणून नव्या काळात कुटुंब लहानच असणार हे उघड आहे. मग उपाय? मित्रत्वाची, स्नेहसंबंधांची नवी ‘नाती’ कशी निर्माण करता येतील आणि ती वर्षानुवर्षे कशी टिकतील याकडे लक्ष द्यायला हवं. दिवसभर ‘गॅझेट’ हाती घेऊन बसण्यापेक्षा चारचौघांत मिसळलं तर परिचयातून मैत्री तर होतेच, पण सुप्त कलागुण विकसित होऊन आपोआप ‘आत्मशोध’ घेतला जातो. त्यातूनच हरवत चाललेली विविध नाती गवसतात. आमच्या अनेक मित्रांच्या असा पन्नास-साठ जणांच्या ‘परिचयातून झालेला गोतावळा गेली चाळीस – पन्नास वर्षे जिव्हाळा टिकवून आहे. अशी नाती जपण्यात आणि त्यातून बरंच काही शिकण्यात खरंच मजा असते. हे पुढच्या पिढय़ांपर्यंत प्रकर्षाने पोचलं तर त्यांचंही जीवन समृद्ध होईल.
































































