
>> दिव्या नेरुरकर–सौदागर
दोन टोकांच्या व्यक्ती काही घरांमध्ये आढळतात. मग त्यांचं आपापसात कुठलंही नातं असो. प्रश्न तेव्हाच येतो जेव्हा त्या दोन्ही व्यक्तींपैकी एकही व्यक्ती आपला हेका सोडायला तयार नसते आणि मग त्यातूनच नात्यांमधील ताण हे वाढायला लागतात. ही परिस्थिती योग्य वेळी हाताळणे आवश्यक असते.
“मॅम, मला तुमची तातडीची अपॉइंटमेंट हवी होती. मी उद्या येऊन तुम्हाला भेटू शकते का?’’ एका आईचा आर्जवी स्वर फोनवर होता आणि ती बोलत असताना मागे जोरजोरात भांडण आणि किंचाळण्याचे आवाज येत होते. “माझ्या मिस्टरांचं आणि माझ्या मुलीचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. सारखे एकमेकांशी भांडण करत असतात. आताही तेच चालू आहे घरात. प्लीज, मला उद्याची अपॉइंटमेंट दिलीत की, मी सविस्तर बोलू तरी शकेन.’’ बोलताना तिचा स्वर ओला झाला होता.
काही वेळाने पुन्हा फोन वाजला. “सॉरी मॅम, पुन्हा फोन केला तुम्हाला. माझ्याबरोबर माझी मुलगीही यायचं म्हणतेय. घेऊन येऊ का तिलाही?’’ पुन्हा आई विचारत होती.
दुसऱया दिवशी ठरल्या वेळी दोघीही हजर झाल्या.
अवनी ही साधारण तिशीची तरुणी होती. तिची अंगकाठी अतिशय कृश होती. डोळ्यांभोवती तयार झालेली काळी वर्तुळं आणि कसेतरी अंगावर चढवलेले, चुरगाळलेले कपडे तिच्या मानसिक स्थितीविषयी कल्पना देत होते. विमलताईंच्या म्हणण्याप्रमाणे अवनी घरात घुम्यासारखी राहत होती. घरात कोणाशीही बोलत नव्हती की कोणामध्ये मिसळत नव्हती. आता त्यांच्या घरात इनमिन तीनच माणसे होती, पण तिघेही वेगवेगळ्या खोलीत राहत. वडील कायम बेडरूममध्ये स्वतच्या मोबाइलमध्ये, विमलताई हॉल आणि किचनच्या कामांमध्ये, तर अवनी तिच्या खोलीत दिवसभर लॅपटॉपशी खेळत बसलेली असे. त्यांच्या घरात एकतर स्मशानशांतता असे किंवा मग टोकाची वादावादी. तीही अवनी आणि तिच्या वडिलांमध्येच होत असे.
“एवढं मनस्तापाचं कारण काय असतं तुमच्या घरात?’’ असं विचारताच दोघींच्याही डोळ्यांत एकदम पाणी आलं. विमलताई डोळ्याला रुमाल लावत म्हणाल्या, “अवनीच्या अगदी पाठी लागलेले आहेत माझे मिस्टर! एकुलती एक मुलगी म्हणून आधी लाड केले आणि आता तिच्या आयुष्यावर हक्क गाजवायला निघालेत’’ असं सांगत त्यांनी परिस्थिती कथन करायला सुरुवात केली.
अवनी ही पहिल्यापासून काहीशी हट्टी आणि हेकेखोर स्वभावाची होती. हा तिचा स्वभाव तिच्या वडिलांकडूनच आलेला होता. त्यामुळे सुरुवातीला तिचा मनमानीपणा ‘माझी मुलगी माझ्यासारखीच’ म्हणून तिच्या वडिलांनी कौतुकाने नजरेआड केला होता. मग मात्र त्यांनाही हे जेव्हा डोईजड झालं तेव्हा त्यांनी तिला विरोध करायला सुरुवात केली. त्याचा एकदा खटका असा उडाला की, अवनीला नोकरी करायची नव्हती. स्वतचा व्यवसाय सुरू करायचा होता, पण त्यासाठी लागणारी तयारी, दूरदृष्टी आणि मेहनत हे गुण तिच्याकडे नव्हते. तरीही तिने हट्टाने वडिलांचा काही पैसा त्या व्यवसायात गुंतवला, पण अपेक्षित नफा न झाल्यामुळे आणि नवीन व्यवसायात लागणारा संयम नसल्याने अवनीने अचानक तो व्यवसायच बंद केला. ज्यामुळे नुकसान तिच्या वडिलांनाही सोसावे लागले. त्यात भर म्हणजे तिचे लग्नाचे वय उलटून जात होते. वडिलांनी लग्नासाठी तिच्यामागे धोशा लावला आणि तिला न विचारताच स्थळं घेऊन येऊ लागले, त्या स्थळांना परस्पर फोनही करू लागले. अवनीचा पारा मग चढला आणि ती अधिकाधिक बंडखोर होत गेली. बाबांवरचा राग स्वतवर काढायला लागली. तिने खाणंपिणं सोडलं. कोणी स्थळ येणार असेल तर गबाळ्यासारखी राहायला लागली. अवनीचा लहरी आणि तिच्या वडिलांचा उद्रेकी स्वभाव सांभाळताना विमलताईंना नाकी नऊ येत चालले होते. शेवटी त्यांनी मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार समुपदेशनाचा मार्ग निवडला.
“कोणाची बाजू घेऊ ते मला हल्ली कळेनासं झालंय…’’ विमलताई सांगत होत्या.
दोन टोकांच्या व्यक्ती काही घरांमध्ये आढळतात. मग त्यांचं आपापसात कुठलंही नातं असो. प्रश्न तेव्हाच येतो जेव्हा त्या दोन्ही व्यक्तींपैकी एकही व्यक्ती आपला हेका सोडायला तयार नसते आणि मग त्यातूनच नात्यांमधील ताण हे वाढायला लागतात. काही घरांमध्ये तर टोकाची भूमिकाही घेतली जाते. एकमेकांचं मरेपर्यंत तोंडही बघायचं नाही अशाही शपथा घेतल्या जातात. वरवर पाहता यातून होणारं नुकसान जरी दिसत नसलं (आयुष्य जात असलं) तरी मानसिक घाव आणि जखमा, कमतरतेची जाणीव, एक अशाब्दिक रितेपण तर होतेच. ते भरून काढायचं कसं? विमलताईंच कुटुंब हे अशा घरांपैकी होतं, ज्यामध्ये परस्परांबद्दलचा राग होता आणि तो व्यक्त करायची पद्धत विचित्र होती. एकमेकांना डिवचणं होतं, पण हे हक्क गाजवणं एकमेकांबद्दलच्या आपुलकीमुळे होतं हेही त्या दोघींशी बोलताना लक्षात येत होतं.
विशेषत अवनी आणि तिचे वडील हे स्वभावाने एकसारखे होते आणि म्हणूनच कोणीही स्वतचा ‘अहं’ सोडायला तयार नव्हता, पण यात त्या दोघांचंही वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवर नुकसान होत होतं आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा अवनीला समजावण्यात आल्या, त्या वेळी तीही थोडी भानावर आली.
अवनीचे वडील सत्रासाठी आले तेव्हा अवनी आणि त्यांना एकत्र बसवलं गेलं होतं, ज्यायोगे दोघांनाही समोरासमोर काही स्वतच्या भूमिका स्पष्ट करता येतील. “मला अवनीची अशी अवस्था बघवत नाही. शेवटी मी एक बाप आहे. हिच्या वयाच्या इतर मुलींना मी जेव्हा बघतो तेव्हा माझं काळीज जळतं. म्हणून मी…’’ ते म्हणाले.
पण अवनीने त्यांचं वाक्य मध्येच तोडलं… “म्हणून का मनमानी करायची?’’
“पण तू ऐकत कुठे होतीस?’’ त्यांनी तिला प्रश्न केला.
“ऐकून कुठे घेता तुम्ही? आईचं कधी ऐकलंय? की तिच्या मताला किंमत दिलीय?’’ अवनीने प्रतिप्रश्न केला त्यांना. तिचा पलटवार ऐकून ते शांत बसले.
तिच्या वडिलांनाही एव्हाना चुका लक्षात आल्या होत्याच. त्यांनी विमलताईंची माफी मागितली आणि स्वतच्या ‘अहं’वर काम करण्याचे ठरवले. त्याचबरोबर आपल्या अवनीबरोबरही आपले संबंध दृढ व्हावेत म्हणून त्यांनी स्वतसाठी सत्रे घेण्याची इच्छा व्यक्त केली.
“बाबा, मला फक्त एक प्रॉमिस द्या. मी सांगेपर्यंत कुठलंही स्थळ आणू नका आणि माझ्याकडूनही हे तुम्हाला आणि आईला प्रॉमिस की, मीही स्वतच्या पायावर उभी राहीन, स्वतची ओळख निर्माण करेन. फक्त माझ्या मूड्सना थोडं अजून सांभाळा. लगेच मी काही आदर्श होणार नाही.’’ अवनी मिश्कीलपणे त्या दोघांना म्हणाली. त्यांनीही हसत हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
अवनी आणि तिचे वडील आता सत्रे एकत्र घेत आहेत आणि वैयक्तिकरीत्याही काही गोष्टी बदलत आहेत. अधिक स्पष्ट सांगायचं झाल्यास अवनीने आता मॅनेजमेंट कोर्सला अॅडमिशन घेतली आहे आणि तिचे वडील तिच्या भविष्यासाठी तरतूद म्हणून आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी घरबसल्या अर्थार्जन करत आहेत.
अवनी आणि तिच्या बाबांच्या या उदाहरणाने मला पुन्हा काही गोष्टी इथे मांडाव्याशा वाटतात, त्या म्हणजे प्रत्येक नात्याचा पाया हा संभाषण असतो आणि महत्त्वाचं म्हणजे नाती जपण्यासाठी स्वतबरोबर नात्यातल्या प्रत्येकाला सांभाळूनही घ्यावं लागतं. तरच कुठलंही नातं बळकट होतं. अन्यथा नावाला असलेली नाती आणि कुटुंबं आपल्या समाजात कमी नाहीत.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)