
>> ज्ञानेश्वर भि. गावडे
डॉलर्सची किंमत वाढून ती आता सत्तर रुपयांच्या जवळ गेली आहे. 1947 ला देश स्वतंत्र झाला तेव्हा एका रुपयाला एक डॉलर मिळत असे. सत्तर वर्षांनंतर डॉलर सत्तर रुपयांवर गेला आहे. डॉलर हे जागतिक विनियमनाचे चलन झालेले आहे. कोणतीही वस्तू घ्यायची झाली तर ती रुपयासारख्या स्वस्त चलनाने मिळत नाही. त्यासाठी आधी रुपये देउैनच डॉलर्स खरेदी करावे लागतात. कच्चे इंधन तेल, डॉलर्स खर्च करूनच मिळते. नंतर अशा तऱ्हेने महाग झालेल्या डॉलर्समुळे हिंदुस्थानात महागाईचा डोंब उसळला आहे.
इंधन तेलाखालोखाल हिंदुस्थानीयांना परदेशी गाड्यांची गोडी लागलेली आहे. नवी नसली तरी सेकंडहॅण्ड घ्यावीशी वाटते. स्वतःची विदेशी कार असावी असे वाटते. त्यासाठी महागडे इंधन तेल खर्च होते. त्याची त्यांना पर्वा नसते. गाडी बाळगणे ही फॅशन झालेली आहे, नवश्रीमंत झालेल्या मंडळीत ही लागण पाहावयास मिळते. 2017 साली 36 लाख आणि 2016 साली 40 लाख गाड्या हिंदुस्थानात विकल्या गेल्या. सुटे भाग मिळत असल्यामुळे सुझुकी व हुंडाई या गाड्या खूप विकल्या जातात. जुन्या व नव्या गाड्यांच्या खरेदीसाठी डॉलर्सवरच भार पडतो. त्यानंतर तिसरा नंबर सोन्याचा व सोन्याच्या वस्तूंचा लागतो. आपल्या देशात सोन्याची क्रेझ सारखी वाढत असते. त्यासाठी रीतसर भागीसह भल्याबुऱ्या मार्गाने दरवर्षी दोन हजार टन सोने हिंदुस्थानात आणले जाते. अर्थात त्यासाठीही आपल्याला न परवडणाऱ्या डॉलर्सच्या माध्यमांवर रुपये उधळावे लागतात. जडजवाहीर, उंची आभूषणे, वस्त्र, प्रावरणे, महागडे फर्निचर, निरनिराळय़ा चैनीच्या वस्तू, विविध गृहोपयोगी साधने, घड्याळे, हॅण्डसेटस्, संगणक, टी.व्ही., कॅमेरे आदी परदेशी वस्तू वापरून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणे ही नवी फॅशन, नवश्रीमंतात झालेली आहे. त्यामुळे त्यासाठी डॉलर्स विकत घेण्यात डॉलर्सचाच भाव वाढवीत आहोत आणि त्याकारणे देशाची व्यापारी तूटही वाढत जाते.
परदेशी खेळाडू, कोच, तंत्रज्ञान, सल्लागार यांनाही त्यांचा मेहनताना डॉसर्ल विकत घेऊन द्यावा लागतो. देवकृपेला उतराई व्हावे म्हणून कित्येक श्रद्धाळू भाविक आवर्जून सोन्याच्याच अथवा सोने मढविलेल्या वस्तू देवांना अर्पण करतात. त्याचाही विपरीत परिणाम देशाचा व्यापारी तुटींवर होऊन देशाचेच नुकसान असते. त्या श्रद्धाळूंना त्याचा विसर पडत असतो. उपरोक्त कारणांसाठी पदरचे रुपये मोडून सच्च्या हिंदुस्थानींनी डॉलर्स घेण्याचे कटाक्षाने टाळले तर नक्कीच डॉलर्सचा भाव उतरल्याशिवाय राहणार नाही, पण हे सत्य लक्षात कोण घेतो?
































































