
>>नीलेश कुलकर्णी<<
पाच वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना उद्देशून काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी ‘पंतप्रधानपदाचे स्वप्न सोडा, तुमची कुवत केवळ चहा विकण्याची आहे. 24 अकबर रोड या काँग्रेस मुख्यालयाबाहेर चहाची टपरी टाका, जागा आम्ही देऊ’, अशी दर्पोक्ती केली होती. जनतेने मोदी लाटेत अय्यर महाशयांसकट या काँग्रेसी अहंकाराला गाडून टाकले. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘हे मणिशंकर अय्यर कुठे गायब आहेत?’ या चिंतेत म्हणे भाजपवाले होते. मात्र ही कसर राहुल गांधींचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी भरून काढली आहे. 1984 च्या शिखांच्या शिरकाणाबद्दल ‘हुआ सो हुआ’ असे बेदरकार विधान करून पित्रोदा यांनी शीखबहुल मतदारसंघांत काँग्रेसची कबर खोदली असून काँग्रेससाठी ‘सेल्फ गोल’ करत भाजपला ‘फ्री हिट’ दिली आहे.
लोकसभेच्या तीनचतुर्थांश जागांवर मतदान झालेले आहे आणि मध्य प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि दिल्ली या ठिकाणी दोन टप्प्यांतील मतदान बाकी आहे. या वेळची लोकसभा निवडणूक सत्ताधारी भाजपसाठी खूप सोपी नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापासून सर्वच भाजप नेते आणि कार्यकर्ते पराकाष्ठा करीत आहेत. अशावेळी प्रमुख विरोधी पक्षातील एखादा ज्येष्ठ नेता वाचाळवीर बनून भाजपसाठी फ्री हिट देत असेल तर ते त्या पक्षासाठी फायद्याचेच ठरेल. 2014 मध्ये काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदींविरुद्ध अत्यंत खालच्या दर्जाची टीका करून काँग्रेसवर ‘सेल्फ गोल’ नोंदवला होता. सध्या ते गायब असले तरी ती उणिव काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राहुल गांधी यांचे सल्लागार सॅम प्रित्रोदा यांनी भरून काढली आहे. 1984 च्या शिखांच्या शिरकाणाबद्दल ‘हुआ सो हुआ’ असे बेदरकार विधान पित्रोदा यांनी केले आणि शीखबहुल मतदारसंघांत काँग्रेसची जणू कबरच खणली. आता त्यांनी ‘मला हिंदी फारसे येत नाही, वाक्याची जुळवाजुळव करताना गडबड झाली’, अशी सारवासारव केली आहे. तसेच राहुल गांधींनी माफी मागण्यास बजावल्यामुळे दिलगिरीही व्यक्त केली आहे. तथापि ‘जो बूंद से गयी वो हौद से नही आती’. तेव्हा लोकसभेसाठी अटीतटीचा मुकाबला सुरू असताना चुरशीच्या क्रिकेट सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी बॉलरने सलग ‘नो बॉल’ टाकून प्रतिस्पर्ध्याला ‘फ्री हिट’ द्यावी अशी आगळीक पित्रोदा यांच्याकडून घडली आहे. पित्रोदांच्या विधानावरून शीख बांधवानी काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकले तर भाजपचे डळमळीत झालेले गलबत सत्तेच्या किनाऱ्यावर लागू शकेल यात शंकाच नाही.
लोकसभेची निवडणूक कमालीची चुरशीची झाली आहे. मात्र पित्रोदा, सिद्धू यांच्यासारख्या वाचाळवीरांच्या तोंडाला राहुल गांधींनी कुलूप का घातले नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीवेळीही काँग्रेसच जिंकेल अशी स्थिती असताना मणिशंकर अय्यरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात हिणकस टीका केली होती. त्याचा परिणाम म्हणून ‘गुजराती अस्मिता’ जागृत झाली आणि गुजरातमध्ये भाजपाला पुन्हा सत्ता मिळवणे शक्य झाले. शीखविरोधी दंगलीच्या भळभळत्या जखमा घेऊन आजही शीख बांधव जगत आहेत. त्या जखमेवरची खपली काढण्याचे कृत्य पित्रोदा यांनी केले आहे. पित्रोदा आणि सिद्धूसारख्या वाचाळवीरांना मीडियाशी बोलण्याची परवानगी देणे हीच काँग्रेस अध्यक्षांची घोडचूक ठरली आहे. पंजाब, हरयाणा आणि दिल्लीतील शिखांची मोठी संख्या लक्षात घेता लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांचे पारडे आता भाजपच्या बाजूने फिरण्याची शक्यता आहे. असे झाले तर ‘संकटमोचक’ म्हणून भाजपने पित्रोदा यांचे आभार मानायला हवेत.
नवीनबाबूंचे अफाट काम

पश्चिम बंगालच्या आक्रस्ताळय़ा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जाहीर सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पदोपदी अपमान करत असताना ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ‘फनी’ चक्रीवादळावेळी केलेले काम सलाम ठोकण्याजोगे आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवर कमळ फुलावे यासाठी भाजप श्रेष्ठाr सातत्याने वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत. नवीनबाबूंचे काही विश्वासू सहकारी भाजपने गळाला लावले आहेत. मात्र भाजपने निर्माण केलेले ‘राजकीय वादळ’ आणि किनारपट्टीवर धडकलेले ‘फनी चक्रीवादळ’ अशी दोन्ही वादळे यशस्वीपणे परतवून लावल्याने नवीनबाबू सध्या कौतुकाचा विषय बनले आहेत. चक्रीवादळावेळी नवीनबाबूंनी प्रशासकीय कौशल्य पणाला लावत लाखो जनतेचे यशस्वीपणे सुरक्षितपणे स्थलांतरण केले. नवीनबाबूंचे कामच इतके दणदणीत होते की, जाहीर सभांमधून नवीनबाबूंवर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या कामाचे जाहीर कौतुक करावे लागले. अर्थात या कौतुकाच्या साखरपेरणीमागे दुसरी बाजूही आहेच. लोकसभेत संख्याबळ कमी पडले तर नवीनबाबूंची मदत घेता येईल. त्यामुळे पंतप्रधानांच्या या स्तुतिसुमनांमागे ‘राजकीय मैत्रीचा’ सुंगध दरवळत होताच. प. बंगालच्या भूमीवर ‘जय श्रीराम’ चा नारा देऊ देणार नाही अशी अडेलतट्टू भूमिका घेणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी यापासून बोध घेतलेला बरा!
भाजप नेत्यांची बडबड

वाचाळवीरांच्या रोगाची लागण केवळ काँग्रेसलाच झाली आहे असे नाही तर भाजप नेते त्यात काकणभर पुढेच आहेत. खरेतर पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या तोंडाला कुलूप घाला आणि बेताल बडबडू नका, असा सज्जड इशारा या नेत्यांना दिला होता, मात्र पंतप्रधानांची मात्रा या नेत्यांवर काही लागू होताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदींच्या सरकारातले मंत्री जयंत सिन्हा यांनी कुख्यात हाफीज सईदचा उल्लेख ‘सईदजी’ असा करून नाहक वाद ओढवून घेतला. आता लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात असताना मध्य प्रदेशातील झाबुआचे भाजप उमेदवार गुमानसिंग डामोर यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. जाहीर सभांमधून पंतप्रधान मोदी पंडित नेहरूंवर टीका करत आहेत. कदाचित त्यापासून ‘प्रेरणा’ घेत गुमानसिंगांनी देश स्वतंत्र झाला त्यावेळी पंडित नेहरूंऐवजी बॅरिस्टर जीना पंतप्रधान झाले असते तर हिंदुस्थानची फाळणी झाली नसती, अशी मुक्ताफळे उधळली. नेहरूद्वेषामुळे आपण जीनांची तरफदारी करत आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. जीनांच्या समाधीवर फुले वाहिल्याची किंमत भाजपचे लोहपुरुष लालकृष्ण आडवाणींना कायमची मोजावी लागली हे गुमानसिंग यांनी लक्षात घ्यायला हवे. तिकडे चंदिगडमध्ये हायप्रोफाइल पद्धतीने प्रचार करणाऱ्या अनुपम खेर यांना आपल्या खासदार पत्नी किरण खेर यांच्यामुळे कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यानुसार किरण खेर यांनी कोणते काम तर केलेच नाही, शिवाय त्या चंदिगडमध्येही फारशा फिरकल्या नाहीत याची आठवण एका दुकानदाराने अनुपम खेर यांना करून दिल्यावर त्यांना तिथून पळ काढण्यावाचून पर्यायच उरला नाही. किरण खेर यांच्याप्रमाणेच अनेक खासदार केवळ पंतप्रधान मोदींच्या ‘करिष्म्या’वर निर्धास्त राहून ‘निक्रिय’ राहिल्यामुळे भाजपची या निवडणुकीत दमछाक होताना दिसत आहे.































































