लॉजिस्टिकचा मास्टर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> उत्तरा मोने, [email protected]

ज्या गोष्टी आपल्याला मिळू शकल्या नाहीत त्या सर्व गोष्टी आपल्या मुलांना मिळाव्यात आणि त्यांनी आपल्या आयुष्याचं सोनं करावं हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं. सी. बी. लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पोटे यांच्या वडिलांनीदेखील असंच स्वप्नं पाहिलं होतं. आपल्या मुलाने खूप शिकून आयएएस अधिकारी व्हावं अशी त्यांची इच्छा होती, पण संदीपना मात्र वेध होते क्रिकेट खेळण्याचे आणि आपले आदर्श सचिन तेंडुलकरप्रमाणे मास्टरब्लास्टर होण्याचे, पण नियतीने मात्र त्यांच्यासाठी काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. संदीप यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या की, ते आयएएस अधिकारी किंवा क्रिकेटर न होता लॉजिस्टिक्स क्षेत्रातले मास्टरब्लास्टर झाले.

मुळात घरची परिस्थिती बेताची असल्याने संदीप यांनी काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये नोकरी केली. खरं तर व्यवसायाचं बाळकडू लहानपणापासूनच संदीपना मिळत होतं. त्यांचे वडील स्वतः वाहतूक क्षेत्रात आपला जम बसवू पाहत होते. संदीप कॉलेजमध्ये असतानाच त्यांच्या वडिलांनी शून्यापासून सुरुवात करत एक यशस्वी व्यवसाय उभारला होता, पण बदलत्या काळानुसार आपल्या उद्योगाचं व्यवस्थापन करणं, गाडय़ा, वाहन चालक, हिशेब यांची नोंद ठेवणं यात त्यांना अनेक आव्हानं येऊ लागली. ती लक्षात घेऊन संदीपनी नोकरी सोडून  व्यवसायात वडिलांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला घरच्यांनी मात्र सुरुवातीला विरोध केला. पण संदीप यांनी  सहा महिन्यांचा अवधी मागून घेतला आणि खरोखरीच अवघ्या 6–8 महिन्यांत त्यांनी व्यवसायाचा कायापालट केला.

एखादा व्यवसाय सुसूत्रतेने चालण्यासाठी योग्य नियोजन अत्यंत महत्त्वाचं असतं असं संदीप यांचं मत होतं. म्हणूनच आतापर्यंत मॅन्युअली चाललेला कारभार त्यांनी स्वयंचलित केला. संगणक, आधुनिक उपकरणं, ऑनलाइन प्रणालीचा उपयोग करून त्यांनी अनेक नावीन्यपूर्ण बदल  घडवून आणले.  कामगारांची मनं न मोडता, त्यांना  समजावत हे सगळे बदल संदीपनी त्यांच्या अंगवळणी पाडले. पाहता पाहता घरातून सुरू झालेला व्यवसाय एका सुसज्ज ऑफिसमध्ये शिफ्ट झाला. अर्थात या सगळ्यात संदीपच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते ते त्यांचे वडील. खरं तर त्यांच्या वडिलांनादेखील व्यवसायाची तशी काही पार्श्वभूमी नव्हती, पण   जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर काही करून दाखवण्याची धमक मात्र दोघांमध्ये होती. म्हणूनच तर एका पंपनीसोबत वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आज  अनेक नामांकित कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे आणि हा बदल घडवून आणण्याचं श्रेय संदीप पोटे यांना नक्कीच जातं.

मध्यंतरी कोविड काळात अनेक उद्योग डबघाईला आले, पण या काळात घरपोच वस्तू ‘डिलिव्हर’ करण्याची पद्धत सुरू झाल्याने सी. बी. लॉजिस्टिक्सचा व्यवसाय मात्र बिनदिक्कत सुरू राहिला. ‘गिऱहाईकाला कधीही नाही म्हणायचं नाही’ ही वडिलांची शिकवण कायम लक्षात ठेवून कोरोना काळात संदीपनी एक नावीन्यपूर्ण कल्पना राबवली. उत्तर मुंबई भागात साधारण 9-5 या वेळेत अवजड वाहनं आणण्यास बंदी होती, परंतु सी. बी. लॉजिस्टिक्सच्या क्लायंट्सना मात्र या भागातून डिलिव्हरीच्या मागण्या येत होत्या. अशा वेळी ‘‘यावर काही उपाय नाही, आपण ही मागणी पूर्ण करू शकणार नाही’’ असं म्हणणं खूप सोपं होतं, पण ते न करता संदीपनी यावरही तोडगा काढला आणि मोटरसायकलवरून डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली. बाईक वापरून डिलिव्हरी करणारी सी. बी. लॉजिस्टिक्स पहिली कंपनी ठरली. एकूणच काय तर आपल्या आयुष्यात जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर ती गोष्ट मिळवण्यापासून आणि त्या कामात घवघवीत यश संपादन करण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. हेच संदीप पोटे यांच्या प्रवासातून आपल्याला जाणवतं.