प्रासंगिक – सामाजिक एकतेचा संदेश देणारे संत रोहिदास

2102

>> राजेंद्र मनोहर खेडेकर

जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि सदाचाराच्या धर्माखाली अनाचार माजतो तेव्हा पुन्हा योग्य धर्माचे मार्गदर्शन करण्याकरिता भगवंत जन्म घेतात, असा युगायुगांचा हिंदुस्थानीयांचा विश्वास आहे. भगवंतसुद्धा युगायुगात जन्म घेऊन तो विश्वास सार्थ करतात. कधी कधी या भगवंताचे संत तुकाराम, रामदास, रोहिदास यांच्यासारख्या संतांमध्ये दर्शन होते. आपल्या हिंदुस्थानीयांचे आकाश अनंत संतांच्या ताऱ्यानी भरून गेले आहे. अशा ताऱ्यात तेजस्वी तारा म्हणून ज्यांना म्हणावे त्यात एक आहेत संत रोहिदास.

धर्मकांडाच्या नावाखली माणसामाणसातला दुरावा वाढत चालला होता. अशा वेळी या दुर्दैवाचा अंधार दूर करणारा, हिंदुस्थानात इ.स. 1376 मध्ये माघ पौर्णिमेस रविवारी सूर्योदय झाला व एका तेजस्वी पुत्राने कर्माबाईंच्या पोटी जन्म घेतला. तेच हे संत रोहिदास. त्यांनी साऱ्या जगाच्या अंधारावर मात केली व वडील रघुरामांचे नाव उज्ज्वल केले. काशीपासून जवळच असलेल्या मंडूर गावी जन्मलेला हा सूर्य म्हणजेच संपूर्ण भारतवर्षात कायमस्वरूपी कोरले गेलेले नाव संत रोहिदास.

तेजस्वी डोळे व सदैव आनंदी वृत्ती आणि तरतरीत व्यक्तिमत्त्व यामुळे ते इतर मित्रांमध्ये उठून दिसत. दिवसभर ते खेळत, बागडत, परंतु सायंकाळी मात्र न चुकता देवदर्शन घेत. तसेच त्यांना देवळा बाहेर बसून कीर्तन, प्रवचन ऐकण्याची अत्यंत आवड होती. त्यांचे हे देवप्रेम बघून आईवडील खूप आनंदी होत. भगवंतांनी अशा मातापित्यापोटी जन्म घ्यावा अशी त्यांची पुण्याई होती. काशीक्षेत्री येणाऱ्या जाणाऱ्या साधुसंतांचा मुक्काम कधी या गावी झाला तर त्यांची सेवा करण्यास रघुनाथ कधी चुकले नाहीत. त्यांना घरी बोलावून आदरातिथ्य करून शक्य तितकी सेवा ते करीत. अशा प्रकारच्या संस्कारांत वाढल्यामुळे रोहिदासांनाही त्यांच्या बालवयात अनेक साधू पुरुषांची सेवा करण्याची संधी मिळाली.

रोहिदास नुसते सेवाच करीत नव्हते तर त्या सोबत आपला जोडे शिवण्याचा व्यवसाय, वडिलांनी शेती करण्यासदेखील मदत करीत असत. रोहिदासांचे वय वाढत चालले, बुद्धी वाढत चालली त्याचबरोबर देवभक्ती, देशभक्ती झपाटय़ाने वाढू लागली. समाजातील जातीभेद, उच्चनीचता व गरीब – श्रीमंती यातील भेदभाव कसा दूर करावा या विचारांनी त्यांना रात्रंदिवस झोप लागत नसे. आईवडिलांना पण मुलगा रोहिदास याची चिंता वाटू लागली व त्याच्यावर जबाबदारी पडावी म्हणून एका सुंदर, सुशील अशा लोनादेवी नावाच्या मुलीशी त्यांना विवाहबद्ध केले. पण रोहिदासांनी हीसुद्धा जबाबदारी आनंदाने स्वीकारली. आपला व्यवसाय, समाजसेवा व आपली पत्नी तसेच आईवडील यांनासुद्धा आनंदाने सांभाळीत रोहिदास आपल्या व्यवसायात पारंगत झाले व पादत्राणे करण्याबरोबरच चामडय़ाच्या इतर कलात्मक वस्तूही बनवू लागले. ग्राहकांचा त्याला उदंड प्रतिसादही मिळत गेला.

एके दिवशी रोहिदासाची परीक्षा पाहण्यासाठी एका साधूने रोहिदासांना एक परीघ दिला व सांगितले, हा परीघ लोखंडाचे सोने करील. एवढे बोलून तो साधू निघून गेला. साधू निघून गेल्यावर रोहिदासांनी तो परीघ आपल्या झोपडीच्या कोपऱ्यात अडकवून ठेवला. काही दिवसांनी तो साधू परत आला आणि म्हणाला, ‘‘अरे रोहिदास, तू अजून जसाच्या तसा आहेस. मी दिलेली वस्तू वापरली नाहीस वाटतं?’’ तर रोहिदास म्हणाले, ‘‘साधू महाराज, लोखंडाचे सोने करण्यापेक्षा माझा गरीब समाज धर्मकांडाच्या दुराव्याने गांजलेला आहे, त्याचे सोने झाले तर माझ्या जीवनाचे सार्थक होईल. मला श्रीमंती कशासाठी हवी? मला देवाने सारे काही दिले आहे. मला पाहिजे आहे ते माझ्या सर्व बांधवात एकता, समता, बंधुप्रेम.’’

रोहिदास आपल्या जातीबांधवांना उपदेश करताना सांगत ‘‘चपला शिवताना सळ म्हणजे धागा आपण वापरतो. तर त्याच धाग्याने समाजाचे कल्याण करायचे असेल तर ज्ञानही जोडायला हवे. ज्यामुळे आपल्याला मानाने जगायला बळ येईल. चप्पल ठोकून ठोकून आपण नीट करतो. तसेच त्या हस्तीनं भेदभाव करणाऱ्या व्यवस्थेचा ठेचा करायला हवा, पण त्याचबरोबर दुःखितांच्या पायाचे चटकेही दूर करायला हवेत. धागा कापायला आपण रापी वापरतो. त्याने नुसते धागे कापायचे नाहीत तर अनिष्टांचे मूळ कापायला हवे’’.

एकदा रोहिदास जनन्नाथपुरीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या मित्र परिवारासह, शिष्यांसह तीर्थयात्रेला गेले. त्यांनी भगवंताचे दर्शन घेतले. मात्र नैवेद्याच्या प्रसादाच्या पंगतीत लोक त्यांना बसून देत नव्हते. तेव्हा काही लोक म्हणाले, ‘‘अहो, तुम्ही संत झालात ते ठीक आहे. मात्र एखाद्या चर्मकाराला आमच्या सोबत भोजनाला बसू द्यायचे म्हणजे काय?’’ तेव्हा रोहिदास म्हणाले, ‘‘याचा अर्थ जोडे घालून देव्हाऱ्यात गेले तरी चालेल असा नव्हे, पण शरीरावरचं हे चामडं आहे जे धुतले, शुद्ध केले की, एशालयात येऊ शकते. ते माझ्याही अंगावर आहे. मग मी का येऊ शकत नाही? अशुद्ध चामडं बाहेर ठेवले गेले आहे. मी शुचिर्भूत होऊन येथे आलो आहे.  देहदृष्टय़ा तुमच्या अंगावर जेवढे कर्म आहे तेवढेच माझ्या अंगावरही आहे. मी व्यवसाय म्हणून चामडे कमावतो, त्यावरची घाण काढतो म्हणून मी मलीन! सगळा ब्रह्मवृंद आपल्या विद्वत्तेने समाजातील अहंकार व मानसिक मळ काढतच असतो. यात सामाजिक स्वच्छता आपण दोघेही करतो.’’ तरीही हे म्हणणे काही कर्मठ लोकांना पटले नाही, म्हणून त्यांनी जेव्हा जेवण सुरू केले तेव्हा काय आश्चर्य? सर्वांना रोहिदास दर दोन माणसांनंतर बसले असे आढळून आले. तेव्हा सर्वांना आपल्या चुकीचा पश्चात्ताप झाला. सर्वांनी रोहिदासांची माफी मागितली आणि सर्वांची तीर्थयात्रा खऱ्या अर्थाने पार पडली. संत रोहिदास समाजाच्या एकतेसाठी सदैव झगडत राहिले. जागोजागी त्यांनी मंदिरे प्रस्थापित केली. त्या मंदिरांत सर्व धर्मीयांना प्रवेश दिला.

आपली प्रतिक्रिया द्या