लेख : विज्ञानाचे महत्त्व, उपयोगिता आणि हिंदुस्थानी समाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय यावलकर

एखाद्या वस्तूची ओळख पटवून देणे, तिचे वर्गीकरण करणे, द्रव, स्थायू आणि वायूरूप पदार्थांचे गुणात्मक आणि संख्यात्मक वर्गीकरण करण्याकरिता रामन वर्णपटांचा उपयोग केला जात आहे. या शोधासाठी कृतज्ञता म्हणून आपण 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. आजच्या 33 व्या राष्ट्रीय विज्ञान दिनी विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल जागृती होणे गरजेचे आहे.  तसेच विज्ञानाचे महत्त्व आणि त्याची उपयोगिता समाजाला पटवून द्यावी लागेल.

28 फेब्रुवारी 1928 रोजी मिळालेल्या एका छोट्या प्रश्नाच्या मोठ्या उत्तरामुळे संपूर्ण विश्वाला उपयोगी ठरणारा शोध जगासमोर आला. प्रकाशाच्या रंगांनी डॉ. सी. व्ही. रामण यांचे कुतूहल जागृत करून त्यांच्या मनात प्रश्न निर्माण केला, तो म्हणजे आकाशाचा रंग निळा का? आणि या प्रश्नातूनच त्यांच्यातील संशोधक जागा होऊन रामण स्पेक्ट्रम किंवा रामन परिणामाचा जन्म झाला. 1930 मध्ये संशोधनानंतर म्हणजे अडीच वर्षांत डॉ. सी. व्ही. रामण यांना याच ‘रामण इफेक्ट’बद्दल जगातील सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार मिळाला. सुमारे 91 वर्षांपूर्वी झालेल्या या संशोधनाचा उपयोग आजही संपूर्ण जगाला होतो आहे.

एखाद्या वस्तूची ओळख पटवून देणे, तिचे वर्गीकरण करणे, द्रव, स्थायू आणि वायूरूप पदार्थांचे गुणात्मक आणि संख्यात्मक वर्गीकरण करण्याकरिता रामन वर्णपटांचा उपयोग केला जात आहे. या शोधासाठी कृतज्ञता म्हणून आपण 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. आजच्या 33व्या राष्ट्रीय विज्ञान दिनी विद्यार्थ्यांमध्ये, युवकांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल जागृती होणे गरजेचे आहे. गेल्या अडीच दशकांहून अधिक वर्षे विज्ञान प्रसाराचे कार्य करताना असे दिसते की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जर समृद्धी निर्माण करायची असेल तर प्रचंड जोमाने काम करावे लागेल. विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवताना सोप्या पद्धतीने ते न्यावे लागेल. तसेच विज्ञानाचे महत्त्व आणि त्याची उपयोगिता समाजाला पटवून द्यावी लागेल. विज्ञानाचा विकास हा वास्तवतेवर अवलंबून असतो याची सवय समाजाला लावावी लागेल. कारण कटू सत्य पचनी पडणे अवघड असते, पण ते स्वीकारणे समाजाच्या हिताचे असते तरच विज्ञानाची खरी रुजवात समाजात होऊ शकेल.

नवनवीन खेळणी खेळायला मिळाली की मुलांनाच नव्हे तर पालकांनाही तेवढाच आनंद होतो हे सांगायला नको. अर्थातच चालणारी, आवाज करणारी किंवा प्रकाश देणारी खेळणी असतील तर बघायलाच नको आणि म्हणूनच की काय, बाळाच्या पाळण्याच्या वर लटकवले जाते ते म्हणजे मेरी गो राऊंड, आवाजासाठी खुळखुळा. या खेळण्यांची किमया म्हणजे बाळाला खेळण्यास ते उद्युक्त करतं, त्याकडे पाहायला भाग पाडतं आणि आवाजाची चाहूल घ्यायला शिकवतं. थोडक्यात काय तर नकळत त्या बाळाला नवीन वातावरणाची जाणीव आम्ही करून देत असतो. हेच बाळ मोठं होऊन खेळण्याची मागणी करतं, हट्ट धरतं, स्वतः करून पाहतं आणि आईवडिलांनाही करायला भाग पाडतं यातूनच विज्ञानाच्या दृष्टीने प्रायोगिकतेला सुरुवात होत असते. कुतूहल जागृत होऊन नवीन गोष्टी, नवीन प्रयोग करण्याची इच्छा निर्माण झाली की विज्ञानाच्या मुख्य अंगाचा विचार करता कुतूहल, कृतिशीलता, नवीन कल्पनांची निर्मिती, तार्किकता, निरीक्षण, निष्कर्ष या विविध अंगांची जाणीव संस्कारक्षम वयोगटात होत असते.

खऱ्या अर्थाने जर विज्ञान शिकायचे असेल तर प्रत्येक गोष्टीकडे बघताना हे असेच का, केव्हा, कसे होते ते उघड्या डोळय़ांनी बघता येणे आवश्यक आहे. उघड्या डोळय़ांनी म्हटल्यानंतर आम्ही कुठे डोळे बंद करून पाहातो हा अर्थ योग्य नसून जे पाहत आहात त्याच्याकडे बारकाईने पहा असा घेणे गरजेचे आहे. पण ही नजर केव्हा तयार होऊ शकते, तर प्रत्यक्ष एखादी कृती करून अनुभव घेतल्यानंतरच.

गेली काही वर्षे विद्यार्थ्यांमध्ये काम करताना असे दिसते की, प्रयोग करून पाहणे मुलांना खूप आवडते आणि म्हणून इयत्तेनुसार पाहणे काही सोप्या प्रयोगांची पेटी तयार करून शाळांमध्ये कार्यक्रम करण्याची संधी मिळाली की भाषणबाजी न करता प्रत्यक्ष कृतिशीलतेत हात घालायचा असे मी ठरवलेले असते. यामुळे विद्यार्थी काळजीपूर्वक ऐकायला बसतात. हळूहळू प्रयोगाबरोबरच अभ्यासक्रम पुढे जातो. यातूनच प्रश्नांची निर्मिती होते आणि प्रश्नांची उकल होतांना प्रयोगांना पुन्हा नवीन प्रयोग येऊन भेटतात. नवीन प्रयोगांची निर्मिती करताना साहित्य सहज उपलब्ध होईल असे पाहिले तर त्या साहित्याला कधी तोटाच नाही. अकोल्याच्या एका शाळेतील माझे काही विद्यार्थी बरणी बरणी भरून साहित्य आणू लागले. जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतसे त्यांचे प्रयोग वाढत चाललेत, प्रश्न वाढत चालले आणि खरोखरच या शाळेतील वातावरण बदलत गेले आणि आता माझ्या त्या विद्यार्थ्यांची यादी वाढत जाऊन शाळा विज्ञानमय होऊ लागल्याचे चित्र बघायला मिळाले. घड्याळी 2 तासांचे माझे व्याख्यान माझी आणि विद्यार्थ्यांची तहानभूक शमवू लागल्याचा आनंद मी पैशातही विकत न घेता येण्याजोगा आहे. गेली तीन वर्षे सातत्याने काम केल्याने या विद्यार्थ्यांचे प्रयोग कौशल्य विकसित तर झालेच, परंतु या प्रयोगांना तुलनात्मक स्वरूप येऊ लागले. प्रयोगांचे रूपांतरण प्रकल्पात होऊ लागले. त्यामुळे अभ्यास वैचारिक पातळीवर पोहचला. यातूनच निरीक्षण करण्याची पातळी उंचावली आणि प्रकल्पांना खरी चालना मिळण्यास मदत झाली.

प्रयोग करण्याची ताकद एकदा निर्माण झाली तर ती चैन पडू देत नाही हे सत्य आहे. काही ग्रामीण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एक प्रकल्प केला होता. प्रकल्प अत्यंत साधा होता, पण विचार करायला लावणारा होता. 800 ते 900 ग्रॅम मेथीच्या भाजीला 19 लिटर पाणी त्यांना लागले होते. एका मेथीच्या जुडीला 20 रुपये मोजून आम्ही मोकळे होतो तर एक लिटर मिनरल पाण्याची बाटलीही आम्ही 20 रुपये प्रतिलिटरने विकत घेतो. म्हणजे जर नुसता पाण्याचाच हिशेब केला तर मेथीला लागलेले पाणीच किती महागाचे आहे हे समजते. परंतु निसर्गाकडून फुकट मिळत असलेल्या पाण्याची किंमत आम्हाला फक्त दुष्काळ पडल्यानंतरच समजते. मात्र या मुलांना आज याची जाणीव झाल्याने ही मुलं सतर्क तर झालीच, पण त्यांना हा धडा आयुष्यभरासाठी मार्गदर्शक ठरल्याचे त्यांनी सांगितले. असे अनेक प्रकल्प मुलांना नावीण्यपूर्ण कल्पना तर देतातच त्याबरोबर परिस्थितीची जाणीवही करून देतात. आजमितीला अशाप्रकारचे अनेक प्रकल्प विद्यार्थ्यांसोबत करायला मलाही आवडते. म्हणूनच जनसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्याचे व्रत मला आनंद देत आहे. हा दृष्टिकोन जर सर्वांपर्यंत पोहोचला तर देशातील अनेक समस्या दूर होऊन देश विकसित व्हायला फार वेळ लागणार नाही आणि ‘विज्ञान दिन’ सार्थकी लागेल.

 [email protected](लेखक हे विज्ञान अभ्यासक आहेत.)