आभाळमाया – ‘चंद्र’ चिमुकला!

>> वैश्विक   

अधूनमधून अवकाशी गमतीच्या बातम्या येतात. गेले काही दिवस चर्चा आहे ती पृथ्वीच्या ‘दुसऱ्या’ चंद्राची. मुळात तो आपल्या सध्याच्या चंद्रासारखाच प्रचंड आकाराचा असता तर आश्चर्याला पारावारच राहिला नसता. चंद्राच्या आकाराचा किंवा त्यापेक्षा अगदी एक-चतुर्थांश आकाराचा ‘दुसरा’ चंद्र अचानक पृथ्वीभोवती फिरू लागला तर ती जगातल्या प्रत्येक वृत्तपत्राची आणि न्यूज चॅनलची ‘हेडलाइन’ किंवा पन्नास वेळा बोंबलून सांगण्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ होईल. अर्थात असे काही होणे नाही. म्हणजे वैज्ञानिकदृष्टय़ा ते केवळ अशक्य!

त्यासाठीचं काही गणित असतं. एखादी अचानक आलेली अंतराळी वस्तू पृथ्वीच्या 15 किलोमीटर अंतराच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत अवतरली तर ती पृथ्वीच्या वस्तुमानाच्या चंद्राइतक्या 1.2 पट यापेक्षा अधिक असता कामा नये. कारण चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. मात्र त्यावरही सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव असतोच. आता दुसरा तेवढाच म्हणजे आपल्या चंद्रासारखा पृथ्वीच्या व्यासाच्या एक-चतुर्थांश म्हणजे 3474 किलोमीटर व्यासाचा चंद्र अवचित उत्पन्न झाला तर वाटच! त्यामुळे सूर्य-पृथ्वी-चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षणात घोळ होऊन भलतंच काही होईल. या त्रयीच्या गुरुत्वाकर्षण ‘सहयोगा’विषयी नंतरच्या लेखात. अर्थात हा केवळ वैश्विक योगायोग आहे. पृथ्वी सूर्यापासून सध्या आहे तेवढय़ाच अंतरावर आणि चंद्र पृथ्वीपासून आता आहे तेवढय़ा अंतरावर कोणी ठेवलेला नाही. ती विराट निसर्गाची निर्हेतुक योजना आहे.

पृथ्वीची 15 लाख किलोमीटर गोलाकाराची गुरुत्वाकर्षण कक्षा तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर असलेल्या चंद्राला स्वतःच्या कक्षेत जखडून ठेवते. चंद्र यापलीकडे असता तर तो स्वतंत्र खुजा ग्रहच झाला असता, परंतु पृथ्वी-चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा केंद्रबिंदू किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 1100 किलोमीटर आत आहे. म्हणून चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. ही ‘व्यवस्था’ वैशिष्टय़पूर्ण आहे.

आता चर्चेचा विषय होणाऱ्या दुसऱ्या चंद्राविषयी. हे असे चंद्र म्हणजे पृथ्वीच्या 15 लाख किलोमीटर गुरुत्वाकर्षण कक्षेत योगायोगाने आलेले अशनीच असतात. मात्र ते फारच छोटे असल्याने केव्हा तरी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाबाहेर पडतात असे तात्पुरते ‘मिनी मून’ अलीकडच्या काळात नोंदले गेले. त्यांची संख्या फार नाही. मात्र पृथ्वीच्या उत्पत्तीपासून असे हजारो ‘मिनी मून’ पृथ्वीभोवती गरगरून गेले असतील. त्यांची नोंद नाही.

2006 मध्ये ‘आरएच-120’ नावाचा महापाषाण पृथ्वीभोवती वर्षभर परिक्रमा करून गेला. तो परत येईल याची शक्यता कमी. 2018 मध्ये ‘2020 सीडी-3’ हा छोटा चंद्र 2018 पासून 2020 च्या मे महिन्यापर्यंत पृथ्वीभोवती भिरभिरत होता. 2024 च्या सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यांमध्ये ‘2024-पीटी-5’ नावाचा लहानगा ‘चंद्र’ असाच पृथ्वीभोवती फेऱ्या मारून गेला आणि आता ‘2025 पीएन-7’ नावाचा चिमुकला चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करू लागला आहे. तो किंवा कॉमोओलेवा असे मोठे अशनी मुख्यत्वे सूर्याभोवतीच फिरत असतात. त्यातच ते केव्हा तरी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या सपाट्यात येतात आणि काही काळ पृथ्वीचे दुसरे चंद्र ठरतात.

सूर्य-पृथ्वी-चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षण प्रभाव क्षेत्राला ‘हिल स्फिअर’ म्हणतात. सूर्याचं ‘हिल स्फिअर’ एवढं व्यापक आहे की, ते सूर्य-पृथ्वी 15 कोटी किलोमीटर अंतराच्या 178000 ते 217000 किलोमीटर पट आहे. त्यामुळेच आपल्या पृथ्वीसह गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटोपलीकडच्या किपर अशनी पट्टय़ासह सर्वांना सूर्याभोवतीच फिरावे लागते. त्यातून त्यांची सुटका नाही.

पृथ्वीच्या ‘हिल स्फिअर’ची माहिती आधीच घेतलीय. चंद्राचे ‘हिल स्फिअर’ मात्र खूपच कमी म्हणजे केवळ 60 हजार किलोमीटर इतकेच आहे. यात ‘पकडला’ गेलेला दगड चंद्राभोवती आणि पर्यायाने पृथ्वी आणि सूर्याभोवतीही परिक्रमा करत राहील. मात्र ‘हिल स्फिअर’मध्ये आलेल्या सर्वच अवकाशीय वस्तू कायमच्या अधिक गुरुत्वाकर्षणाच्या वस्तूभोवती फिरत राहतील असं नाही. याचं कारण मोठय़ा वस्तूमध्ये त्या दोघांचं गुरुत्वाकर्षण केंद्र सामावलेलं असेल तरच ते शक्य आहे. सध्या पृथ्वीभोवतीचा ‘दुसरा’ चंद्रसुद्धा कायमचा वस्तीला आलेला नाही. तो सुमारे 62 फूट रुंदीचा पाषाण असून त्याचा पृथ्वीभोवती फिरण्याचा काळ सुमारे 128 वर्षे असल्याचं म्हटलं जातं.

2 ऑगस्ट 2025 रोजी हवाई बेटावरच्या हॅलेकाला वेधशाळेला हा पाषाण दिसला. तो पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत 8 ते 15 लाख किलोमीटरवरून फिरतो. आपला कायमी चंद्र पृथ्वीच्या कक्षेला पाच अंशाचा कोन करून फिरतो. हा नवा चंद्र केवळ 2 अंशाच्या कोनीय कक्षेत फिरत आहे. 128 वर्षांपैकी 2083 पर्यंत तो पृथ्वीकक्षेत फिरेल आणि नंतर सूर्याभोवती फिरत राहील. काही वेळा असे ‘चंद्र’ कालांतराने सूर्याभोवती अनियमित कक्षेत फिरत राहतात अथवा वातावरणाच्या घर्षणाने जळून जातात. त्यातील द्रव्य कमी कमी होऊ शकते किंवा ते महाकाय सूर्यातही विलीन होऊ शकतात. या पीएन-7 ची एक गंमत म्हणजे तो ज्या कमी कक्षेच्या गटात आहे त्याचं नाव अर्जुन! असे अनेक दुसरे चंद्र येतील नि जातील. कालांतराने त्यांचं कौतुकही राहणार नाही.

[email protected]