
>> सुरेश चव्हाण
‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’, ‘वनवासी कल्याण आश्रम’ अशा संस्थांमधून काम करताना सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन 2003 साली रंजनाताई व त्यांचे पती प्रमोद करंदीकर यांनी कर्जत तालुक्यात ‘शबरी सेवा समिती’ या संस्थेची स्थापन केली. महाराष्ट्रासह विविध राज्यांमधील आदिवासी मुलांसाठी अनेकविध सेवा व उपक्रम
संस्थेद्वारे राबवले जातात.
कालेजमध्ये असतानाच रंजना करंदीकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होत्या. त्यातूनच त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. पदवीपर्यंतचं शिक्षण झाल्यावर त्यांनी आदिवासी भागात काम करायचं ठरवलं. त्यांनी ‘वनवासी कल्याण आश्रम’ या संस्थेत पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करण्यास सुरुवात केली. 1981 ते 2016 पर्यंत ‘वनवासी कल्याण आश्रमा’त विविध जबाबदाऱया घेऊन काम केलं. आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह सांभाळण्यापासून ते आदिवासी महिलांमध्ये शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन यासाठी त्यांचं प्रबोधन करणं अशा विविध जबाबदाऱया त्यांनी पार पाडल्या. त्यानंतर अखिल भारतीय महिला सहप्रमुख ही जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यामुळे संपूर्ण भारतातील आदिवासी महिलांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
2003 साली रंजनाताई व त्यांचे पती प्रमोद करंदीकर यांनी कर्जत तालुक्यात ‘शबरी सेवा समिती’ या संस्थेची स्थापन केली. त्याचवेळी रंजनाताई ‘दृष्टी स्त्राr अध्ययन-प्रबोधन केंद्रा’च्या संस्थापक सदस्य होत्या. या माध्यमातून त्यांनी झारखंड, छत्तीसगड, ओदिशा या राज्यांतील ‘आदिवासी महिलांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर’ या विषयाचा अहवाल संबंधित राज्यांच्या सरकारांकडे सादर केला. तसेच आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर या राज्यांतील ‘महिलांची स्थिती’ याचाही सविस्तर अभ्यास करून त्याचाही अहवाल त्यांनी सरकारला दिला. त्याचबरोबर त्यांचं ‘शबरी सेवा समिती’चं कामही सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ‘कुपोषण निर्मूलन’ या कामाला प्रथम कर्जतमध्ये व नंतर जव्हार, अक्कलकुवा, धडगाव या तालुक्यांत राबवले जात आहे. संस्थेच्या प्रयत्नाने आतापर्यंत तेरा हजार दोनशे कुपोषित बालकं आज कुपोषणमुक्त झाली आहेत.
‘शबरी सेवा समिती’च्या माध्यमातून हजारो आदिवासी युवती व महिलांचं आरोग्य, शिक्षण, रोजगार स्वावलंबन या विषयांचे प्रबोधन करण्यासाठी युवती शिबिरं, सामूहिक विवाह, महिलांसाठी वाचनालय असे उपक्रम राबविले जातात.
‘शबरी सेवा समिती’तर्फे अभ्यासाव्यतिरिक्त मुलांना गोष्टींची पुस्तकं दिली जातात. ‘पुस्तक हंडी’च्या कार्यक्रमातून ही पुस्तकं वाटली जातात. केवळ पुस्तकं देऊन कार्यकर्ते थांबत नाहीत, तर मुलं पुस्तक वाचतात का, त्यांना वाचनाची गोडी निर्माण झाली आहे का, याकडेही त्यांचं लक्ष असतं. जव्हार, धडगाव, अक्कलकुवा अशा तीन तालुक्यांत तीन स्वतंत्र कार्यकर्ते काम करत आहेत. या उपक्रमातून ग्रामीण भागातील मुलांची वाचनाची आवड जोपासण्याचा ‘शबरी सेवा समिती’तर्फे प्रयत्न आहे.
मुलांच्या शारीरिक वाढीसाठी गेली सात-आठ वर्षे संस्थेतर्फे ग्रामीण भागात शालेय स्तरावर व तालुका स्तरावर सूर्यनमस्कार स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. नऊ तालुक्यांतील 335 शाळांमध्ये सूर्यनमस्कार प्रशिक्षण सराव घेतले जातात व त्यानंतर त्यांच्या स्पर्धाही भरवल्या जातात. तसेच महिन्यातून दोन वेळा मुलांच्या व मोठय़ांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरंही घेतली जातात. गेल्या वर्षभरात 44 गावांतील 2165 रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
संस्थेतर्फे महाराष्ट्रातील नऊ तालुक्यांत शिधा वाटपाचं काम चालू आहे. समाजात दुर्दैवाने काही जण असे आहेत की, त्यांची मुलं त्यांना सांभाळत नाहीत किंवा काहींना कोणीही नाही, काही अंध, अपंग, विकलांग आहेत अशांना अन्न मिळणं दुरापास्त आहे. संस्थेतर्फे कार्यकर्ते अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांना धान्य वाटप करतात. त्यांची विचारपूस करून त्यांना इतरही मदत करतात. याचबरोबर ग्रामीण आदिवासी भागातील शेतकऱयांचा मोठा प्रश्न असतो, तो पाण्याचा. हा प्रश्न सोडवण्यासाठी काही उपाययोजनाही केलेल्या आहेत. शेतीला व पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गेल्या काही वर्षांत 39 विहिरींसाठी आर्थिक मदत दिली आहे. तसेच नदीतील, डोहातील पाणी शेतीसाठी पुरविण्यास त्यातील गाळ काढून, त्यावर मोटार पंप बसवून पाईपद्वारे शेतात पाणी जाण्याची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली. यातून शेतकरी भाजीपाला, फुलं व फळांची लागवड करीत आहेत.
ग्रामीण स्त्रियांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शिवणकाम प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत केली जाते. त्यातून काही महिलांनी स्वतचा व्यवसाय सुरू केला आहे. हे एका अर्थाने आर्थिक स्वावलंबन व सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे. गेली दहा-बारा वर्षे संस्थेचे हे विविध उपक्रम राबविणारे 80 ते 85 कार्यकर्ते सतत कार्यरत असतात. संस्थेचे अध्यक्ष डॉ. निळकंठ फडके, प्रमोद करंदीकर व सचिव रंजना करंदीकर त्यांना मार्गदर्शन करत आहेत. या कामासाठी त्यांना 1994 साली पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘मातृस्मृती पुरस्कार’, इनरव्हील क्लबतर्फे ‘कल्याणी पुरस्कार’, डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचा ‘समाजसेवक पुरस्कार’ असे विविध पुरस्कार मिळाले आहेत. अशा प्रकारे आदिवासी भागात त्यांचं काम जोमाने सुरू आहे.