अभिप्राय- वेडेपणा देगा देवा

निलय वैद्य

डॉ. सलील कुलकर्णी या सृजनशील कलाकाराचे ‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ हे पुस्तक, ज्यात सलील यांनी लिहिलेल्या तीस स्फुटांचा समावेश आहे. या पुस्तकाच्या शीर्षकापासून गंमत सुरू होते. आजचे जग ही शहाणी माणसे तयार करणारी फॅक्टरी आहे. शहाणे म्हणजे भौतिक सुखाच्या मागे जिवाच्या आकांताने धावणारी, स्वार्थापोटी निबर झालेली, संवेदनशीलता, भावभावना, माणुसकी, आपुलकी गमावलेली माणसे. अशा प्रकारची शहाणी माणसे तयार करणारी फॅक्टरी बंद होऊन ‘वेडेपणाची’ निर्मिती करणारे तंत्र किंवा तंत्र तयार व्हावे अशी सलील यांची कविकल्पना आहे. जशी मोठी माणसे ‘लहानपण देगा देवा’ असे म्हणत भूतकाळात रमतात. तसे सलील यांना ‘वेडेपण देगा देवा’ असे म्हणण्याचा मोह होत असेल.

डॉ. सलील कुलकर्णी काव्य, गीत, संगीत, गायन, लेखन अशा सृजनाच्या विविध दालनांत मुशाफिरी करतात. त्यात त्यांना व्यावसायिक यश लाभलेय. तरीही ते सहजसुंदर सृजनशीलतेपासून दुरावले नाहीत. व्यक्तिगत पातळीवर त्यांनी मोठे आघात सोसले आहेत. तो त्यांचा इतिहास असला तरी ते स्वतला त्यापासून अलिप्त करू शकले नाहीत ही त्यांची खंत आहे, पण म्हणूनच त्यांच्यातील क्रिएटिव्हिटीचा ओघ अविरत सुरू आहे.

सलील यांनी या पुस्तकात समाविष्ट केलेल्या स्फुटांची शीर्षके ही वैशिष्टय़पूर्ण आहेत. वानगी दाखल द्यायची झाली तर सायंटिस्टची दारू आणि कवीचा अॅरोगन्स, किंग ऑफ डरकाळी, टाइम प्लिज, हृदयी नटावला ब्रह्मकारे, कानगोष्टी, उदासीत या कोणता रंग आहे? या शीर्षकांवरून अंदाज येतो. कुठेही शब्दांचा फाफटपसारा नाही. नेमके शब्द, छोटी पण अर्थपूर्ण वाक्ये आणि ओघावती शैली ही सलील यांची खासियत. बहुसंख्य स्फुटात त्यांनी मनावर खोल व्रण उमटवून गेलेल्या घटना मोठय़ा शिताफीने मांडल्या आहेत. त्यातली संवेदनशीलतेची नस त्यांना अलगद गवसली आहे. ती नस चाचपडत चाचपडत वाचक पुस्तकात कधी एकरूप होतो त्याचा अंदाज लागत नाही.

लहान मुले खेळता खेळता अचानक बाद व्हायची वेळ आली की, ‘टाइम प्लिज’ मागून मोकळे होतात. तसंच माणसावर कधी कधी संकटाचा वर्षाव होतो, काही सुचेनासं होतं तेव्हा ईश्वराकडे टाइम प्लिज मागण्याची सुविधा माणसाकडे असावी, असं लेखकाच्या कविमनात येतं. आणखी एक उदाहरण म्हणजे, लेखकाला आवर्जून वाटते की माणसाच्या व्यक्तिमत्त्वात आणि अभिव्यक्तीत ‘सहजपणा’ असावा. तो शिकावा संत साहित्यातून. ज्या वाङ्मयात सहजतेने कळ्यांची फुलं होतात, त्याच सहजतेने शब्दांच्या ओळी होतात आणि ओळींचे विचार, अर्थघन विचार!