ऑप्शन ग्रीक्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नरेश यावलकर, शेअर मार्केट मार्गदर्शक, rimetechnicals.com

विकल्पांची म्हणजे ऑप्शन्सची संवेदनशीलता म्हणजेच ग्रीक्स. त्याविषयी आज माहिती घेऊया…

फ्युचर्स व ऑप्शन्स हे शेअर्सची डेरिव्हेटिव्हज् आहेत. ही दोन्ही प्रकारची डेरिव्हेटिव्हज् अगदी वेगळी आहेत. जसे जर शेअर एका रुपयाने वाढला किंवा कमी झाला तर फ्युचर एक रुपयाने वाढेल किंवा कमी होईल. कारण फ्युचर्सचा डेल्टा एक (1) आहे.

ऑप्शन्सचा भाव मात्र कसा कमी किंवा जास्त होईल हे त्याच्या डेल्टानुसार ठरेल. प्रत्येक स्ट्राइकचा डेल्टा वेगवेगळा असतो. म्हणजेच ऑप्शन्सची संवेदनशीलता (ग्रीक्स) जसे डेल्टा व इतर जसे थिटा (theta), वेगा (Vega), गॅमा (gamma), ऱहो (rho) नुसार ऑप्शन्सचे भाव बदलत असतात. आज डेल्टाच्या संवेदनशीलतेबद्दल जाणून घेऊया.

शेअर्सच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलामुळे ऑप्शन्सच्या प्रीमियममध्ये (किमतीमध्ये) होणाऱ्या बदलाचे मोजमाप डेल्टानुसार करतात. शेअरच्या किमतीमध्ये क्षणाक्षणाला बदल होत असतो. शेअरच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्यास कॉल ऑप्शन्सची किंमत त्याच्या डेल्टानुसार वाढेल. प्रत्येक ऑप्शन्सचा डेल्टा ऑप्शन्सच्या मनीनेसनुसार वेगवेगळा असल्याने प्रत्येक ऑप्शन्सची वाढ वेगवेगळी होईल.

उदाहरणार्थ, जर आपण कॉल खरेदी केला असेल तर त्याची किंमत वाढली असल्याने कॉल खरेदी किमतीपेक्षा आताची किंमत वाढली असल्याने सदर कॉल विकताना आपल्याला नफा होईल. शेअरच्या किमतीमध्ये वाढ झाल्यास कॉलची किंमत वाढते. त्यामुळे कॉलचा डेल्टा पॉझिटिव्ह (+) आहे व जर कॉल विकला असेल तर कॉलच्या विक्री किमतीपेक्षा आताची किंमत वाढली असल्याने सदर कॉल आताच्या महाग भावामध्ये खरेदी करावा लागल्याने तोटा होईल.

कॉलचा डेल्टा शून्य ते एक असतो. म्हणजे काही स्ट्राइक्सचा डेल्टा शून्य असू शकतो, तर काही स्ट्राइक्सचा डेल्टा एक असू शकतो. साधारणपणे एटीएम कॉलचा डेल्टा 0.5 असतो, ओटीएम स्ट्राइकचा डेल्टा 0.50 पेक्षा कमी म्हणजे 0.40, 0.30 व खूप डीप ओटीएमचा डेल्टा 0.20 ते 0.10 असू शकतो. तसेच आईटीएम कॉलचा डेल्टा 0.50 पेक्षा जास्त म्हणजे 0.60, 0.70 व डीप आईटीएम कॉलचा डेल्टा 0.80 ते 0.90, पण जास्तीत जास्त एक असू शकतो. म्हणजे शेअरचा भाव 10 रुपयांनी वाढल्यास जो स्ट्राइक एटीएम आहे. त्याचा प्रीमियम रुपये पाचने वाढेल व ओटीएम स्ट्राइकचा प्रीमियम रुपये चार किंवा तीनने वाढेल व काहींचा अजिबात वाढणार नाही, तर आईटीएम कॉल स्ट्राइकचा भाव सहा, आठने वाढू शकतो व काहींचा प्रीमियम दहा रुपयांनीसुद्धा वाढू शकतो.

या संकल्पनेचा वापर करून ऑप्शन्सचे स्प्रेडस् घेता येतात, ज्यामध्ये दोन किंवा जास्त स्ट्राइक्सचे ऑप्शन्स वापरण्यात येतात. कधी एक कॉल खरेदी केलेला असतो तर दुसरा कॉल विकलेला असतो. तसेच डेल्टा न्यूट्रल स्ट्रटेजीज ज्यामध्ये बाजार वर किंवा खाली जात असल्यास, एकामध्ये तोटा होत असल्यास दुसऱ्यात नफा होतो. कॉल खरेदी किंवा विक्रीसोबतच पुटची खरेदी किंवा विक्री केलेली असते.

शेअरच्या किमतीमध्ये वाढ झाली असल्यास पुट ऑप्शन्सची किंमत त्याच्या डेल्टानुसार कमी होईल. त्यामुळे पुटचा डेल्टा निगेटिव्ह (-) आहे.