
आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग कथन करत आहेत ज्येष्ठ प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे…
ते वर्ष होते 1997. माझा मित्र चेतन दातारचा मला पह्न आला आणि तो म्हणाला, ‘‘आम्ही एक नाटक करतोय आणि त्यात प्रायोगिक रंगभूमीवरचे सगळे सुपरस्टार्स काम करत आहेत. नाटकाचे नाव आहे ‘रस्ते’ आणि दिग्दर्शक आहेत सत्यदेव दुबे, तर प्रकाशयोजनेसाठी मी तुझे नाव त्यांना सुचवले आहे.’’ मी चेतनला म्हटले, ‘‘अरे, मी सत्यदेव दुबेंसोबत कधी काम केलेले नाही किंवा त्यांचे कुठले वर्कशॉपही अटेंड केलेले नाही. ते मला उभे तरी करतील का?’’ यावर चेतन म्हणाला, ‘‘ते बघू आपण. तू तालमीला ये.’’ ठरल्या दिवशी मी तालमीला वेळेच्या आधीच पोहोचलो. दुबे तर त्याआधीच आले होते. चेतनने माझी ओळख करून दिली. दुबे म्हणाले, ‘‘आता चेतनने सांगितले आहे, तर मला तुला घ्यावेच लागेल. आत्ता तू तालीम बघ आणि उद्या आपण रंगीत तालीम करू.’’ हा संवाद झाल्यानंतर मी चेतनला म्हटले, ‘‘त्यांच्याकडून काही सकारात्मक घडेल असे वाटत नाही. कारण त्यांच्याबरोबर सुनील शानबाग हा त्यांचा अतिशय लाडका असा प्रकाशयोजनाकार सतत काम करत आहे.’’
दुसऱया दिवशी आमची तालीम झाली, पण दुबेंनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. मी तर अक्षरशः घाबरलो होतो. दुबे म्हणजे जमदग्नीच. आमची तालीम वगैरे झाली. आमचा पहिला प्रयोग होता भारतीय विद्या भवनला. नाटक सुरू होऊन पहिला अंक झाला. दुबे मेकअप रूममध्ये बसले होते. त्यांनी ‘‘भेटायला ये’’ असा मला निरोप पाठवला. तेव्हा अनेक प्रश्न माझ्या मनात आले. मी घाबरतच मेकअप रूममध्ये गेलो. ते म्हणाले, ‘‘शीतल, मी जवळ जवळ 30 ते 35 वर्षे नाटक करत आहे. माझे दोन मित्र माझ्या प्रत्येक नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला येतात आणि माझी चेष्टा करतात की, तांत्रिकदृष्टय़ा तुमचे नाटक अजून नीट व्हायला हवे. मग मी त्यांना सांगतो की, अरे, हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवर तुम्ही काय अपेक्षा करता? आज मात्र इतक्या वर्षांनी त्यांनी प्रथमच नाटकाच्या प्रकाशयोजनेचे काwतुक केले आणि तू त्याचा प्रमुख आहेस.’’
दुबेंचे ते दोन मित्र म्हणजे श्याम बेनेगल आणि गोविंद निहलानी! हे दोन दिग्गज त्या नाटकाच्या माझ्या प्रकाशयोजनेबद्दल माझ्याशी नंतर डिटेल्समध्ये बोलले. प्रयोग संपल्यानंतर मात्र दुबे मला बाजूला घेऊन म्हणाले, ‘‘खरे तर मी तुझे काम चॅलेंज करत नाही. पण मला थोडी शंका होती. तुझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि माझी वेगळी आहे. पण मला वाटले की तुझी पद्धत चांगली आहे, तर ती मी का स्वीकारू नये?’’ हे ऐकल्यानंतर एक गोष्ट मला जाणवली. साधारण आठ ते नऊ वर्षे मी प्रकाशयोजना करत होतो, पण मला समजत नव्हते की, आपण जे काम करतोय ते बरोबर आहे की चूक? मी माझे काम करत गेलो, पण आपण करतोय ते बरोबरच करतोय, हे दुबेंसारख्या प्रतिथयश रंगकर्मीने आणि नाटय़गुरूने मला जेव्हा सांगितले त्यादिवशी माझी ‘लाइन ऑफ अॅक्शन’ ठरली की मी हेच काम करत राहणार. या नाटकाच्या निमित्ताने श्याम बेनेगल व गोविंद निहलानी माझ्याशी बोलले आणि दुबेंनी त्यावर कळस चढवला ही माझ्यासाठी निश्चितच मोठी गोष्ट होती.
– सत्यदेव दुबे म्हणजे नाटय़कर्मींसाठी साक्षात प्रयोगशाळाच. त्यांच्याकडे काम करण्याची संधी मिळणं हाच त्यांचा खरा आशीर्वाद. दुबेंनी माझ्या कामावर विश्वास दर्शवला आणि माझ्या कामातील वेगळेपण त्यांना दिसले, यासारखी दुसरी मोठी गोष्ट कोणती असणार? आपण जे काम करतोय ते बरोबर आहे की चूक हे सत्यदेव दुबेंसारख्या प्रतिथयश रंगकर्मीने आणि नाटय़गुरूने सांगणं हे माझ्या कामासाठी पुढे ‘लाइन ऑफ अॅक्शन’ ठरले. आयुष्यात अशा संधी फार कमी मिळतात. मित्र चेतन दातारमुळे हे सारं घडून आलं आणि माझ्या आयुष्याला खऱया अर्थाने कलाटणी मिळाली.
शब्दांकन – राज चिंचणकर


























































