शिरीषायन – दु:ख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

सहज हसत होतो. दुःखाला.
त्याला साल्याला काय वाटलं, मी घाबरतो त्याला? त्याच्यापासून दूर पळतो? त्याची पावलं ऐकू आली की भयभीत होतो? ते नको म्हणून देवासमोर नाक घासतो? ईडा, पीडा टळो, अशी प्रार्थना करतो?

प्रत्येक जण दुःखाविरुद्ध आपले मोर्चे बांधतो, आपली शस्त्र्ाs परजतो. आपले खंदक खणतो. आपली सुरक्षाव्यवस्था बळकट करतो. प्रत्येक वेळी दुःख जिंकत आलंय हे विसरायचा भगीरथ प्रयत्न करतो.

दुःखाला बरोबर घेऊन जगायला कोणीच शिकवत नाही. दुःखाला हरवा किंवा तुम्ही हरा. दोनच पर्याय तुमच्यापुढे असतात. पैकी दुःखाला हरवा हा पर्याय केवळ कागदावर व थिअरीत असतो. दुःखापुढे हरा, रडा, भेका, शरण जा व रडतकुंथत जगा.

काही लोकांची दुःख हाताळण्याची पद्धत न्यारी असते. ते दुःखाशी वैर न करता मैत्री करतात. या मार्गाने दुःख नामोहरम होईल, आपली विषारी नखे गमावून बसेल अशी त्यांची भाबडी भावना असते. ते दुःखाला गोंजारत बसतात. त्याचे लाड करतात. या अघोरी मार्गाने आपण दुःखातून बाहेर येऊ असा स्वतःचा समज करून देतात. प्रत्यक्षात ते दुःखाला जिवंत व ताजेतवाने ठेवत असतात. मनातील विषाला खतपाणी घालतात. शेवटी दुःख आपला दावा साधतंच.

अनेकदा ऐकलेली गाणी मी आज नव्यानं ऐकतो आणि माझे तेच ते जुने डोळे पाझरायला लागतात. मला काही कळतच नाही. मला वाटतं संगीतातली प्रगल्भता वाढल्यानं आजवर न कळलेली गाण्यातील सौंदर्यस्थळे मला दिसतायत, जाणवतायत, भिडतायत. आपसूक माझे डोळे रडायला लागतात. नाना पाटेकरनं माझे विचार खोडून काढले. तो म्हणाला, ‘तसं नाहीय. आता तुझा दुःखांशी चांगला परिचय झालाय. तू दुःखात होरपळलायस, कळवळलायस. आता एखाद्या गाण्यातील एखादी जागा तुझ्यातल्या दुःखाला स्पर्श करते. ते तडपून उठतं. तुला अश्रू रोखणं अशक्य होतं. रडून तुला थोडं हलकं वाटतं…’

असेल बाबा, असेही असेल.

मृत्यू कधी दाणदाण पावले आपटत येतो. कधी पावलांची चाहुलही न लागू देता येतो. महान ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक रॉडनी मार्श गेला. त्याचा शोकसंदेश पाठवून पाठोपाठ शेन वॉर्न गेला. कलाकार अरुण जोगळेकर सप्रे नावाच्या मित्राच्या घरी राहायचा. एकदा अरुण बाहेरून आला. त्याला सप्रे म्हणाले- ‘अरे, अमक्यातमक्याचा तुला फोन आला होता.’ अरुण लगेचच फोनपाशी गेला आणि तिथेच कोसळून पडून गेला.

माझी सव्वीस वर्षांची आई कशानं गेली हे तिच्या डॉक्टर नवऱयालाही कळलं नाही. तिनं जायचं एवढं नियतीनं लिहून ठेवलं होतं. कशामुळे एकाएकी गेली यावर बोलायला आम्हाला आयुष्य पडलं होतं. त्यासाठी नियतीनं आम्हाला जगत ठेवलं. कोणीतरी मला सांगत होतं की, तिला अस्थमा होता. माझी आजी मला सांगत होती की, तिच्या पोरीच्या नखात रोग नव्हता. अण्णा यावर एकही शब्द कधी बोलले नाहीत. मी आहे म्हणजे माझी आई कधीतरी जगात असली पाहिजे असा तर्कशुद्ध निष्कर्ष काढायला मला त्यांनी मोकळं सोडलं होतं.

दुःखात कमी-जास्त, लहान-मोठं असतं का? नोकरी गेल्याचं दुःख मोठं की आईबाप गमावल्याचं दुःख मोठं? शारीरिक पीडेचं दुःख मोठं की मानसिक क्लेशाचं दुःख मोठं? दुःखाची तीक्रता कमी करता येते का? दारू हा त्यावरचा मार्ग आहे का? नशा उतरल्यावर दुःख दुप्पट वेगानं मेंदूचा कब्जा घेत नाही का? शिवाय दारूचे देहावर अन्य दुष्परिणाम होत नाहीत का? मुळात दुःखापासून पळवाट असते का? दुःखाची तीक्रता मोजण्याचं परिमाण अद्याप निघालेले नाही. नाही निघालं तेच बरं; नाही तर माणसं तुझ्या दुःखापेक्षा माझं दुःख मोठं अशी अहमहमिका करण्यात कमी करणार नाहीत.

दुःख ही जीवनातील खुमारी वाढवत असतील की संपवून टाकावं हे दुःसह जीवन ही अघोरी विचारसरणी प्रबळ करत असतील! याचं उत्तर मिळवण्यासाठी ज्यानं त्यानं आपल्या मनात डोकावून पाहावं. दुःखानं त्यांना पराभूत केलंय की लढवय्या केलंय? मनाचा एक कोपरा होरपळून गेला असेल तर उरलेला भाग पूर्णपणे जीवन उपभोगत असेल? दुःख असं स्वतःपासून वेगळं करता येतं? काही माणसं दुःखाला पूर्णपणे, शरण गेलेली आढळतात. ती भेटली, बोलली की आपण परिचित माणसाला नाही तर त्यांच्या दुःखाला भेटत आहोत, त्यांच्या दुःखाशी बोलत आहोत असंच वाटत राहातं आणि दुःख दडवून आपल्याशी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करतात ती माणसं आपल्याला खोटी वाटत राहतात. इतरांना अशी दूषणे देऊन आपण आपलं दुःख कुरवाळत बसतो. आपण जगू किंवा मरू, आपलं दुःख जिवंत राहिलं पाहिजे.

मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे सहज हसत होतो. दुःखाला का काही कळत नाही. एकाएकी डोळय़ात पाणी आलं आणि येतच राहिलं..

– [email protected]