प्रासंगिक – शेगावीचा राणाः श्री गजानन महाराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वामन देशपांडे

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे माघ वद्य सप्तमी, शके 1800,  अर्थात 23 फेब्रुवारी 1878 या पवित्र दिवशी श्री गजानन महाराज शेगाव या विदर्भातल्या एका छोटय़ाशा गावात अचानक प्रगट झाले. तेव्हा त्यांचे वय अंदाजे तीस-बत्तीस वर्षांचे होते आणि ते समाधीस्थ झाले ते भाद्रपद शुद्ध पंचमी शके 1832, गुरुवार, 8 सप्टेंबर 1910. बत्तीस वर्षे त्यांनी आपले अवतारी आयुष्य शेगावातच झंकारत ठेवले आणि छोटय़ा शेगावला जगाच्या नकाशावर ठळक केले. महाराजांच्या अखंड वास्तव्यामुळे शेगाव हे ‘विदर्भाची पंढरी’ म्हणून तेव्हापासून ओळखले जाऊ लागले.

जैसी विठ्ठलाची पंढरी।

तैसी गजाननांची नगरी।।

होता शेगावी वारी।

संत भक्ताने उद्धारी।।

चराचरातही भरले आहे ब्रह्म।

मनी आणा, अन्न हे पूर्णब्रह्म।।

नासू नका हे अन्न तुम्ही कधी।

भुकेल्यास परी ते द्या आधी।।

शेगावातल्या देविदास पातुरकरांच्या वाडय़ासमोरच्या विशाल वटवृक्षाखाली महाराज अचानक प्रगट झाले. मध्यान्हीची वेळ होती. पातुरकरांच्या सुनेच्या ऋतुशांतीनिमित्त पातुरकरांनी गावभोजन घातले होते. पंक्तीमागून पंक्ती उठत होत्या. वाडय़ाबाहेर उष्टय़ा पत्रावळींचा खच पडला होता. त्या पत्रावळींमधली उष्टी शिते खात महाराज बसले होते. वटवृक्षाखाली महाराजांच्या रूपाने जणू आकाशीचा सूर्य खाली उतरला होता असे वाटावे एवढे तेज पसरले होते. त्यांच्या जवळ चिलीम आणि एक मातीचे भांडे होते. महाराज तर ते उष्ट अन्न खाण्यात विलक्षण दंग झाले होते. बंकटलाल अगरवाल यांनी महाराजांना प्रथम पाहिले. लोखंड चुंबकाकडे खेचले जावे तसे बंकटलाल महाराजांच्या दिशेने अक्षरशः खेचले गेले. त्यांच्याबरोबर दामोदरपंत कुलकर्णीसुद्धा होते. त्यांना श्री महाराजांचे प्रथम दर्शन झाले. महाराजांचे वेगळेपण त्यांना प्रथमदर्शनीच जाणवले हेते. हा पुरुषोत्तम आत्मज्ञानी आहे, याची त्यांना खात्री पटली. अक्कलकोट स्वामी महाराजांना प्रगट होताना प्रथम ज्या लाकूडतोडय़ाने पाहिले होते, तसेच भाग्य बंकटलाल अगरवाल यांना लाभले होते. महाराजांनी प्रगट होतानाच अन्नाचे आणि अन्नदानाचे महत्त्व अधोरेखित केले होते. इतकेच नव्हे तर अन्नाची नासाडी करू नका, अन्न हे पूर्णब्रह्म आहे याची जाणीव देणारे, अद्वैत ज्ञानाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवणारे महाराज हे अलौकिक पुरुष होते. महाराज हे योगीयांचे राणा होते.

जे जे भेटे भूत।

ते ते मानिजे भगवंत।।

हे तत्त्व समाजात रुजवणारे गजानन महाराज म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच होते. महाराज लीलावतारी होते. महाराजांचे अलौकित्व, संतकवी दासगणू महाराज यांनी आपल्या ‘श्री गजानन विजय’ या ओवीबद्ध चरित्रात शब्दबद्ध केलेले आहे. वारकऱ्यांना जशी ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची अभंगगाथा अत्यंत प्रिय तसे ‘श्री गजानन विजय’ सर्व भक्तांना अत्यंत प्रिय आहे. लक्षावधी परमभक्त या ग्रंथाचे नित्य पारायण करतात. एकवीस अध्यायी ‘श्री गजानन विजय’ अत्यंत ओघवत्या भाषेत प्रकट झालेला आहे. अनेकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या महाराजांचे लोकमान्य टिळक निस्सीम भक्त होते. ‘गीतारहस्य’ हा अलौकिक ग्रंथ टिळक मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी लिहिला होता. लोकमान्य टिळक म्हणतात, ‘हा ग्रंथ केवळ गजानन महाराजांच्याच कृपेने सिद्ध झाला…’

डॉ. उन्मेष कुलकर्णी हे महाराजांचे निस्सिम भक्त आहेत. शेगाव ही त्यांची पंढरी आहे आणि ‘श्री गजानन विजय’ ही त्यांची गीता आहे. लोकमान्य टिळकांनी गीतेवर अप्रतिम भाष्य लिहिले ते ‘गीतारहस्य’ आणि ‘श्री गजानन विजय’ या ओवीबद्ध चरित्रावर अप्रतिम भाष्य लिहिले गेले ते आजच्या एकविसाव्या शतकातल्या जाणीवविश्वला कवेत घेत़ डॉ. उन्मेष कुलकर्णी यांनी या भाष्याच्या माध्यमातून ‘श्री गजानन विजय’ या शाश्वत ग्रंथाचे आकलन कसे करावे ही नवी दिव्यदृष्टी दिली ती ‘श्री संत गजानन महाराजांची शिकवण’ या अप्रतिम ग्रंथातून. महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या विविध प्रसंगांमधून आपण काय शिकायला पाहिजे याचे भाष्यवजा दर्शन या ग्रंथाचे प्रधान वैशिष्टय़ आहे. आजच्या तरुण वाचकांना महाराजांचे केवळ चरित्र कळावे हा डॉ. कुलकर्णी यांचा लेखनापाठीमागचा हेतू नाही, तर त्या प्रत्येक प्रसंगातून महाराजांनी सर्वांना काय प्रेरणा दिली आहे याचा वेध हेच या ग्रंथाचे प्रधान वैशिष्टय़ आहे.