लेख : प्रासंगिक : कृष्ण जन्माष्टमी आणि परंपरा

>> वृषाली पंढरी

हिंदुस्थानच्या विविध प्रांतांत हा उत्सव साजरा करण्याच्या विविध परंपरा पाहायला मिळतात. हा उत्सव हिंदुस्थानात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. ओडिशामध्ये दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. गोकुळाष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची प्रथा आहे. गुजरातमध्ये ‘सातम’ म्हणजे सप्तमीच्या दिवशी पैसे लावून किंवा तसेच दिवसभर पत्ते खेळतात. मध्यरात्री 12 वाजता पत्ते बंद करून कृष्णजन्माचा उत्सव सुरू करतात. मध्य प्रदेशात आणि उत्तर हिंदुस्थानच्या बऱ्याचशा भागांत पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी त्यांची भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. या दिवशी कित्येकांच्या घरी गोकुळ-वृंदावनाचा देखावा तयार करून जन्मोत्सव साजरा करतात. वैष्णव लोक तर हा दिवस विशेष भक्तीने पाळतात. वृंदावन येथे या दिवशी दोलोत्सव असतो. याच दिवशी कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वाची संकल्पना रासलीलाचे सादरीकरण केले जाते.

श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवसाला गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी म्हटले जाते. अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर पाना-फुलांनी सुशोभित करतात. त्या स्थानी देवकीचे सूतिकागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि कृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. दुसऱ्या बाजूला यशोदा आणि तिची नवजात कन्या, वसुदेव, नंद, यांच्या मूर्ती बसवितात. सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करतात व सहपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात. रात्री कथा, पुराण, नृत्य,गीत इ. कार्यक्रमांनी जागरण करतात.

गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवसाचे खास आकर्षण म्हणजे दहीहंडी. महाराष्ट्र सरकारने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. तसेच दहीहंडीमध्ये 14 वर्षांखालील मुलांना रोखण्याचा नियम वगळता न्यायालयाने मानवी मनोऱ्याच्या उंचीचे निर्बंधही उठवले होते. त्यानंतर उत्सवाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून आयोजक आणि गोविंदांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन दहीहंडी समन्वय समितीने केले होते.

हिंदुस्थानातील धर्म, धार्मिक श्रद्धा आणि प्रथा विविधतेने नटलेल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर गेल्या 70 वर्षांत पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा विशेषतः हिंदूंच्या कशा चुकीच्या आहेत हे पटविण्यात तथाकथित कम्युनिस्ट विचारवंत व काही राजकीय पक्ष हिंदूंमधील जातींच्या उतरंडीमुळे काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते आहे. अशा या सामाजिक दृष्टीने गढूळ होऊ पाहणाऱ्या हल्लीच्या वातावरणात साहसी खेळाचा दर्जा मिळालेला दहीहंडीचा सण केवळ तो हिंदूंचा आहे असे पूर्वग्रहदूषित पद्धतीने न पाहता सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन साजरा केला पाहिजे. या उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. कृष्ण जयंतीचा उत्सव हिंदुस्थानात सर्वत्र साजरा होतो, पण महाराष्ट्रात विशेषतः कोकण, मुंबई, ठाणे, पुणे इथे उत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला होतो व त्याचे सेवन करून उपवास सोडला जातो. ‘गोविंदा आला रे आला’ असे गाणे गात अनेक लहानथोर पुरुष घरोघरी नाचत जातात व दहीहंडी फोडतात. दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होतो. यंदादेखील होईल, पण यावेळी राज्याच्या काही भागातील दुष्काळ आणि सांगली-कोल्हापूरमधील महापूर, आर्थिक आणि औद्योगिक मंदी यांचे सावट या सणावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या