
>>विवेक दिगंबर वैद्य
नाथपरंपरा, दत्तपरंपरा आणि वारकरी संप्रदायाची सांगड घालणाऱया ‘ज्ञानमंदिर’ गुरूपीठाचे सद्गुरू श्रीबाळाभाऊ महाराज पितळे यांचा परिचय करून देणारा लेख.
सन 1569. नागपूर येथील श्यामराज पितळे नामक सद्गहस्थाला, त्याचे आराध्यदैवत श्रीनृसिंहाचा, ‘महंकावती (सध्याचे मेहकर, जि. बुलढाणा) येथील भुयारात मी बंदिस्त आहे व तेथून मला तू बाहेर काढ.’ असा स्वप्नदृष्टांत झाला. या दृष्टांतामध्ये सूचित केलेल्या जागेचा शोध घेत मेहकर येथे माळीपेठ परिसरात आलेल्या श्यामराज यांनी तेथे खोदकाम केले असता हेमाडपंथी धाटणीच्या भुयारामध्ये त्यांना श्रीनृसिंहाची तेजस्वी मूर्ती आढळली. (सुस्थितीतील हे भुयार आजदेखील मेहकरच्या माळीपेठ परिसरामध्ये पाहावयास मिळते.)
पुढे 12 वर्षांनी सन 1581 मध्ये श्यामराज पितळे यांनी मेहकर येथे त्यांच्या राहत्या घरी श्रीनृसिंहमूर्तीची विधिवत स्थापना करून शास्त्रशुद्ध उपासना सुरू केली. आजही मेहकर येथे ‘नरहरी श्यामराज महाराज की जय!’ अशा नामगजरात त्यांचे गौरवपूर्ण स्मरण केले जाते. त्यांच्यानंतर पितळे घराण्याच्या नवव्या पिढीमध्ये श्रीनृसिंहाने साक्षात ‘ॐ ब्रह्मी श्वासानंद सरस्वती’ रूपाने अवतार घेतला.
प्रल्हादपंत आणि काशीबाई पितळे यांच्या पोटी ज्येष्ठ शुक्ल तृतीया शके 1810 सन 1888 मध्ये श्वासानंद सरस्वती जन्म घेते झाले. जन्मतः छातीवर ॐकाराचे चिन्ह असलेल्या या बाळाच्या देहास चंदनी सुगंध येत असे. सात मुलींच्या पाठी जन्मास आल्यामुळे बाळाचे नाव ‘गोपाळकृष्ण’ ठेवण्यात आले. मातापित्याचा लाडका ‘बाळ’ आणि सवंगडय़ांना प्रिय असणारा हा ‘भाऊ’ मोठेपणी ‘बाळाभाऊ’ या प्रेमळ संबोधनाने प्रसिद्धीस आला. जन्मजात साधुवृत्ती बाळगणाऱया बाळाभाऊला मेहकर येथे वास्तव्यास असलेले दावल मलिक साधू श्रीबालानंद महाराज यांचे अपार प्रेम लाभले. बाळाभाऊंचा जन्म होताच ‘देव आले… दैन्य पळाले’ अशी शुभसूचक ग्वाही देत आनंदाने गावभर धावत सुटलेले श्रीबालानंद पुढे या लहानग्या बाळास खेळवत, खांद्यावर बसवून फिरवत आणि गावकऱ्यांना बाळाभाऊच्या पाया पडावयास लावत असत. बाळाभाऊंमध्ये सुप्तावस्थेत असलेले संततत्व श्रीबालानंद महाराजांनी ओळखले होते.
प्रल्हादपंतांच्या अकाली जाण्यामुळे पितृछत्र हरपले तेव्हा बाळाभाऊंनी थेट श्रीनृसिंहदेवाला आपलेसे केले. वडिलांप्रमाणेच श्रीनृसिंहाची नेमनियम आणि नित्य उपासना निष्ठापूर्वक करणारे बाळाभाऊ श्रीनृसिंह भुयारात दोन-दोन दिवस ध्यान लावून बसत असत. श्रीनृसिंहाची पूजाअर्चा झाल्यावर ते पाण्याचा तांब्या घेऊन निघत आणि त्या पाण्याने गावामधील अन्य मंदिरातील देवांची पूजा करीत असत तरीही तांब्यातील पाणी कमी होत नसे. त्यांच्या या लीलांचा अनुभव मेहकरवासीयांना अनेकदा येता झाला तेव्हा जुन्याजाणत्या ग्रामस्थांनाही बाळाभाऊंमधील संततत्त्वाची ओळख पटली. उपनयनादी संस्कारांनंतर बाळाभाऊंचे नाव शाळेत घालण्यात आले तरीही त्यांनी धूळपाटीवर ‘हरी हरी’ या शब्दाखेरीज अन्य कोणताही शब्द लिहिला नाही.
एकदा शाळेमध्ये अण्णासाहेब टिळक नावाचे शाळा तपासनीस आले. त्यांनी मुलांना एक परिच्छेद लिहावयास सांगितला. अन्य मुले अण्णासाहेबांच्या सांगण्यानुसार लिहीत असली तरीही बाळाभाऊ मात्र ‘हरी हरी’ असेच लिहीत होते. हे पाहून अण्णासाहेबांनी रागाने बाळाभाऊंना विचारले, ‘हे काय लिहितोस? मी काय सांगितले ते ठाऊक आहे का तुला?’ त्यावर अण्णासाहेबांनी सांगितलेला परिच्छेद बाळाभाऊंनी जसाच्या तसा म्हणून दाखवला हे पाहून अण्णासाहेब आश्चर्याने थक्क झाले.
उमरखेडच्या श्रीगोचरस्वामींचे शिष्य आणि नाथ संप्रदायातील थोर सत्पुरुष श्रीरंगनाथ महाराज ऊर्फ श्रीआनंदी आत्मानंद सरस्वती यांच्याकडे अण्णासाहेब टिळक यांचे येणेजाणे असे. श्रीरंगनाथांचे दर्शन घेण्यासाठी अण्णासाहेब मेहकर येथून जाण्याची तयारी करीत होते तेव्हा एकाएकी बाळाभाऊंच्या मनात अण्णासाहेबांच्या सोबत देऊळगावराजा येथील आनंदवाडी मठात जाण्याची इच्छा निर्माण झाली. अण्णासाहेबांनी बाळाभाऊंना तसे न करण्याविषयी सांगितले, मात्र बाळाभाऊंनी आपला हेका सोडला नाही. ते अण्णासाहेबांच्या बैलगाडीमागे धावू लागले. हरेकप्रकारे समजूत घातली तरी बाळाभाऊंचे मन गुरूभेटीसाठी व्याकूळ झाले होते.
अखेर बाळाभाऊंनी श्रीनृसिंहाचा जयघोष केला आणि यापूर्वी कधीही न पाहिलेल्या आपल्या सद्गुरूच्या शोधार्थ ते आनंदवाडीच्या दिशेने निघाले. आठ वर्षे वयाच्या बाळाभाऊंनी रात्रीच्या गर्द अंधारातून खडतर मार्ग कापीत जवळपास 30 कोस अंतर धावत पार केले आणि दुसऱया दिवशी सकाळी ते आनंदवाडी मठात पोहोचले. याचदरम्यान इथे आनंदवाडी मठामध्ये श्रीरंगनाथ महाराज त्यांच्या शिष्या आनंदीमाईंना सांगत होते की, ‘माई, या रंगनाथाकरता येडं झालेलं एक लेकरू धावत पळत येतय’ आणि काही वेळातच फोड येऊन सुजलेल्या पायांनिशी धापा टाकीत बाळाभाऊ मठात पोहोचले. एकमेकांशी नजरानजर होताच श्रीरंगनाथ महाराजांनी बाळाभाऊंना छातीशी कवटाळले. गुरूभेटीमुळे सद्गदित झालेल्या बाळाभाऊंच्या डोळय़ांतून अश्रूंचा अनावर ओघ वाहता झाला.
पुढे श्रीरंगनाथ महाराजांनी बाळाभाऊंना विधिपूर्वक अनुग्रह दिला अन् कुळाचार, व्रतोत्सव, पंढरीची वारी, चातुर्मास तसेच नामसप्ताह करण्यास सांगितले. सर्व कसोटय़ा पार करणाऱया बाळाभाऊंना श्रीरंगनाथांनी पुढे विवाह करावयास सांगितला व त्यांना चारही आश्रमांचे पालन केल्यानंतर संन्यास घेण्याची आज्ञा दिली. निर्लेप, निरपेक्ष भावाने अन् संन्यस्त वृत्तीने आयुष्य व्यतित करणारे बाळाभाऊ आळंदी येथे वारीकरिता गेले असतांना सन 1915 मध्ये श्रीरंगनाथ महाराजांनी समाधी घेतली. श्रीगुरुछत्र हरपले. श्रीरंगनाथांनी, श्रीसदानंद महाराज आणि आनंदीमाईंच्या साथीने हंससंप्रदायाची मुहूर्तमेढ रचली. त्यास संतश्री बाळाभाऊ यांनी स्थिरता दिली.
संतश्री बाळाभाऊंनी नाथपरंपरा, दत्तपरंपरा अन् वारकरी संप्रदायाची सांगड घालणाऱया ‘ज्ञानमंदिर’ उभारले. दरम्यान, बाळाभाऊंमधील ईश्वरीय तत्त्वाचे अलौकिक दाखले हजारो भक्तांनी अनेकदा अनुभवले. पुढे बाळाभाऊंनी संप्रदायासाठी ‘स्वादिष्ट स्वानुभव सुस्वर नाद’ तसेच ‘कैवल्य’ आणि ‘हरि ॐ’ या अलौकिक ग्रंथांची रचना केली आणि काही काळानंतर मुर्डेश्वर येथे ॐ कारपीठ स्थापन करून तेथेच त्यांनी परमहंसपदाची दीक्षा घेत ‘ॐ ब्रह्मी श्वासानंद’ हे नाव धारण केले. 1930 सालच्या पौष मासात संजीवन समाधी घेणाऱया संतश्री बाळाभाऊ महाराजांची आध्यात्मिक परंपरा श्रीदत्तात्रय आणि श्रीदिगंबर या सत्पुरुषांनी पुढे नेली. संतश्री बाळाभाऊ यांचे पणतू आणि हंस संप्रदायाचे विद्यमान श्रीगुरुपीठाधीश श्रीरंगनाथ महाराज पितळे यांनी ‘श्वासानंद माऊली’ ग्रंथातून हा समग्र चरित्रपट उलगडलेला आहे.



























































