
>> ऋता कळमणकर
समुद्रसपाटीपासून साधारण 12000 ते 14500 फुटांवर राहणारा, अतिशय दुर्मिळ नष्ट होण्याच्या भीतीने ग्रासलेला, अंगावर 5 इंच ते 12 इंच इतकी फर असलेला हिमालयीन ग्रे घोस्ट ज्याला म्हणतात तो हिमबिबटय़ा पाहण्याची त्याचसोबत ब्ल्यू शीप तसेच हिमालयन रेड फॉक्स अशा अनेक प्राण्यांना पाहण्याची संधी मिळाली… शारीरिक क्षमतेचा कस लावणारी ही स्पिती व्हॅलीची सफर. उणे 30 अंश सेल्सिअसपर्यंत घसरणारा पारा, हायअल्टिटय़ूडचा त्रास व अतिशय थंडी, अगदी बेसिक घरगुती ठिकाणी वास्तव्य, परंतु दुर्मिळ असं हिमबिबटय़ाचे दर्शन यामुळे याचा त्रास जाणवला नाही.
तीन दिवसांचा प्रवास. दुसरा मुक्काम टाबो नावाच्या चिमुकल्या अतिशय पुरातन मोनेस्ट्री असलेल्या गावी, तेनसिंग नावाच्या मुलीच्या घरी होता. त्यामुळे तेथील स्त्र्ााrजीवन पाहण्याची संधी मिळाली. सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी तिच्यासोबतच गावात फिरून आले. तिसरा दिवस किब्बर या स्पिती नदीच्या परिसरात मुक्काम होता. वातावरणाशी जुळवून घेण्यात दोन दिवस गेले. दुसऱया दिवशी संध्याकाळी हिमालयीन रेड फॉक्स बर्फावर चालताना पाहण्याची संधी मिळाली. त्रिकोणी कान, झुबकेदार शेपूट, चमकणारे डोळे आणि डोळ्यात भरणारा रंग असा देखणा हा कोल्हा. परतत असताना दूरवर ibex हा वळणदार शिंगांचा आणि टोकदार दाढी असलेला प्राणी पाहण्यात आला. हा प्राणी समूहाने राहतो, तर कोल्हा एकटा दुकटा आढळतो. आता प्रतीक्षा होती ती हिमबिबटय़ाची…
चार दिवस काहीही खबर नव्हती. पाचव्या दिवशी किब्बरपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर बिबटय़ा दिसल्याची खबर आली. पोहोचायला दीड तास तरी लागणार होता. तोपर्यंत तो तिथेच असेल का? पाहता येईल का? फोटो मिळतील की नाही? हे सर्व प्रश्न मनात ठेवून निघालो. दीड तासाने गाडीचा प्रवास संपला आणि समजले की दूरवर बर्फातून चालत साधारण 3 किलोमीटर अंतरावर बिबटय़ा झोपला आहे. चालताना रस्त्यात काही येणारे लोक भेटले. त्यांनी सांगितले खूप लांब आत झोपलाय. काहीच फोटो मिळत नाहीयेत. थोडी निराशा झाली, परंतु खुद्द जाऊन खात्री करून घेणे योग्य वाटले. अतिशय दमणुकीच्या चालण्यानंतर नंतर दोन पिल्ले व एक मादी आहे असे कळाले. प्रत्यक्ष पाहिले तेव्हा खूप दूरवर वरच्या दगडी गुहेत मादी झोपली होती व पिल्ले खालच्या बाजूला बसून होती. दुपारी बारा वाजल्यापासून हेच दृश्य सायंकाळी पाच वाजेपर्यंत होतं. दुपारी चार वाजल्यानंतर थंडीचा कडाका वाढला होता. बिबळे हे रात्री ऍक्टिव्ह असणारे प्राणी. त्यामुळे ते पूर्ण दिवस झोपूनच काढतात. कडेकपाऱयात बिबळ्या शोधणे हे एक दिव्यच. सायंकाळी पाच-सवा पाचला परतीची वेळ झाली. लाइटही कमी होत होती. हे तिघे एकत्र येतील व काही फोटो काढता येतील हे आता शक्य वाटत नव्हते. ट्रायपॉडवरून कॅमेरा काढला. परतीची तयारी केली. तितक्यात आई खाली आली व तिघे मिळून परत दिसेनासे झाले. दुसऱया दिवशी किब्बर गावाजवळील परिसरात बिबळ्या असल्याची बातमी होती. कालइतकंच चालणं होतं. अवघड प्रवास आज पण परत करायला लागणार होता, आजही दिवसभर दूरवरून त्याच्यावर नजर ठेवून होतो, परंतु दिवस मावळायला लागल्यानंतर त्याने हालचाल केली. दुर्मिळ असा हा प्राणी पाहिल्याचे समाधान मनात घेऊन परतलो. अंगावर 5 इंच ते 12 इंचांपर्यंत फर असलेला, करडय़ा रंगाचा अंगावर काळे ठिपके, पण चेहरा वाघासारखा. मुळातच ज्याला देवानेच बर्फात चालण्यासाठी मजबूत जाड बूट घातल्याप्रमाणे पाय दिलेले असा हा दुर्मिळ प्राणी बर्फावरून चालताना पाहण्याचा योग आला. टूरचे सार्थक झाले.




























































