ठसा : प्रा. विठ्ठल बन्ने

>> भालचंद्र मगदूम

उपेक्षित आणि वंचितांसाठी आयुष्य पणाला लावणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विठ्ठल बन्ने सरांनी अखेरचा श्वास घेतला अन् महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात, कोल्हापूर जिह्यातील गडहिंग्लजमध्ये राहून सामाजिक चळवळींना, कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना ऊर्जा देणारा बिनीचा कार्यकर्ता हरपल्याची भावना सर्वदूर उमटली. गेल्या काही दिवसांपासून आजारी असणाऱ्या प्रा. बन्ने सरांनी वयाच्या 87 व्या वर्षी गडहिंग्लज येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अत्यंत प्रतिपूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. कोल्हापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच त्यांचा राष्ट्रसेवा दल आणि समाजवादी परिवाराशी संबंध आला. सुरुवातीला काही काळ त्यांनी गोव्यात आणि त्यानंतर गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम केले. दरम्यान, देवदासी, कोल्हाटी-डोंबारी, धनगर समाजासह उपेक्षित आणि वंचितांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी हयातभर संघर्ष केला. राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, अंधश्रद्धा निर्मूलन यांसह विविध सामाजिक चळवळीत ते अखेरपर्यंत सक्रिय होते. प्रारंभी काही वर्षे त्यांनी माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्यासोबत जनता पक्ष, जनता दल, त्यानंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब पुपेकर यांच्याबरोबर राष्ट्रवादीत काम केले. त्यांचे नाव देवदासी चळवळीशी जोडले गेले, ते त्यांनी देवदासी प्रथा निर्मूलनासाठी केलेल्या भरीव कामामुळे. देवदासीची रूढी ही अज्ञान-अंधश्रद्धेची मुळे खोलवर रुजलेल्या, बुरसटलेल्या समाजाला लागलेली कीड आहे. अनेक पिढय़ा या आजाराने पोखरल्या, पंगू केल्या. माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार या पुप्रथेने नाकारला. अशा हजारो स्त्र्ाया काळोखात ढकलल्या गेल्या. व्यवस्थेने असहाय महिलांना ‘देवाची दासी’ बनवत त्यांच्या पायात आपल्या हव्यासाचे जोखड बांधले. या प्रथेविरोधात प्रा. विठ्ठल बन्ने यांनी आवाज उठविला. या अशिक्षित, रूढीवादी, अज्ञानी महिलांचे संघटन केले. सन 1975 मध्ये देवदासी परिषद घेऊन समाज आणि सरकारचे या जटील प्रश्नाकडे लक्ष वेधले. प्रथेविरोधी कायदा करण्यास भाग पाडले. शासनाच्या अभ्यास गटाचे ते सदस्य होते. त्यांनी देवदासींच्या पुनर्वसनाचा सतत आग्रह धरला. आश्रमशाळा काढली. गडहिंग्लज येथे देवदासी मुलांचे वसतिगृह सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. देवदासींची पुढची पिढी शिक्षणाच्या मार्गावर यावी यासाठी प्रयत्न केले. हातात कात्री घेतली आणि जटा निर्मूलनासाठी ते उभे राहिले. सेवाभावी वृत्तीने काम करणारे तरुण कार्यकर्ते तयार केले. देवदासींच्या डोईवरचा दास्यत्वाचा ‘जग’ मोठय़ा निर्धाराने उतरवला. अशा हजारो स्त्र्ाया समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्या. याचे सारं श्रेय निःसंशय प्रा. बन्ने यांचेच. गडहिंग्लजमधून सुरू झालेल्या चळवळीमुळे देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसनासाठी महाराष्ट्र सरकारने अभ्यास गट नेमला होता. त्याचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. चळवळीमुळे देवदासी प्रथा बंद झाली, परंतु कायदा होऊनही देवदासींचे पुनर्वसन होत नसल्याने ते व्यथित होते. राष्ट्रसेवा दल आणि समाजवादी विचारांच्या मुशीत तयार झालेले प्रा. बन्ने अखेरच्या श्वासापर्यंत यासाठीच झटले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नेतृत्व त्यांनी केले. माकडवाले, नंदीबैलवाले, दलित, गारुडी, डंगे-धनगर, बेरड, इराणी अशा अनेक उपेक्षित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. कर्नाटकातील चंद्रगुत्ती येथील नग्नपूजेच्या विरोधात आंदोलन उभे करत हा सामाजिक कलंक कायमचा पुसण्यास त्यांनी सरकारला भाग पाडले. मराठीचे प्राध्यापक, कार्यकर्ता, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष, शिक्षण संस्था संचालक, लेखक, वक्ते, संस्पृतीचे अभ्यासक आणि पुरोगामी चळवळीचा चेहरा अशी त्यांची विविधांगी रूपे होती. सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करीत स्वातंत्र्याचे बाळकडू पाजणारा देवदासींचा हक्काचा भाऊ आज काळाच्या पडद्याआड गेला, ‘नाही रे’ वर्गाचे नेतृत्व हरपले.

आपली प्रतिक्रिया द्या