स्त्री रूपातील गणेश ते झोपलेला गणपती, जाणून घ्या राज्यातील आगळीवेगळी गणेशस्थाने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशुतोष बापट

निसर्गसमृद्ध असा आपला महाराष्ट्र अनेक विविधतांनी नटलेला आहे. किल्ले-लेणी-मंदिरे यांच्या सोबत कला-रूढी-परंपरा-देवता यांचीसुद्धा इथे रेलचेल आहे. शिव, देवी, गणपती ही इथली आराध्यदैवते. गणपती तर सर्वात लोकप्रिय अशी देवता. घराघरात पुजला जाणारा हा देव आपल्याला भटकंतीमध्ये निरनिराळय़ा ठिकाणी निरनिराळय़ा रूपात भेटतो. कधी तो डोंगरावर आहे तर कधी थेट समुद्रातल्या किल्ल्यात. कधी तो स्त्रीरूपात आहे तर कधी तो चक्क झोपलेल्या स्थितीत आहे. गणेशाची ही वैशिष्टय़पूर्ण रूपे जरा आडवाटेला गेलं तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. त्याच त्याच गर्दीच्या ठिकाणी रेटारेटीत हा देव नाही भेटत. तो एकांतात भक्तांची वाट पाहत उभा आहे. भक्तांना साद घालतो आहे. गरज आहे त्याच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्याला भेटायची. असेच काही आगळेवेगळे गणपती पाहायला बाहेर पडूयात.

झोपलेला गणपती-आव्हाणे

nidrist-ganesh

निद्रिस्त हनुमानाची मंदिरे आपल्याला खुलताबाद, लोणार इथे पाहायला मिळतात, पण निद्रिस्त गणेशाचे मंदिर हे एकमेवाद्वितीयच असेल. नगर जिह्यातील तिसगावपासून अंदाजे 15 कि.मी. अंतरावर आहे आव्हाणे हे गाव. गावात पूर्वी कोणी दादोबा देव नावाचे गणेशभक्त राहत होते. आव्हाणे गावात एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्याशा वस्तूला लागून अडला. पाहतात तो काय एक स्वयंभू गणेशांची मूर्ती जमिनीत होती. दादोबा देवांच्या मुलाला, गणोबा देव याला दृष्टांत झाला की, ती मूर्ती आहे तशीच असू देत, त्याच अवस्थेत तिची पूजा कर. ती मूर्ती म्हणजेच हा निद्रिस्त गणेश होय. मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फाळाची खूण अजूनही दिसते. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले. तसेच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या. त्यामुळे त्यांची नावे जहागीरदार भालेराव अशी पडली. निद्रिस्त गणेशाचे हे आगळेवेगळे आणि महाराष्ट्रातील बहुदा एकमेव मंदिर मुद्दाम जाऊन पाहण्याजोगे आहे.

स्त्री रूपातील गणेश-भुलेश्वर

stree-rupatil-ganapati
पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या यवतपासून अंदाजे आठ किलोमीटर अंतरावर आहे सह्याद्रीची भुलेश्वर रांग. इथे असलेले अप्रतिम शिवमंदिर मात्र आवर्जून जाऊन पाहण्याजोगे आहे. इथेपर्यंत येण्यासाठी उत्तम डांबरी रस्ता बांधलेला आहे. यादव काळात बांधले गेलेले हे मंदिर पूर्वाभिमुख असून शिल्पसमृद्ध आहे. वादक, नर्तकी, हत्ती, घोडे, सुरसुंदरी या शिल्पांसोबतच अनेक देवदेवतांची शिल्पांचेसुद्धा या मंदिरावर अंकन केलेले आढळते. या सर्व शिल्पाकृतींमधे स्त्रीरूपातील गणपतीची प्रतिमा आपल्याला खिळवून ठेवते. प्रत्येक देवतेची शक्ती ही जर मूर्तिरूपात दाखवायची असेल तर ती स्त्रीरूपात दाखवतात. सप्तमातृका हे पण त्याचेच प्रतीक आहे. विनायकाची शक्ती म्हणून ती विनायकी असे नामकरण केलेले आहे. वैनायकी-लंबोदरी-गणेशी अशा नावांनी ओळखली जाणारी ही गणपतीच्या शक्तीची प्रतिमा असते. इथे भुलेश्वरला प्रदक्षिणा मार्गावर वरती वैनायकीची देखणी प्रतिमा आहे. त्याच्या खाली उंदीरसुद्धा दाखवला आहे.

कुलाबा किल्ल्यातील गणेश

ganesh स्वराज्याच्या पश्चिम सीमेच्या रक्षणासाठी सुसज्ज आरमार आणि बलदंड जलदुर्गांची गरज आहे हे ओळखणारा पहिला राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद घेतली गेली आहे. अलिबागजवळच्या नवघर या खडकाळ बेटावर जलदुर्ग बांधायचा संकल्प शिवरायांनी केला. कुल म्हणजे सर्व आणि आप म्हणजे पाणी. ज्या बेटावरील किल्ल्याला सर्व बाजूंनी पाण्याचा वेढा आहे तो कुलाबा! या किल्ल्यामध्ये चक्क गणेश पंचायतन आहे. या पंचायतनाचे आवार चांगले प्रशस्त आहे. आवारात पूर्वाभिमुख तीन मंदिरे आहेत. या मंदिरसमूहासमोर गोडय़ा पाण्याचा एक मोठा तलाव दिसतो. सन 1759 मधे राघोजी आंग्रे यांनी 45 सें.मी. उंचीची संगमरवराची उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची मूर्ती या मंदिरात स्थापित केली. गणेशाच्या उजव्या बाजूला एक चतुर्भुज शिवमूर्तीसुद्धा आहे. तर मागच्या बाजूला चतुर्भुज सूर्याची प्रतिमा दिसते. गणेशाच्या डाव्या बाजूला मागे महिषासुरमर्दिनी तर पुढे त्रिविक्रम विष्णूची मूर्ती आहे. सिद्धिविनायकाच्या हातात अक्षमाला, कमल, परशू आणि मोदक दिसतात. गणेश मंदिराच्या पायऱया उतरून बाहेर आले की उजव्या हातास सुंदर असे तुळशीवृंदावन आहे.

मोरयाचा धोंडा मालवण

morayacha-dhonda1
छत्रपती शिवराय मालवण इथे आले असता त्यांच्या मनात समुद्रातील एक बेट भरले. कुरटे बेट. शुद्ध खडक, स्थल उत्तम, गोडय़ा पाण्याचाही ठाव आहे, ऐसे पाहून राजियांनी आज्ञा केली-‘ या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा. चौरयांशी बंदरी ऐसा जागा दुसरा नाही !’ महाराजांनी इथे सिंधुदुर्ग किल्ल्याचे काम सुरू करायचे ठरवले. स्थानिक प्रजेला अभय दिले, वेदमूर्तींना विश्वास दिला आणि महाराज पूजेला बसले. तो दिवस होता 25 नोव्हेंबर 1664. कोणत्याही कार्याचा शुभारंभ हा अर्थातच गणपतीच्या पूजनानेच व्हायला हवा. मालवणच्या किनाऱयावर होता का गणपती ? हो. होता ना. जिथे महाराज पूजेला बसले त्याच जागी आहे एक मोठा खडक. याला म्हणतात मोरयाचा धोंडा. मालवण किनाऱयावर वायरी भूतनाथच्या हद्दीत फेरुजिनस क्वार्टझाइट बनलेला जम्भालात रंगाचा हा खडक आहे. त्यावर विघ्नहर्ता गणेश, चंद्र, सूर्य, शिवलिंग, नंदी आणि पादुका कोरलेल्या आहेत. यावर कोरलेल्या गणेशमूर्तीमुळे याचे नाव झाले मोरयाचा धोंडा. तिथेच त्यांनी संजीवन समाधी घेतली. आता इथे एक छोटी घुमटी आणि आत एक शिवलिंग आहे.

[email protected]