श्रीशंभू महादेवांची ‘चैतन्य’स्थाने!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

संगमेश्वर तालुक्यामध्ये देखण्या शिवालयांसह अनेक देवदेवतांची प्रसिद्ध स्थाने आहेत. या प्रसिद्ध देवालयांसोबतच स्थानिक ग्रामदेवतांची पुण्यपवित्र स्थाने विलक्षण मोहक आणि भक्तांच्या सश्रद्ध मनाचे पावित्र्य जागृत करतात. इथले अपरंपार निसर्गसौंदर्य अनुभवताना ही देवालये जणू त्या निसर्गाशी एकरूप झालेली ‘आदिम’ शिल्पे असावी असेच आपल्या मनाला वाटत राहते. कोकण प्रांतातील भटकंतीमध्ये प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावे असेच या स्थानांचे ‘माहात्म्य’ आहे.

संगमेश्वर तालुक्यातील ‘श्रीआमनायेश्वर’ या देवालयामुळे निसर्ग व देवदेवतांचे एकरूपत्व आणि साहचर्य किती घट्टपणे जुळून आले आहे याचे दर्शन घडते. कोकण प्रांताला नैसर्गिक आणि आध्यात्मिकदृष्टय़ा समृद्ध करणारी अनेक देवालये आपल्याला संगमेश्वर, देवरूख येथे पाहावयास मिळतात. निसर्गाची मुक्त उधळण जागोजागी पाहावयास मिळते आणि नैसर्गिक आविष्काराला धार्मिकतेचा स्पर्श झाल्याचा प्रत्ययही अनुभवावयास मिळतो. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरनजीक राजवाडी हे गाव येथील गरम पाण्याचे कुंड आणि श्रीसोमेश्वर या शिवालयाच्या आगळ्या स्थापत्य रचनेमुळे प्रसिद्ध आहे. भूगर्भातील बाहेर उफाळून येणाऱया गरम पाण्याच्या अविरत प्रवाहाला बाजूने बंधारा घालून बंदिस्त केल्याचे येथे पाहावयास मिळते. चारही बाजूने असलेल्या दगडी चिऱयाच्या बांधकामामुळे ही गरम पाण्याची कुंडे आकर्षक वाटतात. मुख्य रस्त्यापासून थोडे आत गेले की, ही कुंडे व जुने कौलारू घरसदृश श्री सोमेश्वराचे देवालय पाहावयास मिळते.

श्री सोमेश्वर देवालयाला चारही बाजूने तटबंदी आणि प्रशस्त आवार लाभलेले आहे. पूर्व दिशेला भव्य आकर्षक दगडी दीपमाळ आहे. प्रवेशद्वार ओलांडून देवालयात पोहोचल्यावर प्रशस्त सभामंडपाने आपले स्वागत होते. सभामंडपात कोरीव कलाकुसर केलेले नक्षीयुक्त लाकडी खांब, त्यावरील तुळया कोरीव नक्षीकामाने सजलेल्या आहेत. विविध मानवी तसेच प्राण्यांचे आकार आणि पौराणिक युद्धप्रसंगाची आकर्षक शिल्पे साकारलेली आहेत. येथील एक धड व दोन तोंड असलेल्या, विचित्ररूपी ‘गंड-भेरुड’ पक्ष्याचे सुबक प्रमाणबद्ध शिल्प पाहून त्यास साकारणारे तत्कालीन शिल्पकार समृद्ध आणि वैचारिकदृष्टय़ा प्रगल्भ होते याचे हे द्योतक आहे. सभामंडप ओलांडून दुसऱया दालनात प्रवेश केला की, कोरीवकामाने सजलेले दगडी प्रवेशद्वार दिसते. या दालनातही नक्षीकाम केलेले लाकडी खांब व तुळया आहेत. समोर आसनस्थ नंदी असून त्यापुढे एकावर एक असे दोन गाभारे पाहून आश्चर्य वाटते. अशा प्रकारे एकावर एक असलेले दोन गाभारे अन्यत्र फारसे प्रचलित नाहीत. त्यामुळे राजवाडीसारख्या आडवळणी ठिकाणी त्यांचे असणे कुतूहल निर्माण करते.

श्री सोमेश्वर शिवालयात गेल्यावर नंदीच्या पुढे असलेल्या पायऱया उतरून श्रीशंभू महादेवांच्या गाभाऱयात प्रवेश केला असता श्रीसोमेश्वर शिवलिंग स्वरूपात दिसतो. हे शिवालय द्वापारयुगात पांडवांनी बांधले असे जुन्याजाणत्या मंडळींकडून सांगितले जाते. श्री सोमेश्वरास वंदन करून वरच्या गाभाऱयात गेले असता तिथे उजव्या हातात नाग धारण केलेली विघ्नहर्त्या गजाननाची मूर्ती दिसते. एका देवालयात एकावर एक असे दोन गाभारे आणि तिथे शिवलिंग व गणेशमूर्ती स्वरूपात असलेली पितापुत्रांची जोडी अन्यत्र कुठे पाहावयास मिळणार नाही. असे हे दुर्लभ आनंद देणारे आणि भवानी गडाची पार्श्वभूमी लाभलेले श्री सोमेश्वर शिवालय नितांतसुंदर आणि मनाला प्रसन्नता देणारे आहे.

संममेश्वर-देवरूख मार्गावर श्रीदेव मार्लेश्वर येथे जाताना हिरव्यागर्द वनराईतून डोंगरमाथ्याकडे लक्ष वेधून घेणारे सुबक देवालय म्हणजे श्रीटिकलेश्वर. पूर्वी या देवालयापर्यंत चालत जावे लागे. मात्र आता पक्क्या रस्त्याची सोय झाल्याने श्री टिकलेश्वराचे दर्शन घेणे सहजसोपे झाले आहे. श्रीदेव टिकलेश्वर प्रशस्त आवार आणि सुबक बांधणीमुळे लक्ष वेधून घेते. श्री टिकलेश्वराचे दर्शन घेतल्यावर त्यास शिखर सान्निध्यात प्रदक्षिणा घालताना सभोवतालच्या महिमतगड, कुंडीघाटाचे विलोभनीय दृश्य दिसते. प्रदक्षिणेच्या रस्त्यावर पाण्याची टाकी आणि नैसर्गिक गुहा दिसून येतात. श्री टिकलेश्वराच्या रूपाने शिखरमाथ्यावर असलेले श्रीशंभू महादेवाचे हे वास्तव्य आल्हाददायक आहे.

रत्नागिरी- कोल्हापूर मार्गावरून जाताना चारेक कि.मी. अंतरावर आतील बाजूस किंवा देवरूख-साखरपा मार्गावर देवळे फाटय़ावरून आत 14 कि.मी. अंतरावर वसलेले ‘देवळे’गाव पूर्वी महालाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध होते. येथे 12व्या शतकाच्याही पूर्वापार अस्तित्वात असलेले श्री खङ्गेश्वर देवालय चालुक्य काळाशी नाते सांगणारे आहे. श्री खङ्गेश्वराच्या उत्पत्तीविषयी कथा सांगताना ‘कुण्या एकाची गाय एका विवक्षित ठिकाणी पान्हा सोडत असे. तेव्हा तिच्यावर पाळत ठेवणाऱया तिच्या मालकाने त्या जागी हातातील शस्त्राने आघात केला तेव्हा खाली स्वयंभूरूपात विराजमान शिवलिंगाचा कळपा उडून दूर पडला, जो शेष उरला तो श्री खङ्गेश्वर आणि तेव्हाच्या शस्त्राघाताची अस्पष्ट खूण आजही या शिवलिंगावर दिसून येते असे सांगितले जाते. श्री खङ्गेश्वराच्या उत्पत्तीविषयीची दुसरी कथा पुढीलप्रमाणे आहे. काहींच्या मते सन 1208 मध्ये ‘देवळे महाल’ हा भाग शिलाहार राजा गंडरादित्य याच्या राजवटीत येत असे. येथे भ्रमंती करीत असताना राजा गंडरादित्य याला घनदाट जंगलामध्ये हे स्थान दिसले.

पुढे त्याने या स्थानाची जबाबदारी बल्लाळपंत दीक्षित यांच्यावर सोपवली व बावनदी ते मुचकुंद नदीपर्यंतचा मुलुख या देवस्थानाच्या खर्च-व्यवस्थेसाठी जोडून दिला. काही काळानंतर देवगिरीचा यादव राजा सिंघण आणि शिलाहार राज्यकर्त्यांमध्ये झालेल्या लढाईत शिलाहारांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शिलाहार राजवटीचे सहाय्य लाभलेल्या बल्लाळपंत दीक्षितांनीही माघार घेत आपले खङ्ग या देवालयास अर्पण केले म्हणून येथील देवास ‘श्री खङ्गेश्वर’ हे नामाभिधान लाभले.

संगमेश्वर तालुक्यामध्ये देखण्या शिवालयांसह अनेक देवदेवतांची प्रसिद्ध स्थाने आहेत. शिरंबेचा श्री मल्लिकार्जुन, धामणीचा श्री लक्ष्मीकेशव, मावळंग्याचा श्री नृसिंह, आंबवचे सूर्यमंदिर, आरवलीचा श्री आदित्यनारायण, देवळ्याचा श्री खडगेश्वर तसेच देवरूख मार्गावरील श्री मार्लेश्वर आणि श्री टिकलेश्वर अशा प्रसिद्ध देवालयांसोबतच स्थानिक ग्रामदेवतांची पुण्यपवित्र स्थाने विलक्षण मोहक आणि भक्तांच्या सश्रद्ध मनाचे पावित्र्य जागृत करतात. इथले अपरंपार निसर्गसौंदर्य अनुभवताना ही देवालये जणू त्या निसर्गाशी एकरूप झालेली ‘आदिम’ शिल्पे असावी असेच आपल्या मनाला वाटत राहते. कोकण प्रांतातील भटकंतीमध्ये प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावे असेच या स्थानांचे ‘माहात्म्य’ आहे.

[email protected]