निसर्गभान – मढे झाकुनियां करिती पेरणी

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

तंत्रज्ञानाच्या वापराने कृषिक्रांती झाली असली तरी शेतकऱयांच्या कृषिकर्मातील सुगी व नक्षत्रे यांना आजही दुसरा पर्याय नाही. मृगाचा पहिला पाऊस पडला की, कृषक समाजात पेरणीची धामधूम सुरू होते. कारण पहिल्या पावसानंतर ताबडतोब पेरणी झालीच पाहिजे हा कृषक समाजातील लोकसंकेत आहे.

आपल्या देशात अगदी प्राचीन काळापासून कृषी संस्कृतीला महत्त्व देण्यात आले आहे. म्हणूनच आपले सर्व सण, उत्सव हे कृषी संस्कृतीशी निगडित आहेत. या संस्कृतीत ‘पेरणी’ हा जणू महोत्सवच.  हा महोत्सव वर्षातून दोनदा येतो. एकदा खरिपाच्या हंगामात आणि दुसऱयांदा रब्बीच्या हंगामात. या पेरणीसाठी बळीराजा तत्परतेने कामाला लागतो. कारण पेरणीच्या वेळी तो गाफील राहिला की, त्याचे संपूर्ण भवितव्य धोक्यात आलेच म्हणून समजा. खेडय़ापाडय़ांतील ग्रामीण लोकांच्यात आजही एक म्हण प्रचलित आहे, ती म्हणजे ‘मढं झाकावं अन् पेरणी करावी’. एखाद्याच्या घरात कुणी मयत झाले तरी आधी महत्त्व पेरणीला, मग मयताच्या अंत्यसंस्कारांसाठीचे सोपस्कार. अशा या पेरणीचे महत्त्व संत तुकाराम महाराजांनीसुद्धा ओळखले होते. म्हणून ते आपल्या अभंगातून सांगतात…

मढे झाकुनियां करिती पेरणी। कुणबियाचे वाणी लवलाहें।।

कुणब्याचे म्हणजेच शेतकऱयांचे जगणे शेतीवरच अवलंबून असते. जीवन जगण्यासाठी त्याला उत्तम शेती करून नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा लागतो, तो त्यासाठी अपार कष्ट करतो. राबराब राबून शेती पिकवतो. शेतीची कामे वेळेत होणे आवश्यक असते. वक्तशीरपणा आणि शिस्तबद्धपणा यावरच सारी भिस्त ठेवावी लागते. अशा वेळी दुःख बाजूला सारून, हातात नांगर घेऊन शिवाराची वाट धरावी लागते. निसर्गाचा लहरीपणा त्याला मान्य करावा लागतो. पर्जन्यमान चांगले व्हावे म्हणून तो परंपरेने आलेले काही विधिविधानही आनंदाने करत असतो.

कृषी संस्कृतीतील अनेक विधिविधान हे लोकविज्ञानाच्या प्रयोजनातूनच रूढ झालेले आहेत. कृषी संस्कृतीच्या अनेक विधीतून शेतीसाठी लागणाऱया अवजारांबद्दलची कृतज्ञता जशी व्यक्त होते, तसा त्यात असणारा वैज्ञानिक दृष्टिकोनही व्यक्त होताना दिसतो. शेतकऱयांची पेरणी वेळेवर झाली की, त्याला सात्त्विक समाधान लाभते. पेरणी ज्या दिवशी संपते, त्या दिवशी तिफणीचे जू, चाडे, दांडा यांना गेरू व चुना लावला जातो. शेतीसाठी उपयोगी पडणाऱया अवजारांची शेतकरी फार काळजी घेतो, अगदी आपल्या मुलाबाळांसारखीच! शेतासाठी वर्षभरात लागणारी विविध हत्यारे व अवजारे यांची त्याला निगा ठेवावीच लागते. कारण एखादे जरी हत्यार किंवा अवजार निकामी झाले तर शेतकऱयाला फार मोठी अडचण येते. शेतीच्या कामात व्यत्यय येतो.

बदलत्या कृषी संस्कृतीत पेरणीच्या आणि कृषी तंत्राच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. पूर्वी ज्या दिवशी पेरणी संपत असे त्या दिवशी तिफणीला आणि तिच्या सुटय़ा भागाला तेल, शेंदूर, गेरू, चुना लावला जात असे. या गोष्टी लोकविज्ञानाच्या सिद्धांतावर आधारलेल्या आहेत हेही तितकेच खरे आहे. तथापि ‘चाडे’ हे वर्षातून एकदाच पेरणीच्या वेळी वापरात येणारी, पण शेतीसाठी अत्यावश्यक असणारी वस्तू आहे. वर्षभर बदलत्या हवामानामुळे तसेच पावसामुळे किंवा उन्हाळ्यात प्रखर उन्हामुळे चाडे खराब होऊन जाऊ नयेत म्हणून त्यांना तेल-शेंदूर लावण्यात येत असे, तसेच लाकडी चाडय़ांनाही भिरड लागू नये व ते निकोप राहावेत म्हणून त्यांना शेतकरी तेल-शेंदूर लावून सुरक्षित ठिकाणी ठेवत असे. जू, दांडा व तिफणीचे खोड यांना पावसाळ्यातील ओलाव्यामुळे कीड लागण्याची शक्यता असते. चुना व गेरू लावल्यामुळे अशी कीड लागत नाही, तसेच मातीत राहिले तरी वाळवीपासून त्यांचे संरक्षण होते हा वैज्ञानिक दृष्टिकोन यातून व्यक्त होताना दिसतो.

तंत्रज्ञानाच्या वापराने कृषिक्रांती केली असली तरी शेतकऱयांच्या कृषिकर्मातील सुगी व नक्षत्रे यांना दुसरा पर्याय आज तरी नसल्याचे दिसून येते. मृगाचा पहिला पाऊस पडला की, कृषक समाजात पेरणीची धामधूम सुरू होते. कारण पहिल्या पावसानंतर ताबडतोब पेरणी झालीच पाहिजे हा कृषक समाजातील लोकसंकेत आहे. तो गेल्या हजारो वर्षांपासूनच्या अनुभवातून सिद्ध झाला आहे. मृगाचा पहिला पाऊस पडतो आणि या पहिल्या पावसाने जमिनीत साठवलेली वाफ बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असते. अर्थात हीच अवस्था जमिनीत ‘बी’ पेरण्यासाठी अत्यंत पोषक समजली जाते. बीजांकुरणाची प्रक्रिया सुरू होत असते. तिफणीच्या फारोळ्यांनी जमिनीत खोलवर बी पेरले जाते आणि मृगाच्या पहिल्या पावसामुळे जमिनीच्या पोटातील साठवलेल्या वाफेच्या अर्थात उष्णतेच्या बाहेर पडण्याच्या साहचर्याने बीज झपाटून अंकुरते. बीजांकुरणाची निश्चित वेळ साध्य करणे या विधीचे तंत्रशुद्ध कारण आहे.

खरीप हंगामातही पेरणी करतात, त्या दिवशी शेताच्या एखाद्या ओप्यात कांदा घालून कृषिवल शेतीच्या पाया पडतात. या विधीमध्ये कांदा हा उष्मावरोधक असल्याने त्याची प्रतीकात्मक पूजा करण्यात येते. उन्हाच्या तडाख्याने बीजांकूर होरपळून जाऊ नये म्हणून कांदा जमिनीत पुरून त्याची पूजा करण्याचे प्रयोजन आलेले आहे.

वैज्ञानिक पद्धतीने कृषक समाजात विज्ञानाच्या विकासामुळे बदल होत गेले असले तरी काही वेळा त्याला आध्यात्मिक बैठकही लाभलेली दिसून येते. ‘बी’ म्हणजे ब्रह्म आणि त्याचा वैज्ञानिक विकास म्हणजे ‘माया’ हे जीवा-शिवाचे आध्यात्मिक निरूपण ही ‘वाफधावणी’सारख्या विधींच्या आरती व ओव्यांमधून व्यक्त होताना दिसते. पारंपरिक कृषक समाज हा रूढार्थाने अशिक्षित, खरे तर अनक्षर असला तरी तो अडाणी नाही. त्याचा उपजत शहाणपणा आणि जगण्यासाठी लागणारी सजगता अशा विधीतून स्पष्टपणे दिसून येते. अर्थात बळीराजाचं अवघ जिणं निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असल्यामुळे तो विज्ञानाची कास तर धरतोच, पण अध्यात्म अणि परंपरेने आलेल्या श्रद्धेतूनही तो शेतीसंबंधीच्या विधीतून आत्मिक समाधान मिळवत असतो. याच मृगाच्या पहिल्या सरीची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱया कृषक समाजाने केवळ मृग नक्षत्रावर असंख्य लोकगीते रूढ केली आहेत. लोकगीतांचा हा वसा सृजनाच्या ओढीतून निर्माण झाला आणि आपल्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग ठरला आहे.

 [email protected]

(लेखक लोकसंस्कृतीचे अभ्यासक आहेत.)