आभाळमाया – आणखी एक धूमकेतू

>> वैश्विक 

अवकाश दर्शनाच्या सध्याच्या मोसमात, छान थंडी, स्वच्छ निरभ्र आकाश आणि त्यात आकाश दर्शनासाठी अमावस्येची ‘पर्वणी’. मग आणखी काय हवं! नुसत्या डोळय़ांनीही रात्रभर आकाशाची दौलत न्याहाळावी तेवढी थोडी. ग्रह, तारे, नक्षत्र, राशी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर काही काळ दिसणारे कृत्रिम उपग्रह, क्वचित दिसणारं स्पेस स्टेशन. सारंच विलोभनीय. त्यातच उल्का वर्षावाचा काळ असला तर आकाशभर आतषबाजी आणि एखादा धूमकेतू दिसला तर सोन्याला सुगंध!

गेल्या तीन वर्षांत कोविडने हिरावून घेतलेलं अवकाश आता निरीक्षकांसाठी पुन्हा मुक्त झालंय आणि चांगली गोष्ट म्हणजे अवकाश दर्शनासाठी भुकेल्या नजरा वैज्ञानिक जिज्ञासेने पुन्हा हजारोंच्या संख्येने अवकाशाकडे लागल्याचं दृश्य अनुभवाला येतंय. 1 जानेवारीला इतरत्र अनेक ‘सेलिब्रेशन’ झालीच असतील, परंतु त्या संध्याकाळीही क्षितिजापलीकडे, दुर्बिणीतून डोकावण्यासाठी मुंबईतल्या सागरकिनारी, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या प्रांगणात शेकडो अवकाशप्रेमींची गर्दी उसळली. तोच अनुभव आम्हाला आमच्या बदलापूरजवळच्या उंबरोली येथे असलेल्या जागेवर आला. गेल्या  एकवीस तारखेला अमावस्या होती. ‘अमा’ म्हणजे एकत्र आणि ‘वसती’ म्हणजे राहणे. सूर्य-चंद्र ज्या दिवशी एकत्र उगवतात आणि एकदमच मावळतात तो अमावस्येचा दिवस.

साहजिकच त्या संध्याकाळी सूर्यास्ताबरोबरच चंद्रास्त झाल्याने रात्रीच्या आकाशात चंद्र दिसत नाही आणि ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ लोभस रूप प्रकट करते. कृत्रिम पिंवा नैसर्गिक अशा कोणत्याही प्रकारचा तीव्र प्रकाश आणि धूर, धूळ यांचं प्रदूषण यांमुळे हवा दूषित झाली तर अवकाशातील अनेक गोष्टी दृष्टिआड होतात. एकेकाळी वांगणी स्टेशनवर उतरल्यावर आम्हाला खच्चून भरलेलं चमकतं तारांगण खाली आल्यासारखं वाटायचं. आकाशगंगेचा शुभ्र ‘प्रवाह’ नुसत्या डोळय़ांनी दिसायचा. सुमारे चार दशकांपूर्वीची ही गोष्ट.

हळूहळू प्रदूषणाचे सर्व आविष्कार जगभर फैलावले. रात्री प्रकाशाने उजळल्या, प्रदूषणाने झाकोळल्या आणि त्यातच बेभरवशाच्या हवामानामुळे ढगांचा थर केव्हाही जमा होऊ लागला. एकदा तर नोव्हेंबरच्या मध्यात आणि डिसेंबरातही पाऊस कोसळून सगळय़ा कार्यक्रमावर अक्षरशः पाणी पडलं. मात्र अशा वेळी अवकाशप्रेमींनी जो संयम दाखवला तो विशेष होता. नैसर्गिक आपत्तींपुढे कोणाचाच इलाज नसतो हे सर्व जाणत होते. तशातच अवकाश दर्शनाचे तीन ‘हंगाम’ कोविडने खाल्ले.

म्हणूनच गेल्या शनिवारच्या अवकाश दर्शनाचं महत्त्व प्रकर्षाने जाणवलं. संध्याकाळच्या वेळी पश्चिम क्षितिज मोकळं असेल तर दुर्बिणीतून दिसणारा बुध (काही सराईतांना तो डोळय़ांनीही दिसतो) त्यानंतर काही काळ आकाशात रेंगाळून पश्चिमास्त होणारा तेजस्वी शुक्र ग्रह. शनिवारी शुक्राची तेजस्विता दुर्बिणीतून अधिक जाणवली. त्याचं रूप रसिकांना खुश करून गेलंच, पण तो तेजस्वी दिसण्यामागे त्यावर असलेले कार्बनचे मेघमंडळ कसं कारणीभूत आहे आणि तो कधी पश्चिमेला ‘उगवून’ पश्चिमेलाच ‘मावळतो’, तर कधी पूर्वेला उगवून पूर्वेलाच का मावळतो हेसुद्धा सोप्या भाषेत आमच्या अभ्यासकांनी लोकांना सांगितलं. समाजात वैज्ञानिक दृष्टी रुजवायची तर विज्ञानही रंजक पद्धतीनेच सांगायला हवं.

त्याशिवाय गुरूचे चंद्र, शनी ग्रहाची कडी वगैरे पुस्तकात वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्ष पाहता आल्याने मंडळी आनंदली होती. दुर्बीण म्हणजे द्विनेत्री (बायनॉक्युलर) नव्हे, तर टेलिस्कोप आणि त्याचे प्रकार व वापर हे सारं सर्वांनी जाणून घेतलं.

यावेळचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे ‘ज्विकी ट्रान्झिएन्ट फॅसिलिटी’ या दुर्बिणीतून शोधला गेलेला ‘झेडटीएफ’ हा धूमकेतू. आधीच आवस त्यात धूमकेतू एवढी अवकाश निरीक्षणाची उत्तम संधी अन्य कोणती? हा ‘झेडटीएफ’ धूमकेतू 50 हजार वर्षांनी येतो. म्हणजे यापूर्वी तो दिसल्याची नोंद असणं दुरापास्तच. तेव्हा आपण काहीतरी अद्वितीय पाहत आहोत ही जाणीवही प्रेक्षकांच्या मनात खगोल कुतूहल जागवणारी ठरते.

मला आठवतं, 1968 मध्ये आम्ही ‘इकियासाकी’ तर 1973 मध्ये ‘कोहॉटेक’ धूमकेतू पाहिले होते ते केवळ गंमत म्हणून, परंतु 1986 मध्ये ‘हॅली’चा धूमकेतू येईपर्यंत बरीच वैज्ञानिक प्रगती आणि माध्यम जागृतीही झाल्याने अभ्यास करण्याची संधी मिळाली. तो सूर्यमालेच्या जवळ म्हणजे सुमारे साडेचार कोटी किलोमीटर अंतरावर असेल. बर्फ, मातीचा आणि विविध वायूंचा साठा असलेला धूमकेतू ‘उर्ट क्लाऊड’ या त्याच्या जनक स्थानातून येतो. ‘एचटीएफ’ धूमकेतूला ‘ग्रीन कॉमेट’ म्हणतात. कारण त्याचा पिसारा हिरवट रंगाचा आहे.

1995 मध्ये ‘हेल बॉप’ धूमकेतू. लाल-निळय़ा रंगाचा दिसला होता. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यामधल्या टलाहासी येथून आमचे अभ्यासक प्रदीप आणि मृणाल यांनी त्याचे सुंदर पह्टो घेतले होते. 1996मध्ये आलेल्या ‘हय़ाकुताके’ धूमकेतूचा पिसारा (शेपूट) मात्र हिरवट रंगाचे होते आणि वांगणी येथून त्याचे अनेक पह्टो आमच्या सभासदांनी घेतले. ती सर्व फिल्म फोटोग्राफी होती.

आता तर डिजिटल फोटो मोबाईलवरही घेता येतात. त्यामुळे येते काही दिवस ‘झेडटीएफ’ धूमकेतू ढगांच्या अडथळय़ाविना दिसू शकला तर त्याचे उत्तम फोटो घेता येतील. हा धूमकेतू दर बेचाळीस हजार वर्षांनी येणारा आहे. ‘हेल बॉप’ केवळ एकदाच येणार होता. ‘हॅली’ 76 वर्षांनी येतो. असा हा आकाश दर्शनाचा आनंद सोहळा. त्यासाठी हवी केवळ जिज्ञासा आणि अभ्यासक दृष्टी. बाकी अवकाश तर फुकटच उपलब्ध आहे.

[email protected]