
>> वैश्विक
22 जुलै 1969. पृथ्वीवरच्या अवकाश वैज्ञानिकांनी एक विलक्षण गोष्ट साध्य केली होती. पृथ्वीपासून सरासरी 3 लाख 84 हजार किलोमीटरवर असलेल्या चंद्रावर थेट पोचण्यात माणसाला यश आलं होतं. तोपर्यंत कथा-काव्यामध्ये सूर्य-चंद्राचा उल्लेख जोडीने व्हायचा. कारण दिवसा आकाशात तळपणारा सूर्य आणि रात्री मंद प्रकाश देणारा चंद्र हे दोन्ही सारखेच वाटायचे, परंतु सूर्य हा आपल्या ग्रहमालेचा महाकाय म्हणजे पृथ्वीपेक्षा 1100 पट मोठा तारा आहे आणि चंद्र पृथ्वीच्या केवळ एक चतुर्थांश आकाराचा नैसर्गिक उपग्रह आहे याची कल्पना आल्यावर आणि त्यातही चंद्रावर खाचखळगे आणि विवरं असल्याचं समजल्यावर चंद्राबद्दलच्या रम्य कविकल्पना विरून गेल्या. मात्र तोपर्यंत नवी पिढी नव्या युगाची नांदी जाणत होती.
मला आठवतं की, माणूस चंद्रावर उतरला ते आमचं एसएससीचं वर्ष होतं. भौतिकशास्त्र, गणित बऱ्यापैकी समजायला लागलं होतं. तरीही सभोवती चर्चा चालायची ती माणूस चंद्रावर जाणं कसं शक्य आहे? अर्थात युरी गागारिन अंतराळात जाऊन आला तेव्हा असंख्य पृथ्वीवासीयांना असंच वाटलं होतं. दळणवळणाच्या अपुऱ्या आणि गतिमान नसलेल्या साधनांमुळे गावाची वेसही न ओलांडलेली अनेक माणसं जगभर होती. त्यांना तर माणूस थेट रात्री आपल्याला आकाशात दिसणाऱ्या चंद्रावर जाणार या कल्पनेनेच स्तिमित केलं होतं.
आणि वैज्ञानिक माहिती असणाऱ्या संशोधकांसाठीही ही स्तिमित करणारीच घटना होती. कारण पृथ्वी ‘चंद्र अंतर’ या दोहोंच्या गतीमधली निर्वात पोकळी, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण भेदून चंद्रापर्यंत पोचणं या गोष्टी सोप्या नव्हत्या, परंतु अमेरिकेने रशियाशी अंतराळ स्पर्धा करण्याच्या ईर्षेने का होईना, हे यश संपादन केलं. अपोलो-11 रॉकेटवर बसवलेलं ‘ईगल’ नावाचं छोटं यान चंद्रावर उतरलं आणि नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. त्यापाठोपाठ एडविन ऑल्ड्रिनही उतरला. आम्ही ते सारं रेडिओवरच्या लाइव्ह ‘कॉमेंट्री’मधून ऐकलं. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्र एकाच बातमीने सजली – ‘चंद्र पादाक्रांत झाला!’ ‘मानवाची विलक्षण अवकाशझेप’… वगैरे.
… आणि अमेरिकेच्या चांद्रमोहिमांचा सिलसिला सुरू झाला. डिसेंबर 1972 पर्यंत अमेरिकेने अंतराळवीरांना चंद्रावर उतरवलं. अपोलो-17 च्या यशानंतर ही मोहीम थांबली. त्या गोष्टीलाही आता 50 वर्षं झाली. चांद्रमोहिमेची अशी सांगता होईपर्यंत बारा अंतराळयात्री चंद्रावर चालून आले होते. पृथ्वीच्या तुलनेत तिथल्या एक षष्ठय़ांश गुरुत्वाकर्षणामुळे आर्मस्ट्राँग आणि मंडळी चंद्रावर उडय़ा मारतायत असं दिसत होतं. पहिल्या चंद्रावतरणापासूनच्या सर्व चित्रफिती आज उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रातील पहिला चांद्रविजयही संशय आणि वादापासून मुक्त नव्हता. जॉन केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांनी 1960 चं दशक संपण्यापूर्वीच चंद्रावर माणूस उतरवण्याची घोषणा केली होती. अनेकांना ती अमेरिका – रशियाच्या शीतयुद्धाच्या काळात ‘राजकीय’ वाटली. विज्ञानातील ‘निर्णय’ अध्यक्ष कसे घेणार? असा प्रश्न उपस्थित केला गेला. आपले शब्द खरे करण्यासाठी अमेरिकेने पृथ्वीवरच कुठेतरी कृत्रिम वातावरणरहित जागा निर्माण करून ‘चांद्रवीर’ उतरवले, शिवाय चंद्रावर वातावरण नाही तर तिथे लावलेल्या अमेरिकन ध्वजाला सुरकुत्या कशा दिसतात वगैरे अनेक आक्षेप नोंदले गेले. मात्र, संशोधकांची विचलित न होता आपलं कार्य सातत्याने सुरू ठेवले.
चंद्रावर माणूस उतरवण्याचा संकल्प केल्यावर अमेरिकेने 1966 ते 1968 या काळात चंद्रावर पाच यानं पाठवून चांद्रपृष्ठाचा अंदाज घेतला होता. त्यापैकी एक अपयशी ठरलं. अपोलो मोहिमेतलं अपोलो-13 सुद्धा अपयशी ठरलं. युरोप-अमेरिकेत 13 हा आकडा ‘अशुभ’ मानला जात असल्याने त्याचीही चर्चा झाली. ‘अपोलो थर्टीन’ नावाचा बॉलीवूड चित्रपटही त्यावर आला.
काळाच्या पुढे बघण्याचा प्रयत्न करतं ते विज्ञान. तशी दृष्टी असेल तरच विविध संशोधन होतं. आपल्याकडे असं मूलभूत संशोधन सातव्या शतकानंतर थबकलेलं दिसतं. त्यानंतर फारच क्वचित आपण काही शोध लावले. त्यासाठी वैज्ञानिक विचारांची आवश्यकता असते. आपण म्हणजे बहुसंख्य लोक फक्त विज्ञानाचा वापर करतात. त्यामागचं रहस्य नव्हे, तर तत्त्व जाणून घेण्याची मानसिकता तयार व्हायला हवी.
पाश्चात्त्य जग पंधराव्या शतकापासून भौतिक संशोधनात खूप पुढे गेलं. त्यामुळे त्यांचा प्रभाव जगावर दिसतो. आपली तरुणाईसुद्धा उद्या असं यश संपादन करू शकते. आपणही आता चंद्रावर यान पाठवून, मंगळकक्षेत यान पाठवण्याइतकी प्रगती केली आहे. वैज्ञानिक जाणिवेनेच त्याला अधिक गती येईल. चांद्रविजयाची सांगता होत असताना नील आर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन, चार्ल्स् पीट, कॉर्नार्ड, अॅलन बीन, डेव्हिड स्कॉट अशा अनेक चांद्रवीरांचं स्मरण करू या आणि भावी काळात हिंदुस्थानी नागरिकही चंद्रवर उतरेल याची खात्री बाळगूया.
अमेरिकेचं हे चांद्रयश मोठं याबद्दल दुमत नाही, परंतु सर्व चांद्रमोहिमांमध्ये फक्त पुरुष अंतराळयात्रीच होते. त्या प्रगत देशानेही महिला अंतराळयात्री चंद्रावर पाठवली असती तर अधिक चांगलं झालं असतं. चंद्रावतरणाच्या यादीत महिला अंतराळयात्रीचं नाव नसावं याची खंत आहेच.

























































