आभाळमाया – किंताऱ्याची कथा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपला सूर्य हा ग्रह नसून तारा आहे हे गेल्या चार-पाच शतकांत प्रकर्षाने मान्य झालं. त्यातही तो आपल्या आकाशगंगेतला अगदी सामान्य असा तारा असल्याचंही गेल्या शतकभरात लक्षात आलं. आपल्या आकाशगंगेतील सुमारे दोनशे अन्य ताऱयांपैकी एक साधा तारा! काही दिवसांपूर्वी (कोविडचे सर्व नियम पाळून) एका खेडय़ात रात्रीच्या आकाशात बऱयाच वर्षांनी आकाशगंगेचा धूसर पट्टा पाहायला मिळाला. अनेक ‘ओळखीच्या’ तारकासमूहांची आणि नक्षत्रांची ‘पुनर्भेट’ झाली आणि एक अपूर्व आनंद लाभला. तरीही फार मोठय़ा संख्येने पुन्हा नव्याने आकाशानंद घेण्याचा काळ अजून तरी आलेला नाही. त्यामुळे जाहीर कार्यक्रम वगैरे अशक्यच. मात्र आता अनेक वादळं पचवून (आणि अनेक ठिकाणी उत्पात घडवून) पावसाचा मोसम संपतोय असं वाटतंय. आता आकाश स्वच्छ झालं की रात्रीच्या निरभ्र अंधारात चमचमणाऱया हजारो ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ पुन्हा नजर खुणावू लागेल हे खरंच, पण दोन वर्षे धीर धरला तसे आणखी काही दिवस (रात्री) थांबावं लागेल असं दिसतंय. त्यामुळेच आपण गेल्या काही काळात खगोलशास्त्र्ााची सैद्धांतिक (थिअरॉटिकल) माहिती सोप्या आणि संक्षिप्त पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून खगोल अभ्यासाची आवड निर्माण झाली तर उत्तमच, पण निदान त्याबाबतचं कुतूहल जागं झालं तरी ते विलक्षण आनंददायी ठरेल. पृथ्वीवरच्या आपल्या जीवनाच्या मर्यादा आणि विश्वाचं विराटत्व लक्षात येईल.

या विश्वात आपल्याला आणि सखोल अभ्यास करणाऱयांनाही आतापर्यंत उलगडलेली नाहीत अशी अनेक ‘रहस्यं’ आहेत. ती समजली, त्यामागचा कार्यकारणभाव लक्षात आला की मग ती रहस्यं राहत नाहीत. असंच एक ‘रहस्य’ 1950 मध्ये उलगडलं. त्याचं नाव क्वेसार किंवा किंतारा. ‘किंतारा’ म्हणजे ताऱयासारखा भासणारा, पण खरंच तारा आहे की नाही अशी शंका निर्माण करणारी अस्पष्ट चमकणारी अवकाशरूप वस्तू. प्रचंड शक्तीच्या कृष्णविवराकडून ऊर्जा प्राप्त केलेला ‘जागृत दीर्घिकीय गाभा’ (ऍक्टिव्ह गॅलॅक्टिक न्यूक्लिअस) म्हणजे हा ‘किंतारा.’ आपल्या सूर्याच्या अब्जावधी पट वस्तुमान असलेल्या या विश्वातील अतिदूरच्या म्हणजे ज्ञात विश्वाच्या सीमेवर सापडणाऱया या ‘क्वेसार (किंवा क्वेझार) नावाच्या अवकाशस्थ वस्तू आपल्यापासून सुमारे दहा ते तेरा अब्ज प्रकाशवर्षे लांब आहेत. अत्यंत प्रखर ऊर्जास्त्र्ााsत असलेल्या या क्वेसारचा व्यास केवळ दहा हजार प्रकाशवर्षे असतो. आपल्याच आकाशगंगा दीर्घिकेचा व्यास एक लाख प्रकाशवर्षाचा असून आपली सूर्यमाला केंद्रकापासून तीस हजार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. कन्या तारकासमूहातील 3 सी-273 हा एकमेव क्वेझार आठ इंच व्यासाच्या परावर्ती दुर्बिणीतून गडद अंधाऱया निरभ्र रात्री दिसू शकतो.

एरवी त्यांचा वेध रेडिओ दुर्बिणी घेतात. खरं तर 1919 ते 1922 या काळात हेवर कार्टिस आणि अर्नेस्ट ओजिक यांनी विश्वात दूरवर काही ‘तेजोमेघ’ असल्याची नोंद केली, परंतु त्याचं नेमकं स्वरूप समजलं ते 1950 मध्ये रेडिओ दुर्बिणीद्वारे अवकाशातील दूरवरची रेडिओ प्रारणं ‘पकडून’ त्याचं पृथक्करण करायला सुरुवात झाली तेव्हा. 1994 मध्ये हबल दुर्बिण अवकाशात भ्रमण करू लागली आणि खगोलीय जाणिवा खऱया अर्थाने वैश्विक होण्यात क्रांतिकारक बदल घडले. हबलने क्वेसारचे फोटो घेतले तेव्हा त्या दीर्घिका अतितप्त आणि परस्परात विलीन होण्याच्या प्रक्रियेत असतात त्यांच्या मध्यभागी असे क्वेसार सापडले. कृष्णविवराच्या बाहय़ चकती किंवा ऍक्रिशन डिस्कमुळेही क्वेसारचा पत्ता लागतो. आतापर्यंत विश्वातील सुमारे 1 लाख क्वेसार शोधण्यात यश आले आहे.

आपल्या सूर्यमालेजवळच्या म्हणजे सहा कोटी प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या यूलएस क्वेसारची ऊर्जा 60 कोटी सूर्य ऊर्जेइतकी प्रचंड असून त्याचा जन्म ‘अवघ्या’ 69 कोटी वर्षांपूर्वीचा असल्याचं म्हटलं जातं. 2017 मध्ये ‘पॉन्युआराना’ नावाचा क्वेसार शोधला गेला. तर या वर्षाच्या सुरुवातीलाही सापडलेल्या क्वेसारमधलं कृष्णविवर 16 अब्ज सौर वस्तुमानाएवढं दाहक आहे.

अमेरिकेतील माऊन्ट पॅलोमार या परावर्ती किंवा पर्टोरिको येथील ऍशिसीनो या विशाल रेडिओ दुर्बिणीद्वारे अनेक क्वेसार शोधण्यात आले. (या दुर्बिणीचं काही वर्षांपूर्वी वादळात अतोनात नुकसान झालं. त्यावेळी आपण त्याविषयी वाचलं होतं.) 1950 मध्ये शोधलेल्या आणि 8 इंची दुर्बिणीतून दिसणाऱया 3 सी – 273 क्वेसारचा गरगरण्याचा वेग सेकंदाला 47 हजार किलोमीटर आहे. असे आहे हे ‘अमेझिंग विश्व’!

– [email protected]