आभाळमाया – स्टारशिपची चाचणी

415

>> वैश्वीक

एलॉन मस्क या ध्येयवेडय़ा ‘स्पेस’ उद्योजकाने चंद्र-मंगळाला गवसणी घालण्याचा चंग बांधलेला दिसतो. येत्या काही काळात सर्वसामान्य (पैसेवाल्यांना) स्पेसमध्ये फिरवून आणण्यापासून ते चंद्र आणि मंगळाच्या परतीच्या सहली आयोजित करण्यापर्यंतच्या योजना त्याच्या स्पेस-एक्स या कंपनीकडे तयार आहेत. अवकाशाशी थेट नातं जोडायला त्याची कंपनी अतिशय उत्सुक असून त्यासाठी कोटय़वधी डॉलर्सचा खर्च केला जात आहे.

आता जगातली अंतराळ स्पर्धा केवळ काही देशांमध्ये किंवा त्यांच्या सरकारी योजनांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अनेक धनाढय़ कंपन्यांना अंतराळ व्यावसायिकदृष्टय़ा खुणावत असून आज ही स्पर्धा एकटय़ा अमेरिकेपुरती मर्यादित असली तरी उद्या त्यातला ‘कमर्शियल’ फायदा दिसायला लागला की, इतर अनेक देशही त्यात सहभागी होतील. आकाशात अनेक कंपन्यांची विमानं उडताना आपण पाहतो तशीच जगातल्या विविध अंतराळ तळांवरून रॉकेट उडताना दिसतील. ‘स्पेस’मध्ये नेऊन परत आणणारी किंवा अनेक महिन्यांचा अंतराळ प्रवास घडविणारी ही अंतराळयानं कशी असतील याची एक झलक येत्या काही महिन्यांत दिसेल.

मस्क यांच्या ‘स्पेस-एक्सने त्यासाठी पूर्ण सिद्धता केली असून अमेरिकेतील टेक्सास राज्यामधल्या अंतराळतळावर ‘स्पेस-एक्स’ कंपनीचं नमुना यान (प्रोटोटाइप स्पेसक्राफ्ट) मान उंचावून उभं आहे. अशा स्पेसक्राफ्टचं हे पहिलंच उड्डाण असेल. त्याचं नाव आहे ‘स्टारशिप’. टेक्सास स्टेट हायवे -4 वरून पूर्वेकडे गेलं की, दक्षिण टेक्सासमधल्या एका विस्तीर्ण माळावर उभं असलेलं हे यान सध्या अमेरिकन प्रवाशांचं लक्ष वेधून घेत आहे. एलॉन मस्क यांच्या मते येत्या महिना-दीड महिन्यात ते अवकाशात झेपावेल.

या यानातून आता तरी कोणी माणूस प्रवास करणार नाही. कारण तसं पाहिलं तर हे चाचणी यान आहे. अशा काही चाचण्या यशस्वी झाल्या की, त्यापुढच्या काळात त्यातून मानवी प्रवासी पाठवायला सुरुवात होईल. कदाचित येत्या दशकात स्पेसशिपमधले प्रवासी मंगळावर पोहोचल्याची बातमीही ऐकायला मिळेल. सर्व संभाव्य यशापयशांची शक्यता लक्षात घेऊन बारीकसारीक गोष्टींचा विचार करून अशी यानं उडवावी लागतील. त्यांची यशस्वीता हीच त्यांच्या पुढच्या मोहिमांचं भाग्य ठरविणारी असेल. या मोहिमा यशस्वी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येतील हे तर उघडच आहे. कारण या मोहिमा व्यावसायिक असल्याने त्यांच्या यशावरच अशा कंपन्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

‘स्पेसशिप’ने उड्डाण केलं की, ते भूपृष्ठापासून 19 किलोमीटर किंवा 62 हजार 336 फुटांपर्यंत उंच अवकाश भरारी घेईल आणि नंतर सुखरूपपणे नियोजित वेळी, नियोजित स्थळी परतेल. ब्राऊनविले येथे या यानाची उभारणी सुरू असताना मस्क यांनी त्याविषयीची माहिती दिली. 11 वर्षांपूर्वीच स्पेस-एक्सने पहिलं यशस्वी अंतराळोड्डाण केलं होतं तोच ‘मुहूर्त’ साधून आता अधिक मोठा पल्ला गाठण्यासाठी मस्क यांची ‘स्पेस-एक्स’ सज्ज झाली आहे.

स्टारशिपची उंची 164 फूट असून व्यास 30 फुटांचा आहे. ते ज्या रॉकेटवरून अवकाशात जाणार आहे त्याची उंची 387 फूट असून ते सुमारे हजार टन वजनाचं आहे. ‘नासा’च्या चांद्रवीरांना चंद्रावर नेणाऱ्या सॅटर्न-5 रॉकेटसारखंच हे रॉकेट असून ते वारंवार स्पेसमध्ये जाऊन परत येईल. अशी अनेक फेऱ्या घालणारी यानंच पुढच्या काळात गरजेची आहेत. स्टारशिपची बांधणी करताना कार्बन फायबरचा वापर करावा असं मस्क यांनी ठरवलं होतं, परंतु नंतर अधिक घनतेचं स्टेनलेस स्टील जास्त उपयुक्त ठरेल असं त्यांना वाटलं आणि तसा बदल केला गेला. त्याची निर्मिती तुलनेने स्वस्त आहेच, शिवाय यान उड्डाण करून वेगाने अंतराळात जाताना आणि नंतर पुन्हा वातावरणातून भूपृष्ठावर येताना घर्षणातून जी प्रचंड उष्णता निर्माण होईल ती सहन करण्याची क्षमता या यानात असेल. मस्क म्हणतात, हे प्रायोगिक स्पेसशिप  उड्डाण आंतरखंडीय मिसाईलसारखंच आहे. फरक इतकाच की त्यावर शस्त्र्ाास्त्र्ां नाहीत. उद्याची स्पेस उड्डाणं शांततामय सहजीवनासाठीच असायला हवीत. मग ती पृथ्वीवरची असोत नाहीतर चंद्र-मंगळाकडे जाणारी.

आपली प्रतिक्रिया द्या