सुबक सुगरण

1093

>> विद्या कुलकर्णी

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला ।
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला ।
पिल निजते खोप्यात
जसा झुलता बंगला ।
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला ।

जुलै महिना होता व मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले होते. मुंबईतून बाहेर पडावयाचे म्हणून मी मैत्रिणीबरोबर उरळी कांचनला गेले होते. तिथे हवा फारच सुंदर होती व पाऊसही नेमकाच पडत होता. सवयीप्रमाणे कॅमेरा घेऊन बाहेर पडले. नुकताच पावसाचा जोर ओसरल्याने आम्ही शेतमळ्यात फिरावयास गेलो. तिथे बाजूलाच एक भलीमोठी विहीर होती. जरासे आत डोकावून पहिले तर काय आश्चर्य ! सात-आठ सुगरण पक्षी घरटी बांधण्यात मग्न होते. फोटो काढत मी एकाच जागी बराच वेळ उभी होते. सुगरण पक्ष्यांची मेहनत बघून अवाक झाले. घरटे विणण्यासाठी चोचीमध्ये गवताच्या काडय़ा घेऊन अतिशय कुशलतेने विणकाम चालू होते. त्यांचे घरटे उत्तम कारागीरीचा नमुना असल्यामुळेच या पक्ष्यांना ‘सुगरण’ म्हणतात. किती सार्थ नाव दिलेले आहे !

झाडाच्या झावळीच्या टोकाला लटकणारी सुगरणींची घरटी बघितल्यावर सुगीचे दिवस सुरू झाल्याची जाणीव झाली. सुगरण पक्षी हिंदुस्थान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार इत्यादी देशांत आढळतात. हे पक्षी स्थानिक असले तरी काही उपजाती मात्र स्थलांतर करणाऱया आहेत. रंग आणि आकारानुसार पट्टेरी सुगरण, काळ्या छातीची सुगरण आणि बया अशा तीन उपजाती आहेत. बया ही प्रजाती सर्वात जास्त आढळणारी आहे. भातशेतीच्या प्रदेशात समूहाने राहणारे सुगरण पक्षी उभ्या पिकांवर चरायला येतात व कीटक आणि धान्य खातात. बया सुगरण पक्ष्याचा आकार चिमणीएवढा असतो. प्रजननाच्या हंगामाखेरीज नर व मादी चिमणीसारखेच दिसतात. चिमणीच्या चोचीपेक्षा सुगरण पक्ष्याची चोच अधिक भक्कम असते. शेपटी छोटी असून सरळ कापल्यासारखी असते. प्रजननाच्या हंगामात नराचा रंग बदलून छाती, पोट व डोके पिवळे होते आणि पंखात पिवळ्या रेषा दिसू लागतात.

बया सुगरण पक्ष्याचा मे ते सप्टेंबर हा प्रजननाचा हंगाम असतो. मुबलक प्रमाणात धान्य, किडे, मुंग्या असलेल्या शेतांमध्ये, माडाच्या झाडांवर किंवा काटेरी झुडपावर घरटे बांधण्याचे काम नर करतो. जागेची निवड करताना साप, शिकारी पक्षी पोहोचणार नाहीत याची खबरदारी घेतो. हे पक्षी वसाहत करून समूहाने राहणारे असल्यामुळे एकाच झाडावर त्यांची वीस-पंचवीस घरटी लोंबकळताना दिसतात. नराला एक घरटे विणण्यासाठी सुमारे 14 ते 17 दिवस लागतात. गवत, काथ्या इत्यादी सामग्री जमवण्यासाठी तो 500 ते 600 वेळा चकरा मारतो. घरटय़ाचा आकार पुंगीसारखा असून मध्ये फुगीर व खाली नळीसारखा बोगदा असतो. त्यात मऊ पिसे व कापूस यांचा थर असतो. पिल्लांना वाऱयाचा त्रास होऊ नये म्हणून घरटय़ाला आतून सुगरण मादी किंचित चिखल लावते. असे आकर्षक घरटे बांधत असताना सुगरण पक्षी पंख फडफडवीत आवाज काढत मादीला साद देतो, घरटे पाहायला बोलावतो. मादी सुगरण घरटे न्याहाळते व पसंत पडल्यास ती त्या नराला वरते. मादी एकावेळी 2 ते 4 अंडी घालते. अंडी शुभ्र पांढऱया रंगाची असतात. अंडी उबविणे, पिल्लांना खाऊ घालणे वगैरे कामे मादी एकटीच करते. याचदरम्यान नर दुसरे घरटे तयार करून आणखी एका मादीशी जोडी जमवितो. अशा तऱहेने एकच नर 3 ते 4 माद्यांबरोबर जोडय़ा जमवितो. अर्धवट तयार झालेले घरटे कोणत्याही मादीने पसंत केले नाही तर नर ते पुरे करत नाही. बया पक्ष्यांना दुष्काळाची चाहूल अगोदरच लागते व ते आपली अंडी पाण्यात फेकायला लागतात. एक प्रकारे शेतकऱयांना त्यामुळे सूचनाच मिळते.

त्यांचे घरटे मोठमोठय़ा वादळवाऱ्यात, पावसात तग धरून वाऱयाच्या झोताबरोबर हेलकावत राहते आणि निसर्गातील या आश्चर्याने आपण स्तिमित होतो.

आपली प्रतिक्रिया द्या