लेख – हळवे पर्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगला खाडिलकर

आपल्या मृदुल स्वरांनी रसिकांच्या हृदयाच्या तारा छेडणाऱ्या, वाऱ्यावरती लकेर जावी तितक्या सहजतेनं गाणाऱ्या, कधी सावळ्या विठ्ठलाचे गुणगाण करणाऱ्या तर कधी रिमझिम पावसाचं येणं-जाणं आपल्याला सांगणाऱ्या, कधी आपल्या स्वप्नातला तो आनंदाचा घनू आपल्याला गाण्यातून दाखवणाऱ्या, कधी आई बनून तर कधी वाट पाहणारी प्रेयसी बनून येणाऱ्या, मनामधला वात्सल्याचा झरा आपल्या गाण्यांमधून दाखवणाऱ्या अशा अष्टपैलू गायिका सुमन कल्याणपूर आज आपल्यातून निघून गेल्या आहेत. भावगीतात, चित्रपटगीतात एक सुंदर हळवे असे पर्व नांदले आणि ते अतिशय कृतार्थतेने आज सगळ्या रसिकांचा निरोप घेऊन निघून गेले.

काही माणसं आतूनच गोड स्वभावाची असतात. सुमनताई पहिल्यापासून अशाच होत्या. निगर्वी, सालस हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्टय़. आपल्या वाटय़ाला आलेल्या प्रत्येक गाण्याला त्यांनी प्रामाणिकपणे न्याय दिला. गेली सहा दशके त्यांचा सूर देश-विदेशात निनादतोय. सुमारे साडेतीन हजार गाणी त्यांनी 13 भाषांमध्ये गायली. सुमनताई यांचा जन्म सध्या बांगलादेशातील ढाका येथे असलेल्या भवानीपूर येथे चित्रापूर सारस्वत समाजात झाला. चित्रापूर सारस्वत समाजात संगीताला अत्यंत आदराचे आणि महत्त्वाचे स्थान आहे. अगदी लहानपणापासून त्यांच्यावर भावसंगीताचे संस्कार होत गेले. लहानपणापासून त्या कार्यक्रमात गायला लागल्या. तलत मेहमूद, यशवंत देव, केशवराव भोळे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. संगीत आणि चित्रकला अशा वातावरणात त्या वाढल्या.

पुढे त्यांना चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. ‘मंगू’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सुरुवातीच्या काळात मिळेल ती गाणी त्यांनी गायली. त्यांच्या आवाजात प्रचंड माधुर्य होते. भाषा कोणतीही असो, भावना कोणतीही असो तिला शतप्रतिशत न्याय देण्याची त्यांच्या आवाजाची आणि गायकीची कुवत होती. आवाजातील गोडपणा आणि त्यांनी राखलेले आपले कोमल आत्मभान याच्या बळावर त्या गात गेल्या. आपल्या दमदार गायकीच्या जोरावर साठच्या दशकात चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकारांचे लक्ष त्यांनी वेधले. सरदार मलिक, पंडित श्रीनाथ, दत्ताराम, एन. दत्ता, शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी अशा त्या काळातील दिग्गज संगीतकारांनी त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली. अशा प्रकारे त्यांच्या गाण्याचा प्रवास मराठीसह हिंदी आणि इतर भाषांमध्ये सहजपणे सुरू झाला. त्यांची अनेक गीते आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

सुमनताईंना अनेक कला अवगत होत्या. त्यांनी खूप पर्यटन केले, उत्कृष्ट रेखाचित्र काढली. त्यांनी झाडं लावली की ते बहरलेच पाहिजे असा अलिखित नियम होता. बाहेर कुणी प्रवासाला निघाले की त्या स्वतःच्या हाताने विणलेले स्वेटर, टोपी त्या व्यक्तीला आपुलकीने द्यायच्या. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार, मोहम्मद रफी, बाबूजी, माणिक वर्मा यांच्या नावाने त्यांना पुरस्कार मिळाले. रसिकांच्या आग्रहाखातर त्यांना ‘पद्मभूषण’ मिळाला. हेदेखील त्यांच्या स्वभावाचे वैशिष्टय़ म्हणता येईल. आपल्या प्राजक्ती स्वरांनी प्रत्येक गीत मधुरतेच्या परमावधीला पोहोचविणाऱया सुमनताई आपल्या गीतांच्या रूपाने रसिकांच्या मनात कायम अमर राहतील.