जडमूढ तारावया, स्वामी अवतरले

>> प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे

श्रीदत्तात्रेयांचे चौथे अवतार म्हणविले गेलेले श्रीस्वामी समर्थ कर्दळीवनातून प्रकट झाल्यानंतर अनेक ठिकाणी भ्रमंती करीत अक्कलकोट येथे येण्यापूर्वी ‘शके सतराशे साठात। स्वामी जगदुद्दारार्थ। प्रकटले मंगळवेढय़ात। साक्षात दत्त अवतारे।।’ अशी ओवी ब्रह्मनिष्ठ वामनबुवा वैद्य यांच्या ‘श्रीगुरुलीलामृत’ या ग्रंथात पाहावयास मिळते. श्रीस्वामींच्या चरित्रपर ग्रंथात हाच ग्रंथ ‘प्रमाण’ म्हणून मानला जातो. मंगळवेढय़ाहून ते बेगमपूर, मोहोळ, सोलापूर असा प्रवास करीत करीत शके 1779 मध्ये अक्कलकोट येथे आले. तेथे 21 वर्षे त्यांनी वास्तव्य केले. त्यामुळे सोलापूर जिल्हय़ात मंगळवेढा ते सोलापूर अशा प्रवासात ते 40 वर्षे  राहिले. शके 1800 मध्ये त्यांनी वटवृक्षाखाली अक्कलकोट येथे निजानंदी निमग्न होऊन आपला अवतार समाप्त केला.

त्यांचा प्रकटदिन कोणता, तर तो म्हणजे चैत्रशुद्ध द्वितीया होय. याला प्रमाण काय, तर खुद्द श्रीस्वामी समर्थांनीच आपल्या  छेलीखेडेग्रामी यासंदर्भात उल्लेख केल्याचे श्रीस्वामींचे परमभक्त हरिभाऊ खोत तथा स्वामिसुत यांच्या अभंगात पाहावयास मिळते. माझे सन्मित्र विवेक वैद्य व त्यांच्या पत्नी सई वैद्य यांनी अत्यंत प्रेमाने त्याविषयीचा अभंग मला उपलब्ध करून दिला.

अनेक संतचरित्रांचे लेखन केलेले अभ्यासक व ‘पुनर्वसू प्रकाशन’चे सर्वेसर्वा असलेले विवेक व सई वैद्य यांनी मला पाठविलेला मजकूर पुढीलप्रमाणे आहे- ‘‘उत्तर हिंदुस्थानात ‘छेली’खेडे ग्रामात भक्त विजयसिंग खेळत असताना श्रीस्वामी महाराजांचा अवतार झाल्याचे स्वामिसुतांनी स्वतः अनुभवले व खालील अभंगात ते तिथी -वार-नक्षत्र देऊन प्रतिपादिले.’’

‘‘स्वामीं’चा अवतार शुक्लपक्षी झाला। असे हाचि भला जगदोद्धारा ।।1।। चैत्रमासी शुद्ध द्वितीया हो खरी। जयंती ती बरी शोभतसे ।।2।।  शुक्लपक्षी द्वितीया ही स्वामी जयंती देख। क्रत हे सुरेख तरणोपाया। बृहस्पतिवार तोचि स्वामिवार। झाला अवतार त्याच दिनी ।।4।। स्वामिसुत म्हणे नामे ही पावलो। अवतरी धावली म्हणूनिया।। 5।।

आणखी एका अभंगात ते म्हणतात की, ‘‘स्वामी अवतरले। जगदोद्धारी ती पाऊले ।। 1।। माझ्या स्वामीची करणी । जगदोद्धारा ही पर्वणी ।।2।। आदिज्योत ही सोज्वळ। त्यात शब्द ते मंजूळ ।।3।। धरणी दुभंगून केली दरी। स्वामिराज आले वरी ।।4।। अष्टवक्री सुकुमार । रूप दिसे हे सुंदर ।।5।। स्वामिसुत म्हणे भक्त । वत्सल खरा हा समर्थ ।।6।।’

हे स्वामिसुत कोण होते, तर श्रीस्वामींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे संसार लुटवून स्वामिभक्तीचा प्रसार करणारे थोर संतच होते. श्रीस्वामींनी ‘‘तू माझा पुत्र आहेस’’ असे म्हटल्यावरूनच त्यांना सर्वजण स्वामिसुत म्हणू लागले. श्रीस्वामींनी आपण अवतार समाप्ती करणार असल्याने भेटीस बोलावले. तेव्हा ते गेले नाहीत. उलट तत्पूर्वीच त्यांनी प्राण सोडला. म्हणूनच ‘‘बापाआधी पुत्र गेला’’ असे श्रीस्वामी म्हणाले. त्यांचे हरिपाठासारखे 31 अभंग असून ते ‘स्वामिपाठ’ म्हणून प्रसिद्ध  आहेत. त्यातून त्यांनी स्वामींचे स्वरूप, कार्य व उपदेश प्रकट केला आहे. मुंबईच्या चेंबूर येथील मठात त्यांचे वास्तव्य होते.

‘स्वामिपाठा’तील 31 अभंगांपैकी पहिलाच अभंग ‘भूपाळी’ स्वरूपातील आहे. श्रीस्वामींचा ‘प्रकटदिन’ त्यांनीच अक्कलकोट येथे जाऊन सुरू केला. त्याला त्यांनी ‘जयंतीदिन’ असे म्हटले आहे. त्यानिमित्ताने त्यांनी तुम्हा-आम्हाला भक्तीची जाग आणून दिली असून श्रीस्वामीचरणांचे दर्शन घेऊन कृतार्थ होण्याचा उपदेशही केला आहे. ‘भूपाळी’ 11 कडव्यांची आहे. त्यातील निवडक भाग घेऊन त्यातील उपदेशवाणीचा मागोवा इथे घेत आहे.

‘उठा उठा सकळ जन! पाहू चला स्वामिचरण ।। तुटोनि जाईल भवबंधन । भावे चरण पाहताचि ।।धृ।। इथे ‘सकळ जन’म्हणजे सर्व भाविक जन असा एक अर्थ आहे, तर दुसरा अर्थ म्हणजे शरीरस्थित इंद्रिये होत. या दोन्ही संदर्भात आपण भक्तिसेवेस ‘जागे’ व्हायला हवे. दर्शन कसे घ्यायचे, तर ते म्हणतात, ‘‘भावे घालोनि लोटांगण । चरण तुम्ही वंदा ते।।’’ शरणागत झाल्याशिवाय देव कृपा करीत नाही हा त्यातला मथितार्थ आहे. स्वामिनाम कसे आहे, तर महापापे जाळणारा तो वन्ही आहे. स्वामी समर्थांचा अवतार का झाला, तर ‘धर्मलोप बहु झाला। तेणे भूभार वाढला । म्हणोनि स्वामी अवतरला।  जड मूढा ताराया ।।’ इथे ‘जडमूढ’ याचा अर्थ ‘मूर्ख’ असा नसून अज्ञान असणारे लोक असा आहे. त्यांना भक्तिज्ञान  देऊन सन्मार्गी लावणे हेच तर संत-साधू-सत्पुरुष यांचे काम आहे. श्रीस्वामींच्या दर्शनाने मुक्ती मिळेल, म्हणजे ‘जन्म-मरण फेरा’ चुकेल. त्याचाही अर्थ असा आहे की, पुन्हा जन्म मिळालाच तर भक्ती कुळातच तो जन्माला येईल. मग त्याचेकडून भक्ती-साधना घडेल व दर्शन घडून येऊन सुखप्राप्ती होईल हा त्यातील गर्भितार्थ आहे.   श्रीस्वामींच्या ‘प्रकटदिन’ सोहळय़ाचे मूळ तत्त्व हेच आहे की, ते आपल्या हृदयीच प्रकट झाले आहेत. मग जीवनाच्या अखेरपर्यंतच नव्हे, तर जन्मोजन्मी त्यांची चरणसेवा प्राप्त व्हावी हीच प्रार्थना!

 

आपली प्रतिक्रिया द्या