उद्योगविश्व- व्यवसाय अन् संग्रहालयाचा संगम

>> अश्विन बापट

ठाण्यातील कुटिरोद्योग मंदिर हे विनायक जोशी यांचे मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची खासीयत असणारे हॉटेल. विनायक जोशी यांना अँटिक वस्तू जमवण्याचाही छंद आहे. हा छंद आणि हॉटेल व्यवसायाला एकत्र आणत त्यांनी एक वेगळी संकल्पना साकारली. कुटिरोद्योग मंदिरात त्यांनी उभारलेले हे संग्रहालय जतन, संवर्धनाचा आदर्श नमुना ठरले आहे.

व्यवसाय आणि छंद एकत्र हा समतोल साधणं म्हणावं तितकं सोपं नसतं. ठाणेकर विनायक जोशींनी कुटिरोद्योग मंदिराच्या माध्यमातून ही बाब सहजसाध्य करून दाखवली.

रोह्यामधील मेढे गावातले महादेव जोशी हे विनायक यांचे वडील. 50 च्या दशकात महादेव ठाण्यामध्ये आले आणि त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. या वाटचालीबद्दल विनायक जोशींना बोलतं केलं. ते म्हणाले, त्या काळी  नोकरीपेक्षा व्यवसायच करावा, असा आग्रही विचार मनामध्ये बाळगून माझ्या वडिलांनी वाटचाल सुरू केली. नोकरी-व्यवसायाकरिता ठाण्यात आलेल्यांना घरगुती पदार्थ खाण्यासाठी मिळावेत हाही एक हेतू होता. त्यातूनच सुरुवात झाली कुटिरोद्योग मंदिराची. यामध्ये प्रामुख्याने दुग्धजन्य पदार्थ हीदेखील आमची खासीयत होती. मसाला दूध आणि दुधी हलवा ही आमची खास ओळख, ज्याची चव आबालवृद्धांना आवडत असे. तसंच  चक्का, लोणी, तूप यासोबतच श्रीखंड हा आमचा सगळ्यात मागणीत राहिलेला आणि अजूनही डिमांडमध्ये असलेला पदार्थ. अगदी आजही आमच्या श्रीखंडाला प्रचंड मागणी असते. दसरा, पाडव्यासारख्या दिवशी याच श्रीखंडाचा खप अंदाजे तीन हजार किलोपर्यंत होत असतो. तसंच आमचं पीयूषही लोकांना प्रचंड आवडणारं आहे. अगदी लांबच्या अंतरावरून मंडळी पीयूषची चव चाखण्यासाठी येत असतात. आमच्या मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या या व्यवसायाला पुढे आणखी व्यापक रूप आलं ते आमच्या हॉटेलची भर त्यात पडली तेव्हा. साधारण 1991 च्या सुमारास हॉटेल सुरू झालं आणि त्याचा विस्तार दिवसेंदिवस वाढतोय. बटाटावडा, मिसळ, कोथिंबीर वडी, थालीपीठासह विविध महाराष्ट्रीयन पदार्थ आमच्याकडे उपलब्ध आहेत. याशिवाय साऊथ इंडियन डिशेसदेखील आहेत.

तेव्हा पाच ते सहा कर्मचाऱयांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आता 50 कर्मचाऱयांपर्यंत विस्तारलाय. यामध्ये मिठाई केंद्र तसंच रेस्टॉरंट या दोन्हींमधील कर्मचारी वर्गाचा समावेश आहे.

या व्यवसायाचा भार सांभाळताना विनायक आणि त्यांच्या पत्नी हेमा यांनी आपली छंदाची आवडही जपलीय. भांडी, कुंकवाचे करंडे आदी जुन्या वस्तूंचं अँटिक कलेक्शन ही त्यांच्या पत्नी हेमा यांनी जपलेली आवड. त्यांचा सुमारे पाच हजार वस्तूंचा संग्रह आज त्यांनी जपलाय. याशिवाय विनायक यांनी काडेपेटय़ांचा संग्रह केलाय, ज्यांची संख्या सुमारे 40 हजारांच्या घरात आहे, तर सुमारे तीन हजार ओपनर्सचंही कलेक्शन विनायक यांनी अत्यंत खुबीने जपलंय. कुटिरोद्योग मंदिरात येणाऱया मंडळींना या संग्रहाला भेट देता येते. या व्यवसाय आणि संग्रहालयाच्या जोपासनेत, वाटचालीत आज विनायक यांचे पुत्र सिद्धार्थ आणि केदार यांचीही त्यांना साथ लाभतेय.

(लेखक हे एबीपी माझाचे सीनियर प्रोडय़ुसर सीनियर न्यूज अँकर आहेत.)