लेख – चीनला एकटे पाडण्याची वेळ!

>> कर्नल अभय बा. पटवर्धन (निवृत्त)

चीन सोडून जगातील इतर सर्वांना कोरोना महामारीची जबरदस्त आर्थिक झळ बसली हे ढळढळीत सत्य चीनने छेडलेल्या तिसऱया महायुद्धाच्या संकल्पनेला उघड करते. त्यामुळे सर्व बाधित देशांनी एकजूट होऊन चीनला एकटे पाडण्याची (आयसोलेट चायना) वेळ आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने चीनला बहाल केलेला विकसनशील राष्ट्राचा दर्जा काढून घेतला पाहिजे. चीन आता सर्व जगाला विकत घेऊन त्यावर सत्ता गाजविण्याची स्वप्ने पाहतो आहे.

कोविड-कोरोना-19 च्या विषाणूंना मोकाट सोडून सर्वत्र आर्थिक, वैद्यकीय आणि सामाजिक उलथापालथ सुरू करून चीनने 2020 मध्ये महायुद्धाच्या दुसऱया टप्प्याची सुरुवात केली. या रोगाच्या प्रादुर्भावाने जगातील बहुतांश राष्ट्रांची अर्थव्यवस्था इतकी खिळखिळी झाली आहे की, चीनने दिलेले आर्थिक कर्ज परत मागितले (लोन विड्रॉल) तर काय करायचे, त्यामुळे निर्माण होणाऱया आर्थिक भूकंपाला कसे तोंड द्यायचे याची चिंता अमेरिकेसारख्या बलाढय़ा राष्ट्रालादेखील लागली आहे तर इतरांची काय बात? चिनी पॉलिट ब्युरोनुसार चीन 2025 पर्यंत जगातील सर्वात शक्तिशाली तंत्रज्ञ राष्ट्र (सुपर पॉवर ऑफ टेक्नॉलॉजी) बनेल. 2035 पर्यंत तो नवीन उपक्रम सुरू करणारा जगातील सर्वश्रेष्ठ देश (इनोव्हेशन लीडर) असेल आणि 2049/50 मध्ये सर्वांना आर्थिक सामरिकदृष्टय़ा जगातील सर्वात सामर्थ्यवान शक्तिशाली देश म्हणून चीनला मान्यता द्यावीच लागेल. आपला उद्देश साध्य करण्यासाठी चीन जैविक हत्यारांचा वापर करेल. त्यासंदर्भात युद्धाभ्यासात जैविक हल्ले कसे करायचे याबद्दल सराव केला गेला. सूत्रांनुसार या सरावात दोन मोठय़ा गोष्टी स्पष्ट झाल्या.

पहिली म्हणजे चिनी लष्कराला (पीएलए) प्रखर सूर्यामुळे जैविक हल्ल्यात वापरले जाणारे अनुवंशवाहक जैविक विषाणू (पॅथोजन्स) मृतप्राय होतात आणि पाऊस किंवा बर्फ वर्षावामुळे त्यांच्या उडत्या परमाणूंवर (एरोसोल पार्टिकल्स) परिणाम होतो. शाश्वत पवन गती (स्टेबल विंड कंडिशन्स) असलेल्या रात्री, झुंजूमुंजू पहाटे किंवा संध्याकाळी गोरज मुहूर्तावर जैविक अस्त्र्ाांचा मारा करणे फलदायक असते. कारण त्यामुळे लक्ष्य क्षेत्रात (टार्गेट एरिया) विषाणू वहन सुरळीतपणे होऊ शकते. जैविक हल्ल्यामुळे शत्रुराष्ट्रात रुग्णालयाची आवश्यकता भासणाऱया रुग्णांची संख्या इतकी वाढली पाहिजे की, त्यांची रुग्ण निवारण प्रणाली (मेडिकल सिस्टीम) कोलमडून त्याच्या प्रभावाने त्याची राजकीय, औद्योगिक, आर्थिक व सामरिक ताकद नष्टप्राय होऊन तेथील जनता व सुरक्षा दलांमध्ये पराभूत मानसिकता निर्माण झाली पाहिजे हा धडा मिळाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीएलएने जैविक हत्यारातील अतिसूक्ष्म जैविक परमाणूंना गोठवून (फ्रीझ ड्राय), शत्रू क्षेत्रावर त्यांच परिवर्तन उडत्या परमाणूंमध्ये (फ्लाइंग एरोसोल्स) करण्याची क्षमता प्राप्त केली आहे. शत्रू कोरोना विषाणूंच्या माऱयामुळे विवश झाला की त्याच्यावर आर्थिक आणि सामरिक आक्रमण करून वर्चस्व मिळवायचे, त्याचा ताबा घ्यायचा ही तिसरी महत्त्वाची बाब आहे.

हा टप्पा गाठण्यासाठी चीनने प्रचंड जीवहानी सहन केली. पण आज चीनपाशी जगातील मोठय़ा कंपन्या, अप्रतिम संरक्षण व्यवस्था, अत्युच्च दर्जाचे तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञान, संसाधन, आभासी माहितीशास्त्र, ब्लॉकचेन, पेटंट, पुनर्वापरी ऊर्जा आणि सर्वोत्तम इलेक्ट्रिक इंजिनीयरिंग कपॅबिलिटी आहे. सूत्रांनुसार जी-20 ग्रुपच्या सदस्यांमध्ये चीन एकटाच असा देश आहे ज्याचे सकल घरेलू उत्पादन (जीडीपी) कोविड-कोरोना-19 विषाणूंनी 2020 मध्ये निर्माण केलेल्या जागतिक महामारीमधे दोन पूर्णांक बत्तीस टक्क्यांनी वृद्धिंगत झाले आहे. चीन सोडून जगातील इतर सर्वांना कोरोना महामारीची जबरदस्त आर्थिक झळ बसली हे ढळढळीत सत्य चीनने छेडलेल्या तिसऱया महायुद्धाच्या संकल्पनेला उघड करते. त्यामुळे सर्व बाधित देशांनी एकजूट होऊन चीनला वाळीत टाकण्याची (आयसोलेट चायना) वेळ आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने चीनला बहाल केलेला विकसनशील राष्ट्राचा दर्जा काढून घेतला पाहिजे. चीन आता सर्व जगाला विकत घेऊन त्यावर सत्ता गाजविण्याची स्वप्न पाहतो आहे. चीनमधील विषाणू प्रसारावर आळा घातल्यानंतर चीनने हेल्थ सिल्क रूट आणि वैद्यकीय औद्योगिक प्रतिष्ठानांना कार्यान्वित करून वैद्यकीय साधन/साजोसमान/सामुग्री/औषधनिर्मिती सुरू केली आणि विषाणूंच्या या जागतिक लाटेवर स्वार होऊन प्रचंड प्रमाणात आर्थिक लाभ घेत आपली मोठी केली आहे.

जैविक युद्धाच्या परिणामस्वरूप चीन अव्वल जागतिक आर्थिक महासत्ता बनला आहे. 2022 आणि 2023 मध्ये तो अमेरिकेवर आर्थिक मात करेल. 2024 पर्यंत चीन जगातला सर्वात श्रीमंत व्यापारी देश बनेल. चीनच्या ‘मेड इन चायना 2025 व्हिजननुसार’ चीन किमान नऊ विद्याशाखांमधे जगातील प्रथम क्रमांकाचा देश असेल. पण हे यश प्राप्त करताना अ) चिनी विषाणूंमुळे जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊन चीनला आर्थिक महासत्ता कसा बनला; ब) हिंदुस्थान, अमेरिका, ब्रिटन, इटली, शांघाय, ऑस्ट्रेलियाप्रमाणे चीनला कोविड-कोरोना-19चा तडाखा का बसला नाही; क) 2019 मध्येच चीनने त्यांच्या वीस लाखांच्या सेनेत अर्धी कपात करायचा निर्णय का व कसा घेतला; ड) जागतिक महाशक्ती बनू इच्छिणाऱया चीनने पीएलएची संख्या हिंदुस्थान व अमेरिकेपेक्षाही कमी का केली; इ) संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षकांना वुहान प्रयोगशाळांमध्ये जाऊन निरीक्षण करण्याची परवानगी का नाकारली गेली? आणि फ) हे विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेत (लेबॉरेटरी) निर्माण झालेत की मांस बाजारात (वेट मार्केट) याबद्दल चीन जगाला संभ्रमात का ठेवतो आहे? या प्रश्नांची उत्तर चीनकडून अपेक्षित आहेत.

डिसेंबर 2019/जानेवारी 2020मध्ये हिंदुस्थानवर झालेल्या पहिल्या कोविड हल्ल्यामुळे आपले फारसे नुकसान झाले नव्हते. कारण त्यावेळी हिंदुस्थानात सर्वत्र थंडी होती आणि वातावरणातील वाऱयाचा रोख अरबी समुद्राकडे होता. मात्र त्यानंतर मार्च महिन्यात असलेले समशीतोष्ण वातावरण आणि शाश्वत पवन गतीमुळे दुसऱया कोविड हल्ल्याने हाहाकार माजवला. तीच परिस्थिती मार्च-एप्रिल 2021 मध्ये निर्माण झाली. नंतर यात ‘म्युकर मायकोसीस’सारख्या विषाणूंची भर पडली ज्यांनी कोरोनामधून सुखरूप बाहेर पडलेल्या रुग्णांना बाधित करून मृत्युमुखी धाडले, धाडत आहेत. अशा प्रचंड जीवहानीमुळे हिंदुस्थान सरकार/जनता बेजार/हताश होते आहे हे पाहून चीनने आता भूतान/लडाखच्या सीमेवर रणगाडे/क्षेपणास्त्र्ाs/विमान आणणे सुरू केले आहे. आपल्यावर तो प्रत्यक्ष आक्रमण करेल की नाही हे येणार काळच सांगेल. जगभरात थोडय़ाफार फरकाने हीच परिस्थिती पाहायला मिळते आहे. क्वाडमध्ये जायचे नाही ही तंबी चीनने बांगलादेशला दिली आहे. क्वाडमध्ये जास्त इंटरेस्ट घेतला/दाखवला तर कोळसा व्यापार बंद करू ही धमकी त्यांनी ऑस्ट्रेलियाला दिली असून अमेरिकेच्या आर्थिक नाडय़ा आवळणेही सुरू केले आहे. मजेची गोष्ट ही की, चीनच्या दादागिरीमुळे भयभीत झालेली वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अशा प्रगत विषाणूंना ‘चायनीज कोविड व्हेरियंट’ म्हणण्याऐवजी त्यांना इंडियन, ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व्हेरियंट म्हणते आहे. एकूणच हे सर्व अगम्य व अतर्क्य आहे.

आपली प्रतिक्रिया द्या