लेख : मुद्दा : झाडांचा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नितीन ग. गांधी

कणकवलीकर 150 वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाला निरोप दिल्याचे गेल्या महिन्यात वाचण्यात आले. या वृत्तात स्थानिक कणकवलीकरांनी झाडांबाबत मनोगत व्यक्त करताना त्यांच्या वेदना डोळे व चेहऱ्यावर दिसल्या. शासनातर्फे मुंबई-गोवा रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी झाडांची निर्दयपणे कत्तल आणि मोठ्या वृक्षांचा बळी देणे आवश्यक आहे का? अशी मोठी झाडे दुसरीकडे स्थलांतरित करू शकत नाहीत का, असे प्रश्न निर्माण होतात. कणकवलीतील ज्या वडाच्या झाडावर कित्येक वर्षे पक्ष्यांनी घरटी बांधून आपल्या पिढय़ान्पिढय़ा जन्माला घातल्या व निसर्गाचा समतोल राखला आणि कणकवलीकरांना मायेची सावली, ऊन, वारा व पावसात दिली त्या कणकवलीकरांच्या मनात खदखदणारी सल दिसत होती.

जे वृक्ष 100 ते 150 वर्षांपूर्वीचे आहेत ते विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून स्थलांतरित करता येऊ शकतात. आज परदेशात अशी झाडे स्थलांतरित केली जात आहेत. जर मुंबई-गोवा रस्त्याचे चौपदरीकरणाचा स्तुत्य उपक्रम असला तरी अशा अनेक किती मोठ्या झाडांचा बळी घेण्यात येणार आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडण्याची शक्यता बळावते. जसे हवामानात बदल होऊन वेळी अवेळी पाऊस पडणे, तापमानाचा पारा वाढणे. सदर विषयाचे गांभीर्य शासनाने व प्रशासनाने लक्षात घेऊन अशा मोठ्या झाडांची कत्तल न करता विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशी झाडे दुसऱ्या स्थळी स्थलांतरित करावी आणि निसर्गाचा समतोल राखावा.