प्रासंगिक – हुतात्म्यांना मानवंदना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मनमोहन रो. रोगे

हुतात्मा! ज्या वीराने धर्मासाठी, राष्ट्रासाठी प्राणाचे बलिदान केले तो प्रत्येक वीर, प्रत्येक लढवय्या, प्रत्येक क्रांतिकारक हुतात्मा. युद्धांमध्ये ठार झालेल्या वीरांना वीरमरण आले असे मानले जाते. म्हणून तर युद्धात वा चकमकीत कामी आलेल्या जवानांना वीरमरण आले असे मानतात.

आपल्या देशावर मुस्लिम आक्रमकांनी अनेक शतके राज्य केले. आपापली राज्ये वाचवण्यासाठी त्यांना वेळोवेळी विरोध केला गेला, पण त्या आक्रमकांचा धर्मांधपणा छत्रपती शिवरायांनी बरोबर ओळखला. मुस्लिम आक्रमकांचे संकट फक्त राज्यावरच नसून धर्मावरही आहे, हे ओळखून त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेतला आणि अथक प्रयत्नांनी, जिवावर बेतणाऱ्या कितीतरी संकटांना धैर्याने व युक्तीने सामोरे जात हिंदवी स्वराज्य निर्माण केले. या साऱ्या प्रयत्नांत त्यांना सर्व जाती-जमातींमधील जिवास जीव देणाऱ्या निष्ठावान मावळय़ांची साथ लाभली. त्यातील हजारो मावळय़ांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ते सारे शूर मावळे हुतात्मा होय. धर्म आणि स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या शूर महापुरुषांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल.

गुरू तेगबहाद्दूरसिंग यांचे व त्यांच्या चार नातवांचे (गुरू गोविंद सिंग यांच्या मुलांचे) बलिदान हेसुद्धा धर्मासाठी पत्करलेले हौतात्म्य म्हणावे लागेल. मुस्लिम आक्रमकानंतर  हिंदुस्थानात इंग्रजांचे राज्य सुरू झाले. त्यांच्या अत्याचाराच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी पहिला मोठा लढा झाला तो 1857 साली.  मंगल पांडेंपासून अनेक शूर पुत्रांना या लढय़ात हौतात्म्य प्राप्त झाले. त्यानंतर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, उधमसिंग, अश्फाकउल्ला खान, बाल हुतात्मा शिरीषकुमार अशा हजारो ज्ञात-अज्ञात वीरांना हौतात्म्य प्राप्त झाले. मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सीमेवरील चकमकीत आणि युद्धात हजारो सैनिकांना वीरमरण आले. 1965च्या हिंदुस्थान-पाक युद्धात अद्भुत, अद्वितीय पराक्रम करणारे, मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित झालेले शूर जवान अब्दुल हमीद, सीमेवर रोज हौतात्म्य पत्करणारे शूर जवान आणि इतर अज्ञात हुतात्मे यांच्याबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ असायला हवे. हे सारे हुतात्मे प्रातःस्मरणीय होय. आजच्या हुतात्मा दिनी त्या साऱ्या पुण्यात्म्यांचे पुन्हा स्मरण करून वंदन करू या!