
>> सुजाता बाबर
‘जागतिक अज्ञात उडत्या तबकडय़ा दिन’ अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी लोकांनी एकत्र यावे आणि उडत्या तबकडय़ा शोधाव्यात असा या उत्सवामागचा हेतू आहे. काही जण २४ जून तर काही जण २ जुलै रोजी हा दिन साजरा करतात. विज्ञानाने जरी उडत्या तबकडय़ांच्या अस्तित्वावर अनेक प्रश्न उभे केले असले तरी अशा तबकडय़ा आहेत असे मानणारे अनेक आहेत, या नावातच त्याचे रहस्य दडलेले आहे ते म्हणजे या अज्ञात आहेत, आजही त्यांना ओळखता आलेले नाही. हा शब्द बराचसा लोकप्रिय झाला तो १९५० च्या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या विज्ञान कथांमधून. हवेत उडणाऱया, परग्रहावरून आलेल्या, त्यामधून काही परग्रहवासी घेऊन आलेल्या अशा रहस्यमय तबकडय़ा लोकांमध्ये अतिशय प्रसिद्ध झाल्या. त्याचे आकर्षण मानवाला आजही आहे आणि म्हणूनच हा विषय वादग्रस्त असला तरी लोकप्रिय आहे.
२४जून १९४७ सालची गोष्ट. केनेथ अरनॉल्ड नावाच्या एका नागरी वैमानिकाने माऊंट रेनियरच्या जवळ एक विशिष्ट आकारामध्ये फिरणाऱया नऊ उडणाऱया वस्तू पाहिल्याची सूचना दिली. त्यांनी या उडणाऱया तबकडय़ांचा वेग ताशी १९३१ किलोमीटर असल्याचे नोंदवले होते. त्या एखाद्या बशीच्या आकाराच्या वस्तू होत्या हेही त्याने नोंदवले होते. ही बातमी अतिशय प्रसिद्ध झाली. तसेच २ जुलै १९४७ रोजी रोझवेल, न्यू मेक्सिको इथे विल्यम ब्राझील नावाच्या माणसाने तबकडय़ा एकमेकांवर आपटलेल्या पाहिल्याचा दावा केला. तो आणि त्यांच्या मुलाने काही प्रकाशमान वस्तू पाहिल्याचे सांगितले. या बातमीने खळबळ उडवली होती, परंतु आर्मीने हा हवामान खात्याने पाठविलेला मोठा फुगा असल्याचे सांगितले होते. या दोन्ही घटनांनी उडत्या तबकडय़ांविषयी कमालीची उत्सुकता जागी केली आणि म्हणून हे दिवस ‘अज्ञात उडत्या तबकडय़ा दिन’ म्हणून साजरे केले जातात.
असाही एक वर्ग आहे, जो उडत्या तबकडय़ांवर विश्वास ठेवणारा आहे. अनेकांनी अशा तबकडय़ा पाहिलेल्या असल्याचा दावा केला आहे, परंतु त्यासाठी केलेल्या अभ्यासामध्ये या तबकडय़ा म्हणजे मानवाने पाठविलेले उपग्रह, विमाने, शोधार्थ पाठविलेले फुगे, उल्का ढग, पाणथळ ढग, उल्का किंवा तेजस्वी ग्रहांसारख्या खगोलशास्त्राrय वस्तू असल्याचे लक्षात आले आहे. वाळवंटातील मृगजळाप्रमाणे आकाशातदेखील मृगजळ दिसते. तेही अशा तबकडय़ांप्रमाणे भासू शकते असे हे अभ्यासक सांगतात.
१९४७ सालची रोझवेलची घटना खूप प्रसिद्ध झाली आणि नंतरही अनेक घटना समोर आल्या. त्यामध्ये एक घटना आहे १९५० सालची ओरेगॉन, कॅनडा येथील मॅकमिनव्हिले येथील घटना. एवलिन ट्रेंट या महिलेने आकाशात धातूची चमकदार वस्तू पाहिली. तिने त्याचे फोटो घ्यायचे ठरविले. हे फोटो प्रसिद्धीसाठी द्यावे की न द्यावे अशा विचारात ती होती. तिला काही चौकश्यांच्या संकटात सापडायचे नव्हते. एका वार्ताहराला मात्र ते फोटो सापडले. त्या फोटोंची छाननी करणाचा प्रयत्न केला, पण काही यश आले नाही. एवलिन आणि पॉल (तिचे पती) यांना मात्र शेवटपर्यंत ते उडत्या तबकडीचे फोटो आहेत असेच वाटत होते. १९५७ मध्ये बिहार येथील कादरी, बोरसा आणि मंगळदा या गावातील ८०० गावकऱयांना जमिनीपासून केवळ ५०० फुटांवर एखाद्या मोटरगाडीच्या इंजिनासारखा आवाज करणारी वस्तू दिसली होती. ही वस्तू प्रचंड वेगाने आणि धुराचे लोट सोडत क्षणार्धात निघून गेली. हे नेमके काय होते ते त्या गावकऱयांना समजले नाही. १९७६ मध्ये स्पेनमधील लास रोजस, ग्रॅन कॅनेरियाच्या रहिवाशांनी अवाढव्य, अर्धपारदर्शक निळा गोल पाहिल्याचे सांगितले. या अवाढव्य गोलामध्ये त्यांना दोन मानवसदृश आकृत्या दिसल्याचे त्यांनी नोंदवले. हा गोल मोठा होऊन आकाशात लुप्त झाला. तसेच काही नौदलाच्या लोकांनीदेखील क्षितिजावर निळसर प्रकाश पाहिल्याचे सांगितले होते. असेच इराणमध्येदेखील एक घटना नोंदवली होती. १९ सप्टेंबर १९७६ रोजी इराणी हवाई दलाला तेहरानमध्ये विचित्र प्रकाश पाहिल्याचा फोन आला होता. त्याच्या शोधासाठी एक विमान पाठवले गेले. हे विमान जसजसे तबकडीजवळ जाऊ लागले तसतसे या विमानात अनेक तांत्रिक बिघाड झाले. अखेरीस त्या वैमानिकाला विमान घेऊन परत यावे लागले. या तबकडय़ांनी उलटहल्ला केल्याचेदेखील या वेळी अनुभवले होते. १९८१ मध्ये न्यूयॉर्क येथील हडसन व्हॅलीमध्ये अजूनच वेगळा अनुभव आल्याच्या नोंदी आहेत. इथे अनेक जणांनी तबकडी पाहिली होती. ती गोल नसून त्रिकोणी आकाराची होती. तसेच ती जेव्हा शहरावरून गेली तेव्हा काही आवाजदेखील आला नव्हता. ती एखाद्या मोठय़ा शहरासारखी वाटत होती. असेच अनेक अनुभव जपान, हिंदुस्थान, अमेरिका आणि अनेक देशांमध्ये आले होते. मात्र प्रत्येक वेळी त्या तबकडय़ा नव्हत्या हेदेखील सिद्ध झाले होते. आश्चर्य म्हणजे १९४६पर्यंत साधारण २००० अशा घटना नोंदवल्या गेल्या होत्या. अनेक देशांनी या तबकडय़ांच्या शोधार्थ मोहिमादेखील राबविल्या. त्यांना त्यांनी प्रोजेक्ट म्हटले होते. त्यातील प्रोजेक्ट ब्लू बुकने काही तबकडय़ा म्हणजे हिरव्या रंगाचे अग्निगोल असल्याचे सांगितले होते. या प्रोजेक्टकरिता जे. ऍलन हायनेक या अंतराळवीराला मुख्य सल्लागार म्हणून नेमलेले होते. त्यात उडत्या तबकडय़ांविषयी फारसे समाधानकारक निराकरण सापडले नाही.
उडत्या तबकडय़ांविषयी भक्कम पुरावे जरी सापडत नसले तरी हा विषय मात्र लोकप्रिय झाला आणि आजही आहे. हा विषय इतका लोकप्रिय आहे की, या संकल्पनेवर अनेक शेकडो चित्रपट निघाले आणि ते सर्व लोकप्रिय ठरले. यात तबकडय़ा म्हणजे परग्रहावरील जीव असेच समीकरण मानले जाते.
आजही या तबकडय़ांच्या नोंदी होत असतात. त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणारे गटही आहेत, परंतु खगोलशास्त्र मात्र ते मानत नाही. अनेक ज्येष्ठ खगोल वैज्ञानिक त्याला एक ‘आधुनिक अंधश्रद्धा’ असेच मानतात. १९४७नंतर युद्धकाळामध्ये तबकडय़ांच्या नोंदींची संख्या वाढत गेली. साधारण १८,५०० नोंदी केल्या गेल्या आणि ९० टक्के प्रकरणांमध्ये ते नेमके काय आहे हे ओळखता आले आहे.
आकाशामध्ये आपल्याला काही गोष्टी दिसतात आणि त्यांना अज्ञात उडत्या तबकडय़ा असे म्हटले जाते. यात सामान्यपणे ज्या गोष्टी येतात ते म्हणजे फाटा मोरगना किंवा मृगजळ आणि अशा वेळी खगोलीय क्षितिजाखाली असणाऱया वस्तू आकाशामध्ये उंच घिरटय़ा घालत आहेत असे भासते. अनेकदा लोक त्यांना अज्ञात उडत्या तबकडय़ा म्हणतात. आकाशातील मृगजळांमुळे आकाशातील दूरवरच्या वस्तूंचे आकार आपल्याला विस्कळीत झाल्यासारखे दिसतात आणि मग आपल्याला याच अज्ञात उडत्या तबकडय़ा आहेत असे वाटते. तसेच आकाशामध्ये काही ढग हे दोन्ही बाजूंनी बहिर्वक्र भिंगासारखे असतात. त्यांनासुद्धा अनेक जण अज्ञात उडत्या तबकडय़ा समजतात. अनेकदा अशा नोंदी सापडल्यावर जे काही तपास केले जातात त्यामध्ये या अज्ञात उडत्या तबकडय़ा नसून खगोलीय वस्तू असल्याचे लक्षात आले आहे. उदा. तेजस्वी तारे, ग्रह, उल्का, अंतराळयान, कृत्रिम उपग्रह आणि चंद्र, तर काही वेळा त्या विमान (हवाई जाहिरात आणि इतर विमाने, क्षेपणास्त्र प्रक्षेपण) नसून विमान (हवाई जाहिरात आणि इतर विमाने, क्षेपणास्त्र प्रक्षेपण) असल्याचे लक्षात आले आहे. काही वेळा फुगे (खेळण्याचे फुगे, हवामानाचे फुगे, मोठे संशोधन फुगे) असल्याचे लक्षात आले आहे, तर काही वेळा इतर वातावरणातील वस्तू आणि घटना असल्याचे लक्षात आले आहे. उदा. पक्षी, वेगळे ढग, पतंग, सौरज्वाला. काही वेळा समुद्रातले सर्च लाईट असल्याचे लक्षात आले आहे. १९५२ ते १९५५ या कालावधीमध्ये अमेरिकेतील एका विख्यात संशोधन संस्थेच्या अहवालात हा एक मानसशास्त्राrय प्रकार (भास)आहे असे सांगितले गेले आहे.
अनेकदा उडत्या तबकडय़ा दिसत आहेत हे सांगून लबाडी, थट्टा, फसवणूक किंवा गंमत केल्याचे किंवा अफवा पसरविण्याचे उद्योग लक्षात आले आहे. अशा अनेक घटना सांगितल्या जातात. त्यांचा वेध घेतल्यानंतर, फोटोंची छाननी केल्यावर ती फसवणूक असल्याचे समजले होते.
असे असूनही आजही अज्ञात उडत्या तबकडय़ांविषयी जिज्ञासा, कुतूहल आहे. उडत्या तबकडय़ा पाहिल्याचा दावा केल्यानंतर घेतलेल्या शोधांमध्ये काही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. अनेक देशांतील वायुसेनेने याविषयी अनेक शोध मोहिमा केल्या होत्या, परंतु हाती काहीच लागलेले नाही. परग्रहांवर वेगळी जीवसृष्टी असण्याची शक्यता विज्ञानानेदेखील मान्य केली आहे. ही शक्यता आपण नाकारू शकत नाही आणि म्हणूनच जीवसृष्टीच्या शोधार्थ अनेक मोहिमा पाठवल्या गेल्या आणि पुढेही पाठविल्या जातील, परंतु जोपर्यंत ठोस पुरावा हाती येत नाही, त्याची वैज्ञानिक गणिते जुळत नाहीत तोपर्यंत आपण ठामपणे “हो, अशी जीवसृष्टी आहे’’ असे वक्तव्य करू शकत नाही. आणि तोपर्यंत त्यांच्या अस्तित्वाला ठामपणे मान्यता विज्ञानवृत्ती तरी देणार नाही.





























































