शहरे ताडमाड, खेडी खड्ड्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ज्ञानेश्वर भि. गावडे 

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा येथील खेडी व शहरे यांचे प्रमाण 80 ते 20 टक्के असे होते. सध्या ते पन्नास-पन्नास असे आहे. काही दिवसांत 70 ते 30 असे खेड्यांचे प्रमाण होईल. काही वर्षांनंतर नक्की 80 टक्के शहरे आणि त्या तुलनेत 20 टक्के खेडी असतील. औद्योगिकीकरण, लोकांच्या जीवनशैलीत बदल, प्रगत शिक्षण व्यवस्था, अद्यायावत नागरी सुखसोयींचे आकर्षण यामुळे शहरे ताडमाड व खेडी खड्ड्यात जात आहेत. मात्र ही संक्रमण अवस्था बदलता येत नाही, टाळता येत नाही. यामुळे देशातील खेडी झपाट्याने ओसाड पडत चालली आहेत आणि शहरे वाढत आहेत.

उदाहरण द्यायचे झाले तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे-नाशिक (महामार्ग क्रमांक 4 वरील झालेल्या पूर्वीच्या गावांचा आणि त्या जागी असलेल्या नवनगरांचा घेता येईल. पुणे-नाशिक या महामार्गावर मंचर हे ग्रामपंचायत असलेले गाव आहे. पुतळा बसवलेली गावची वेस हटवायला नको म्हणून (एसटीच्या बस गाड्या गावाबाहेर काढून नवा मोटर स्टॅण्ड वसूल केला. नंतर त्याभोवती व व्यावसायिक टपर्‍या आल्या. त्यामुळे गर्दी, वर्दळ व गजबजाट सुरू झाला. तो टाळण्यासाठी नवे बाह्य वळण देण्यात आले. परिणामी गावालगतची बागायती जमीन शहीद झाली. सुरू झालेला मोटार स्टॅण्ड नव्याने गजबजल्यानंतर मंचरच्या दक्षिणेला असलेल्या गायमुखापासून ते उत्तरेला असलेल्या डोंगरापर्यंत नवे बाह्य वळण देण्याच्या विचारात आहेत. म्हणजे आणखी बागायत जमिनी व घरे स्वाहा होणार आहेत. त्यामुळे मोकळ्या जमिनीवर गावठी विकासक घरे बांधणार, एक दोन प्लॉटचे तुकडे फेकून जमीनधारकांना गप्प करणार हे ओघाने येणारच आहे.

याच गायमुखापासून निघोटवाडीचा घास घेऊन जाणारे मंचरचे दुसरे बाह्य वळण पश्चिमेला असणार्‍या मंचर-भीमाशंकर रोडला भिडणारा असल्याचे समजते. म्हणजे थोडक्यात मंचरची वस्ती दोन्ही अंगांनी फुलणारी आहे. अशा तर्‍हेने एकेकाळचे मंचर हे खेडे लवकरच शहर होणार आहे. ही गावे फुगणार आहेत. सध्याचे राजगुरूनगर (खेड) व नारायणगाव ही गावेही फुलणार आहेत. सध्याच राजगुरूनगर हे पुणे शहराचे उपनगर झाल्यात जमा आहे तर नारायणगावाजवळील खोडद येथील दुर्बिणीमुळे आंतरराष्ट्रीय झालेले आहे. त्याचप्रमाणे चाकण गायमुख, आळेफाटा, कळंब ही पुणे-नाशिक मार्गावरील गावखेडी कालांतराने विकासाच्या नावाखाली शहरे म्हणून विस्तारणार आहेत.