आभाळमाया – आंतरतारकीय पाहुणे!

>> वैश्विक, [email protected]

खगोल अभ्यासाच्या आणि अवकाश यानं पाठविण्याच्या आरंभीचं पाठवलेलं व्हॉएजर-1 हे यान पृथ्वीवरच्या जैविक आणि सांस्कृतिक माहितीच्या सांकेतिक नोंदीसह सूर्यमालेबाहेर म्हणजे आंतरतारकीय क्षेत्रात पोचलंय. त्यातच केसरबाई केरकर यांच्या ‘जात कहां हो’ या भैरवी रागातील ‘डिस्क’चा समावेश आहे.

आता व्हॉएजर-1 आंतरतारकीय भागात पोचलं म्हणजे काय? आपला सूर्य हा एक तारा आहे. त्याच्या ‘कुटुंबाचा’ विस्तार साधारण ‘किपर’ अशनी पट्टय़ापर्यंत किंवा त्यापुढच्या ‘उर्ट क्लाऊड’पर्यंत आहे. एखादं यान सौरमालेच्या परिघाबाहेर गेलं की ते आंतरतारकीय (इन्टरस्टेलर) अवकाशात गेलं असं म्हटलं जातं. व्हॉएजर-1 चं यश हे म्हणूनच फार महत्त्वाचं. ते लवकरच एका ‘प्रकाश-दिवसां’चा प्रवास पूर्ण करेल तेव्हा त्याचं ‘अभिनंदन’ करूच.

परंतु हे झालं कृत्रिम यान. जिथे (अजून तरी) कोणी प्रगत सजीव नाही अशा आंतरतारकीय क्षेत्रातून आपल्याकडे कोणी येतं का? हॉलीवूड-बॉलीवूडच्या सिनेमांमधून परताऱयाभोवतीचा (कुठल्या ते ठाऊक नसतं.) ग्रहावरून यानं आणि ‘ते’सुद्धा येतात. ‘एलियन’, ‘इन्डिपेन्डन्स डे’ कशाला अगदी ‘स्टार वॉर्स’पासून या काल्पनिक कथा प्रभावीपणे रंगवल्या जात आहेत. मात्र तसा खरोखरचा पुरावा आढळलेला नाही. अनेकदा मंगळावरच्या खडकांचे विविध नैसर्गिक प्रकार चित्रित करून तिथे एखादं ‘दार’ किंवा माणसाचा ‘चेहरा’ वगैरे ‘दाखवला’ जातो. हे म्हणजे पावसाळी ढगांमधल्या विविध भासमान आकारांसारखे किंवा चंद्रावरच्या ‘ससा’ आणि ‘हरिणा’सारखं…

कल्पनाशक्तीने काहीही अघटित क्षणात घडलं तरी सत्य वेगळं असू शकतं. तेव्हा आजवर तरी आपल्या जीवसृष्टीला ‘भेट’ द्यायला कोणी आलेलं नाही (यावर भरपूर वादही रंगले आहेत.)

एखादी अशनी किंवा धूमकेतूसारखी अवकाशीय वस्तू मात्र आंतरतारकीय जागेतून आपल्या सौरमालेच्या दिशेने येऊ शकते. मग आतापर्यंत अशा किती ‘वस्तूं’ची नोंद झालीय? त्यापैकी पहिल्या वहिल्या आंतरतारकीय वस्तुविषयी आपण याच स्तंभातून आधी वाचल्याचं आठवत असेल तर तो ‘ऑमुआमुआ’ हा अशनी होता. चिरूट किंवा ‘सिगार’च्या आकाराचा अशनी 19 ऑक्टोबर 2017 रोजी ‘सापडला.’ हवाई बेटावरच्या हेलिपॅला वेधशाळेतून या अशनीचा शोध ‘पॅन-स्टार-एस-1’ या दुर्बिणीने लावला. ‘ऑमुआमुआ’चा अर्थ प्रथम संदेश आणणारा. तोसुद्धा ‘अतिदूरचा’ प्रवास करून आलेला आणि ‘ओमुआमुआ’ खरोखरच 400 मीटर वस्तुमानाचा अशनी, तो लायरा किंवा स्वरमंडल या तारकासमूहातून सुमारे 25 प्रकाशवर्षांचा प्रवास करून आला होता. आता तो पेगॅसस किंवा महाश्व तारकासमूहात दाखल झाला आहे. ऑमुआमुआ सेपंदाला 87.3 किलोमीटर वेगाने प्रवास करतो. (पृथ्वी सूर्याभोवती सेकंदाला 30 किलोमीटर वेगाने फिरते.)

‘ऑमुआमुआ’ हा आपल्या सौरमालेजवळ येणारा पहिला आंतरतारकीय मानकरी. नंतरचे दोन म्हणजे 2/1/बोरिसॉन आणि 3-आय अॅटलास यापैकी बोटिसॉव हा धूमकेतू दुसरा आंतरतारकीय ‘विक्षिप्त’ मानला गेलेला पाहुणा. 29 ऑगस्ट 2019 या दिवशी तो क्रिमियातील अव्यावसायिक (अॅमेटर) खगोल अभ्यासक आणि दुर्बिण बनवणारे जेनेडी बॉरिसॉन यानी शोधून काढला. युव्रेनमधील ‘मार्गो’ वेधशाळेतून त्यांनी हे निरीक्षण केले. 657 दिवसांच्या निरीक्षणानंतर तो आंतरतारकीय असल्याचं निश्चित झालं. 28 डिसेंबर 2019 या दिवशी तो पृथ्वीजवळून गेला. तो पुन्हा येणार नाही. 2019 मध्ये त्याची ‘कक्षा’ आपल्या दिशेने येणारी होती. एरवी त्याच्या भ्रमणकक्षेची निश्चिती नसल्याने त्याला ‘विक्षिप्त’ म्हटलं गेलं. ‘नासा’च्या मते तो ताशी 177,000 किलोमीटर प्रवास करत लवकरच सूर्यमाला ओलांडून आंतरतारकीय ‘स्वगृही’ परत जाईल.

तिसरा आणि या वर्षारंभीच 1 जानेवारी 2025 रोजी आपल्या सूर्यमालेला भेट देणारा आंतरतारकीय ‘पाहुणा’ म्हणजे उ-आय-अॅटलासचा शोध ‘अॅटलस’ म्हणजे ‘अॅस्टेरॉइड टेलेस्ट्रिअल-इम्पॅक्ट लास्ट अॅलर्ट’ किंवा एखाद्या अशनीच्या आघाताचा अंतिम इशारा देणारा उपक्रम. त्यांनी शोधलेला हा अशनी आतापर्यंत आलेल्या इतर दोन आंतरतारकीय वस्तुंपेक्षा अधिक वेगवान म्हणजे सेकंदाला 60 किलोमीटर वेगाने ‘धावणारा’ आहे. तो 20 किलोमीटरपेक्षा जास्त आकाराचा असू शकतो आणि येत्या ऑक्टोबरमध्ये तो पृथ्वीपासून सुमारे 22 कोटी किलोमीटर अंतरावरून पसार होईल. त्यामुळे त्याचा पृथ्वीला धोका नाही, परंतु मंगळ आणि महाग्रह ‘गुरू’चं काय? 1994 मध्ये शूमेकर-लेव्ही-9 हा धूमकेतू तुकडे होऊन ‘गुरू’वर आदळला होता.

हे सगळं वाचून भयभीत होण्याचं कारण नाही. पृथ्वीच्या जन्मापासून असे अनेक धूमकेतू आणि अशनी आले असतील नि त्यांची संख्या लाखात भरेल. पृथ्वीवर जीवसृष्टी उत्क्रांत झाल्यावर साडेसहा कोटी वर्षांपूर्वी डायनॉसॉर प्रजातींचा विनाश अशाच एका धूमकेतूने (किंवा अशनीने) केला होता. त्यानंतर कोणी ‘आंतरतारकीय’ पाहुणा काम करून गेला याची नोंद असण्याची शक्यता नव्हती. आता ते अत्याधुनिक उपकरणांद्वारा समजू शकतं म्हणून काळजी करण्याऐवजी काळजी घेणंच अधिक योग्य. वैज्ञानिक तेच करतायत.