
>> स्पायडरमॅन
चीन आणि तिथली जनता हे एक वेगळेच रसायन आहे. सोशल मीडियावरदेखील आपल्या अजब कारनाम्यांमुळे चिनी जनता कायमच चर्चेत असते. सतत नवे नवे ऑप्लिकेशन बाजारात आणायचे अन् लोकांना त्यांच्या व्यसनात गुंतवायचे आणि बक्कळ पैसे कमवायचे हे चिनी कंपन्यांचे नेहमी यशस्वी ठरणारे धोरण आहे. त्यासाठी बऱयाचदा विविध देशांमधील कायद्यालादेखील शिंगावर घेण्याची या कंपन्यांची तयारी असते. मात्र जेव्हा चीनमध्येच या ऍप्सच्या मदतीने बेकायदा कृत्य केले जाते तेव्हा मात्र या कंपन्या फारच कडकपणे न्याय देतात.
अशीच एक घटना नुकतीच ‘कुआईशू’ या चिनी ऍपच्या बाबतीत घडली. ‘कुआईशू’ हे ट्विटरचे चिनी व्हर्जन आहे. चीनच्या ‘झेजियांग’ प्रांतात राहणारा ‘यीन शिहँग’ या ‘कुआईशू’ ऍपवर एक सेलिब्रिटी स्टार आहे. त्याला तिथे प्रचंड म्हणजे तब्बल 87 लाख एवढे लोक फॉलो करत असतात. या पठ्ठय़ाने स्वतःच्या खोटय़ा साखरपुडय़ाचे ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ करून या ऍपच्या मदतीने लोकांना गंडा घातला आणि बक्कळ आर्थिक फायदा पदरात पाडून घेतला. ही हेराफेरी उघड झाल्यावर आणि 2,30,000 एवढय़ा प्रचंड तक्रारी मिळाल्यानंतर ‘कुआईशू’ ऍपने ‘यीन शिहँग’वर 2,30,000 दिवसांची म्हणजेच 630 वर्षांची अजब बंदी जाहीर केली आहे.
या खोटय़ा खोटय़ा साखरपुडय़ाबद्दल आधी विविध पोस्ट टाकून ‘यीन शिहँग’ने लोकांत प्रचंड उत्सुकता निर्माण केली. त्यानंतर या सोहळ्याचे ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ सादर करताना ‘यीन शिहँग’ने आपल्यापेक्षा फक्त 2/3 वर्षांनी मोठय़ा दिसणाऱया इसमाला आपला बाप बनवून सादर केले. या खोटय़ा सोहळ्याच्या प्रदर्शनातून त्याने आपल्या चाहत्यांना भरपूर वस्तूदेखील विकल्या आणि त्याबद्दल उत्पादकांकडून कमिशन पदरात पाडून घेतले. हा सोहळा तब्बल पाच तास चालू होता. या खोटय़ा सोहळ्याच्या माध्यमातून जवळपास 52 करोड रुपये गैरमार्गाने कमावल्याचा आणि अश्लीलतेच्या प्रदर्शनाचा आरोप ‘यीन शिर्हॅग’वर आहे आणि त्यामुळेच ‘कुआईशू’ने त्याला बॅन केले आहे.




























































