आभाळमाया – ‘ऍनालेमा’ म्हणजे काय?

>> दिलीप जोशी

मकरसंक्रांत झाली. सूर्याचे उत्तरायण त्यापूर्वीच म्हणजे 21 डिसेंबर रोजी सुरू झाले. त्या दिवशी दिवसाचा काळ कमी आणि रात्र सर्वात मोठी होती. त्याच्या आधी आणि नंतरच्या पाच-सात दिवसांत आपल्याला फारसा फरक जाणवत नाही, परंतु सणवारांमुळे तिथीनुसार चंद्रकला आणि संक्रांतीच्या एकमेव सौर सणामुळे दिवस-रात्रीचे गणित सामान्य लोकांनाही आपल्याकडे जाणवत होते. त्यामागचे वैज्ञानिक कारण मात्र त्या काळात ठाऊक असेलच असे नाही, पण संक्रांतीला ‘घोडय़ावर स्वार’ झालेला सूर्य रथसप्तमीला रथावर आरूढ होतो आणि दिवस अधिकाधिक मोठा झालेला दिसतो, अशा संकल्पनांमधून सूर्याचे न चालताही चालणे लोकांना समजत होते.

आता त्यामागचे खगोल विज्ञान अनेकांना माहीत झाले आहे. 365 दिवसांत सूर्याभोवती परिक्रमा करणारा आपला पृथ्वी नावाचा ग्रह, सेकंदाला तीस किलोमीटर एवढय़ा वेगाने सूर्याभोवती फिरत असतो. या काळात पृथ्वी 94 कोटी किलोमीटर अंतर पार करते. गेली साडेचार अब्ज वर्षे पृथ्वीचे हे भ्रमण अव्याहत सुरू आहे.

आपल्या या ग्रहावर प्रचंड जलसाठे तयार होऊन तो नील ग्रह (ब्लू प्लॅनेट) झाला आणि त्यानंतर आधी शेवाळ, सागरी वनस्पती, मग जलचर, उभयचर, भूचर आणि पक्षी अशी सृष्टी विकसित झाली. आपली सध्याच्या माणसांची ‘सेवियन’ प्रजा त्यामानाने खूप उशिरा पृथ्वीवर अवतरली. बुद्धीच्या जोरावर माणसाने आधी पृथ्वीवर अधिराज्य निर्माण केले आणि आता तो अंतराळही पादाक्रांत करायला सज्ज झालेला आहे. चंद्र तर आपल्या आवारात असल्यासारखाच, पण सूर्यही फार दूरचा राहिलेला नाही.

ज्या सूर्यामुळे आपल्या ग्रहावर जीवन निर्माण झाले तो आपला जनक तारा रोज आपल्याला दर्शन देतो, मात्र त्याचे बारकाईने निरीक्षण करीत राहिले तर त्याची रोजची, उगवतीची आणि मावळतीची जागा वेगवेगळी दिसते. तसेच काही वेळा दिवस मोठा आणि रात्र लहान (21 जून) दिवस-रात्र समान (21 मार्च व 21 सप्टेंबर) आणि दिवस लहान, रात्र मोठी (21 डिसेंबर) असे अवकाशी विभ्रम आपण अनुभवतो.

पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशांनी कललेला आहे. ती सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. या गोष्टी तर आता शालेय अभ्यासक्रमातूनच समजतात.

सूर्याच्या या भासमान भ्रमणाचा संपूर्ण वर्षाचा फोटो घेतला तर तो मार्ग इंग्लिश ‘8’ (आठ) असल्यासारखा दिसतो. त्यालाच ऍनालेमा असे म्हणतात. खगोल मंडळातील ‘ऍनालेमा’चे अभ्यासक अमेय गोखले सांगतात की, पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची लंबवर्तुळाकार कक्षा आणि आपल्या या ग्रहाचा कललेला अक्ष या दोन गोष्टींमुळे आपल्या सूर्याच्या उगवती-मावळीतीची जागा हळूहळू बदललेली दिसते. एखाद्या मोकळय़ा मैदानात, जिथे बाराही महिने सूर्यप्रकाश येत असेल तिथे एखादा खांब रोवला आणि त्याच्या रोजच्या सावलीच्या टोकाचे बिंदू नोंदवून ठेवले तर एका वर्षाने सूर्याचे भासमान भ्रमण इंग्रजी ’8’ आकडय़ासारखे दिसेल.

हा प्रयोग करता येण्यासारखा सोपा आहे. मैदानात किंवा इमारतीच्या वरच्या भागात अशा खांब किंवा काठीने ऍनालेमा (Analenema) मिळवता येईल. त्यासाठी त्या जागी वर्षभर कोणत्याही अडथळय़ाविना ऊन मात्र असायला हवे. आपल्याकडे मे महिन्याच्या अखेरपासून, साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत ढगाळ वातावरण अथवा पाऊसच असतो. तेव्हा ‘ऍनालेमा’ चितारण्यात त्याचा व्यत्यय येऊ शकतो. राजस्थानच्या सपाट वाळवंटी प्रदेशात ‘ऍनालेमा’ मिळवणे शक्य आहे.

अशा साध्या, सोप्या प्रयोगातून आपण कोणालाही खगोल अभ्यासासारखा एरवी क्लिष्ट वाटणारा विषय समजावून सांगू शकतो. ‘ऍनालेमा’चा फोटो घ्यायचा तर वर्षभर एकाच जागेवरून सूर्याचे भ्रमण टिपता आले पाहिजे. तेसुद्धा एका ठरावीक वेळेला. त्याचे इंग्लिश ’8’ च्या आकाराचे चित्र येण्याचे कारण आपण वर्तुळाकार घडय़ाळातील वेळेनुसार फोटो काढणार आणि घडय़ाळाच्या व सूर्याच्या गतीमधला फरक तसाच राहणार. सन डायल किंवा प्राचीन सौर घडय़ाळात मात्र तबकडीवर पृथ्वीच्या अक्षाइतकी कललेली उभी धातूची पट्टी असते. त्यामुळे सौर घडय़ाळ योग्य वेळ दाखवते. ते आपल्या ‘स्टॅण्डर्ड’ वेळेशी ताडून वेळ सांगता येते. जयपूर, उज्जैन वगैरे ठिकाणच्या ‘जंतरमंतर’मध्ये अशी अनेक प्राचीन यंत्रे आहेत. त्याविषयी पुन्हा केव्हातरी.

आपली प्रतिक्रिया द्या