प्रासंगिक – यशवंतराव मोहिते- विकास आणि सामाजिक परिवर्तनाचे पुरस्कर्ते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. इंद्रजित मोहिते

आधुनिक विचारांचा महाराष्ट्र घडविण्यामध्ये व सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देण्यामध्ये मोलाचा हातभार लावलेले ज्येष्ठ विचारवंत, महाराष्ट्राचे माजी मंत्री यशवंतराव मोहिते तथा भाऊ यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांची आज (22 ऑगस्ट) पुण्यतिथी. यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी राज्याच्या सत्ताकारणात महत्त्वाची पदे भूषविली आणि त्याचा उपयोग महाराष्ट्राचा विकास आणि सामाजिक परिवर्तन करण्यासाठी केला. प्रामुख्याने ग्रामीण विकास आणि सहकार क्षेत्राचा विकास याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. सहकार खात्याचे मंत्री असताना श्वेतपत्रिकेद्वारे सहकाराची संपूर्ण रचना सुसंगत व व्यापक बनवण्याची संकल्पना त्यांनी आखली व छापीलस्वरूपी महाराष्ट्राला प्रदान केली. सहकारी गृहनिर्माण सोसायटय़ा, सहकारी इरिगेशन स्कीम, सहकारी सूतगिरण्या, यंत्रमाग, वस्त्राsद्योग, सहकारी बँका, सहकारी कोर्ट, सहकार आयुक्तालय या सर्वांच्या बरोबर बँका, पतपेढय़ा, डेअऱ्य़ा व इतर जोडधंद्याच्या सोसायटय़ा व सहकारी साखर कारखानदारी यामध्ये यशवंतराव मोहिते यांनी केलेली कामे अविस्मरणीय आहेत.

यशवंतराव मोहिते हे विद्वान, अजातशत्रू, उत्तम वक्ते, पुरोगामी, परिवर्तनवादी, प्रगतीशील, विज्ञानवादी, समतावादी, आधुनिक शिक्षणाची कास धरून चालणारे असे व्यक्तिमत्त्व होते. नवीन पिढीच्या विकासाला चालना देणारे होते. सहकार, शेतकरी, कष्टकरी, श्रमिक, शेतमजूर, श्रमजीवींसाठी ते समर्पित आयुष्य जगले. त्यांचा जन्म रेठरे बुद्रुक (ता. कराड, जि. सातारा) येथील गरीब कुटुंबात झाला. कर्जबाजारीपणा, सामंतवादी, सावकारशाही आणि जातीयवादाचा परिचय त्यांना बालपणीच झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स, अब्राहम लिंकन, महात्मा गांधी यांच्या विचारांचा पगडा यशवंतराव मोहिते यांच्यावर होता. त्यांनी दाभाडे प्रबंध व शेतकरी कामगार पक्षातून आपली राजकीय व सामाजिक वाटचाल सुरू केली.

1952 साली ते शेकापमधून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर काही महिन्यांतच कोयना धरण व संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा ठराव मांडला. कसेल त्याची जमीन व राहील त्याचे घर, कूळ कायद्यास राजकीय प्रवाहाविरोधात जाऊन पाठिंबा व चळवळ उभी केली. पुढे त्यांनी सहकार चळवळीच्या माध्यमातून कृष्णा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. 1960 साली पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत संयुक्त महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सामील होत त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

गृह, कृषी, गृहनिर्माण, राज्य परिवहन, अन्न-नागरी पुरवठा, सहकार, वित्त व नियोजन या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले. मुंबई अग्निशामक दल व होम गार्डचे एकत्रीकरण तसेच फेररचना, लष्कर भरती, सैनिक शाळांची निर्मिती केली. कृषीमंत्री असताना बी-बियाणे केंद्रे, हरित क्रांतीची प्रस्तावना, कृषी शैक्षणिक विकेंद्रीकरण केले. गृहनिर्माण खाते असताना मुंबईत गृहनिर्माण व घरदुरुस्ती कायदा तसेच गलिच्छ वस्ती सुधारणा कायदा केला. एसटी महामंडळाची फेररचना करून त्यास नवे रूप दिले. साखर उद्योग वृद्धिंगत करण्यासाठी आयुक्तालय, सहकार न्यायालय, संशोधन केंद्र व कापूस खरेदी, सूतगिरण्या, वस्त्राsद्योग, गृहनिर्माण सोसायटय़ा यांचे सहकाराच्या माध्यमातून जाळे निर्माण करण्यासाठी श्वेतपत्रिका व कायद्यात दुरुस्ती केली. विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्य़ांना दिलासा देण्यासाठी कापूस एकाधिकार योजना राबवली. 1984-85 मध्ये राजकीय जीवनातून निवृत्ती घेऊन पुन्हा रेठरे बुद्रुकला येऊन साधे शेतकऱ्य़ाचे आयुष्य ते जगले. ते तहहयात भारती विद्यापीठाचे अध्यक्ष राहिले.

सहकारी संस्थांच्या सभासदांची मालकी ही त्यांच्या पैशांतून निर्माण झालेल्या प्रत्येक संस्थेत कायम राहिली पाहिजे. सभासद हा मालक, सावकार, कुशल कामगार, प्रशासक व लाभधारक झालाच पाहिजे याचा त्यांनी कायम आग्रह धरला.

 शब्दांकन- गोरख तावरे