
>> विनायक
न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्याला शाळकरी वयापासून ठाऊक असतो. आपण पृथ्वीवर पाय रोवून उभं राहू शकतो यात आपलं कर्तृत्व काहीच नसतं. विराट अंतराळाचा एक भाग असलेल्या छोटय़ाशा सूर्यमालेतल्या लहानशा ग्रहावरचा आपला इवलासा जीव. पृथ्वीला गुरुत्वाकर्षण नसतं तर तो अस्तित्वातच आला नसता. कारण ‘जड’ जीवसृष्टी (वनस्पतींसकट) भूपृष्ठाशी जखडून ठेवण्याचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीमध्ये आहे आणि उंच उडवलेले कोणतेही पदार्थ चटकन खाली आणण्याचा तिचा ‘अवनी’ हा गुण आहे. म्हणूनच आपण अस्तित्वात आलो आणि तग धरू शकलो. अन्यथा अंतराळात भ्रमण करणाऱ्या अंतराळयात्रींना जेव्हा यानाबाहेर भ्रमण करण्याची संधी मिळते तेव्हाही त्यांची ‘नाळ’ यानाशी जोडूनच ठेवावी लागते. तसं केलं नाही तर ते विराटाकारात कुठेही भरकटत जातील. अगदी अशा यानांच्या आतसुद्धा गुरुत्वाकर्षण शून्यच असतं. म्हणून तर ते तिथल्या सगळय़ा वस्तूंसह तरंगताना दिसतात.
…पण पृथ्वीवरच्याच एखाद्या ठिकाणी कशामुळे तरी आपलं वजन शून्य झालं तर?… ते अगदीच शून्यावर आले तर पृथ्वीच्या गतीने आपण अवकाशात भिरकावले जाऊ. मात्र अशाच काही जागा भूपृष्ठावर आहेत असं म्हटलं जातं. तिथे गेलेल्यांचे अनुभव असं सांगतात की ‘त्या’ (विशिष्ट) ठिकाणी वजनरहित असल्याची अनुभूती येते. काय असेल त्यामागचे वैज्ञानिक इंगित? माहिती घ्यायचा प्रयत्न करूया.
गुरुत्वाकर्षणाच्या बळाने विश्वातील सगळय़ाच ‘जड’ (वस्तुमान असलेल्या) वस्तू परस्परांशी जखडलेल्या आहेत. आपली दीर्घिका इतर दीर्घिकांच्या गुरुत्वाकर्षणावर, सूर्यमाला आकाशगंगा दीर्घिकेच्या केंद्रावर आणि पृथ्वी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणावर अवलंबून आहे, तर आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे टिकून आहोत, परंतु या ग्रहावरच काही जागा विस्मयकारी आढळतात. अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील सॅन्टाक्रूज येथे 1939 मध्ये जॉर्ज प्रेथर या सर्वेक्षकाला एक ‘चमत्कारिक’ जागा सापडली. 1940 मध्ये त्याने ते जाहीर केले. त्याने म्हटले की, या परिसरात पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात काहीतरी ‘गडबड’ दिसते.
वजनरहित किंवा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध काही ‘गूढ’ वाटणारं घडतंय अशा पाच-सहा जागा पृथ्वीवर आहेत. त्यात तथ्य किती नि ते मिथ्या किती ते त्यातून पाहणे हे विज्ञान. कॅलिफोर्नियाप्रमाणेच अमेरिकेतील मिशिगन राज्यातही एक ‘मिस्टरी स्पॉट’ आहे. त्याचा ‘शोध’ 1950 मध्ये लागला. तिथे 300 चौरस फुटांची एक जागा अशी आहे की, गुरुत्वाकर्षण अतिशय कमी असल्याने तिरके उभे राहिलात तरी पडणार नाहीत. खुर्चीचे मागचे दोन ‘पाय’ आणि ‘पाठ’ जमिनीपासून उंच भिंतीवर टेकवली तरी त्या खुर्चीवर आरामात बसता येते म्हणे! तसे फोटोही उपलब्ध आहेत. तीच गोष्ट रॅपिड सिटीमधल्या ‘कॉस्मॉस एरिया’ची, परंतु अशा ठिकाणी फार वेळ राहणाऱ्यांना डोकेदुखीचा अनुभव येतो.
फ्लोरिडा राज्यातील स्पूक हिल (भूतटेकडी) या ठिकाणी तर उतारावर कार बंद केली की, ती उलट दिशेने चढणीवर आपोआप खेचली जाते. प्राचीन अमेरिकन आदिवासींना हे भयप्रद वाटलं आणि त्यांनी या जागेला ‘स्पूक हिल’ असं नाव दिलं. आपल्या देशातल्या लडाखमधल्या लेह येथे इंजिन बंद केलं तरी कार आपोआप वर जाते असा अनुभव देणारी जागा आहे. वैज्ञानिकांच्या मते यात गूढ वगैरे काही नसून पृथ्वीवर कमी गुरुत्वाकर्षणाच्या ज्या काही जागा आहेत त्यापैकीच या जागा असून सर्वसामान्यांना तो ‘चमत्कार’ वाटू शकतो. या ‘लो डेन्सिटी ग्रॅव्हिटी’ क्षीण गुरुत्वाकर्षण भागातले हे अनुभव विचित्र वाटतात. आमच्या एका (खगोल मंडळ) सभासदाने कॅलिफोर्नियातला असा अनुभव सांगितल्याचे आठवते.
यापेक्षा मोठा ‘लो डेन्सिटी ग्रॅव्हिटी होल’ आपल्या देशाच्या जवळच श्रीलंकेच्या थोडं खाली हिंदी महासागरात आहे. नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) हा ‘ओशन जिऑइड लो’चा परिसर सुमारे 30 लाख चौरस किलोमीटरचा असून त्याचं कारण असं म्हटलं जातं की, पृथ्वीच्या गर्भातील द्रवरूप मॅग्मावर जे घट्ट कवच असतं ते या भागात पातळ (थिन) असल्याने हिंदी महासागरातील या 328 फूट खोलीवर असलेल्या भागात गुरुत्वाकर्षण ‘ना के बराबर’ असतं. इथे हिंदी महासागराची खोली 106 मीटर होते. त्यामुळे निगेटिव्ह जिऑइड अॅनॉमली, नकारात्मक क्षेत्रीय अपवाद तयार होऊन गुरुत्वाकर्षण ‘शून्य’ भासते.
फ्रेंच खगोलशास्त्र्ाज्ञ पेकर एकदा एका परिषदेत भेटले होते. गप्पा करताना ते म्हणाले, “आपण विश्वात इतरत्र जीवसृष्टी कुठे असेल? त्याची विवंचना करतो ते ठीक, पण पृथ्वीवरची तरी सगळी रहस्यं आपल्याला कुठे उलगडली आहेत?’’ खरंच आहे ते, पण त्याची वैज्ञानिक उत्तरेच शोधायला हवीत हेही प्रगतीच्या दृष्टीने खरे आहे.


























































