लेख – झोजिला टनेलचे सामरिक महत्त्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

सध्या लडाखमध्ये एक रस्ता जम्मू-श्रीनगर -झोजिला खिंड -द्रास-कारगीलमधून लेहला पोहोचतो. हिमाचल प्रदेशमधून मनाली- खरदुंगलावरून दुसरा रस्ता लेहमध्ये पोहोचतो, परंतु तो फक्त पाच ते सहा महिने उघडा असतो. तोसुद्धा आता बारा महिने उघडा ठेवण्याकरिता काम सुरू झालेले आहे. हा रस्ता निर्माण झाला तर लडाखला जाण्याकरिता दोन बारमाही रस्ते मिळतील, जे सामरिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचे असेल. जी रस्ता क्रांती कश्मीर आणि लडाखमध्ये होत आहे, तिचा हिंदुस्थानी सैन्यदलाला प्रचंड लाभ होणार आहे.

श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग संरक्षणदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, अतिशय प्रतिकूल हवामान, बर्फवृष्टी आणि वारंवार कोसळणाऱया दरडी यामुळे हिवाळ्यात जवळपास 6-7 महिने हा महामार्ग पूर्णपणे बंद असतो. श्रीनगर-लेह महामार्गावरील ‘झोजिला पास’ येथे ‘झोजिला टनेल’चे काम सुरू आहे. या बोगद्यामुळे जम्मू-कश्मीर आणि लेह यांच्यादरम्यान वर्षभर वाहतूक सुरू राहणार आहे. हा बोगदा आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे. संरक्षणदृष्टय़ा अतिशय महत्त्वाच्या असलेल्या श्रीनगर-लेह महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या ‘झोजिला टनेल’च्या कामाची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय रस्ते बांधणी व महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी सोनमर्ग – बालटाल येथे ‘झोजिला टनेल’च्या वेस्ट पोर्टलला भेट देऊन केली. 2023 सालच्या डिसेंबरपूर्वीच या बोगद्याचे काम आता पूर्ण होणार आहे, त्यामुळे 2024 सालापासून श्रीनगर ते लेहदरम्यान वर्षभर वाहतूक सुरू ठेवणे शक्य होणार आहे.

जम्मू-कश्मीरसह लेह-लडाख यांचे भूराजकीय स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र, या प्रदेशामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासावर तर परिणाम झालाच, मात्र त्यासोबतच संरक्षणाकरिता अनेक अडचणी उभ्या राहिल्या. त्याचप्रमाणे हा पर्वतीय प्रदेश असल्याने बोगद्यांशिवाय येथे पर्याय नाही. त्यासाठी केंद्र सरकारतर्फे जम्मू-कश्मीरमध्ये 32 किमी लांबीचे 23, तर लेह- लडाखमध्ये 20 किमी लांबीचे 12 असे एकूण 52 किमीचे 32 बोगदे बांधण्यात येणार आहेत.

11 हजार फुटांहून अधिक उंचावर असणारा श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग जम्मू-कश्मीरच्या विकासासाठी आणि सामरिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा आहे. लेह-लडाखमध्ये हिंदुस्थानी सैन्याची वाहतूक करणे, सैन्य उपकरणांची वाहतूक करण्यासाठी हा एकमेव महामार्ग होता. प्रचंड बर्फवृष्टी. बर्फवृष्टी झाल्यानंतर या परिसराचा आणि उर्वरित देशांचा संपर्कच तुटतो. त्यामुळे लष्करीदृष्टय़ा अनेक अडचणी उभ्या राहतात. त्यासोबतच या महामार्गावरील सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम गावांचाही संपर्क तुटतो.

जम्मू-कश्मीरमधील पायाभूत विकासांची कामे धडाक्यात केली जात आहेत. अडीच लाख कोटी रुपये खर्चाची रस्ते विकासाची कामे 2023 च्या अखेपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले झेडमोड व झोजिला हे बोगदेही मुदतीआधी दोन वर्षे बांधून पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहेत.

‘झेडमोड ते झोजिला’दरम्यानच्या 18.475 किमीच्या महामार्गाचा विस्तार करण्यात येत आहे. दुसऱया भागामध्ये ‘झेडमोड टनेल’चा व 3.018 किमी महामार्गाचाही विस्तार करण्यात येणार आहे, तर 13.842 किमीचा भाग नव्याने विकसित करण्यात येत आहे. या भागामध्ये दोन ‘ट्विन टय़ूब टनेल’ असणार आहेत. यामध्ये प्रत्येकी 300 मीटर लांब असे पाच पूल असणार आहेत. बर्फवृष्टीमुळे निर्माण होणारे अडथळे टाळण्यासाठी 300 आणि 150 मीटर लांब ‘स्नो गॅलरी’ बांधण्यात येत आहे.

सध्या जम्मू-श्रीनगर तसेच लडाख यांना जोडणारे रस्ते विकासाचे सुमारे एक लाख कोटींचे प्रमुख सहा प्रकल्प सुरू असून आणखी एक लाख कोटी रुपयांचे प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहेत. दिल्ली-कटरा व पुढे श्रीनगर यांना जोडणाऱया रस्त्यामुळे कश्मीर खोऱयात आठ तासांमध्ये पोहोचता येईल. हा महामार्ग दिल्ली-मुंबई महामार्गाशी जोडला जाणार आहे. जम्मू-कश्मीरमध्ये सुमारे 320 किमीचे 20, तर लडाखमध्ये सुमारे 200 किमीच्या 11 बोगद्यांचे काम केले जात असून 1.40 लाख कोटी खर्च येणार आहे. 50 वर्षांत न झालेले काम दोन वर्षांत पूर्ण करण्यावर भर आहे.

जम्मू व कश्मीर तसेच लडाखमध्ये दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या तर दोन्ही केंद्रशासित प्रदेशांचा सामाजिक, आर्थिक विकास होईल. झोजिला प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बोगद्यातून 80 किमी प्रतितास या वेगाने वाहनांची वाहतूक होणार आहे. त्यामुळे पूर्वी घाटरस्त्याद्वारे लागणारा साडेतीन तासांचा वेळ आता सुरक्षित अशा बोगद्यातून केवळ 15 मिनिटांवर येणार आहे. या संपूर्ण क्षेत्रामध्ये पर्यटन विकासाच्या विपुल संधी उपलब्ध आहेत. केवळ त्यासाठी दळणवळणाची सोय आणि सुयोग्य नियोजनाची गरज आहे.