
फेसबुक आणि ऍपल या टेक विश्वातल्या दोन मातब्बर कंपन्यांमधील व्यापार युद्ध आता कंपनी पातळीवरून सीईओ पातळीवरती आणि त्यानंतर आता वैयक्तिक पातळीवरती आले आहे असे म्हणायला हरकत नाही. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने नुकताच आपल्या कंपनीतील अधिकारी वर्गासाठी एक आदेश काढला असून त्याद्वारे त्यांना आयफोन वापरण्यास सक्त मनाई केलेली आहे. अधिकारी आणि त्यांच्या मदतनिसांनी अँड्रॉइड सिस्टीम असलेल्या फोन्सचाच वापर करावा असे या आदेशात म्हटले आहे.
नुकत्याच MSNBC वाहिनीवरती झालेल्या ऍपलच्या सीईओ टीम कुकच्या मुलाखतीचा हा परिणाम असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या मुलाखतीत टीम कुकने फेसबुकच्या कारभारावरती सडकून टीका केली होती. टीम कुकने या आधीदेखील मार्च महिन्यात फेसबुकच्या कारभाराला लक्ष्य केले होते. फेसबुकच्या बाबतीत केंब्रिज एनालिटीकामुळे जे काही घडले आणि जगभरच्या फेसबुक यूजर्सचा डाटा जसा मोठ्या प्रमाणावरती हॅक झाला, तसा प्रकार जर ऍपलमध्ये घडला असता, तर तुम्ही काय केले असते? असा प्रश्न टीम कुक यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देताना टीम कुक म्हणाले, ‘की एकतर अशी परिस्थिती ऍपलमध्ये कधी उद्भवलीच नसती आणि उद्भवणार पण नाही. फेसबुक यूजर्सचा डाटा वापरून पैसे कमावते आणि ऍपल तसे कधीच करणार नाही हा यातला महत्त्वाचा फरक आहे.
फेसबुक आणि मार्क झुकरबर्गने टीम कुकच्या या विधानावरती तीव्र संताप व्यक्त केला होता आणि त्याची बाष्फळ अशा शब्दांत व्याख्या केली होती. आताही MSNBC ला दिलेल्या मुलाखतीत टीम कुकने ऍपलची पॉलिसी स्पष्ट करताना, ‘आम्ही तुमच्या वैयक्तिक बाबीत घुसत नाही. प्रायव्हसी म्हणजे मानवाचा हक्क आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो’ असे शब्द वापरले. त्याच वेळी त्याने फेसबुकच्या प्रायव्हसी पॉलिसीवरती मात्र पुन्हा एकदा टीका केली. फेसबुकने मात्र ही टीका म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवरची टीका असल्याचे म्हटले आहे.




























































