
>> नीलांबरी जोशी
सध्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर ट्रोलिंगची तुफान लाट आली आहे. तुमचं व्यक्त होणं असो वा वेगळी फॅशन करणं असो, हिणवणं ही असाधारण कला असल्याप्रमाणे लोक त्याचा उपयोग करताना दिसतात. थट्टा करणं व त्यातून आनंद मिळवणं हा प्रकार नवीन नाही परंतु त्याद्वारे छळ करणं म्हणजेच ट्रोलिंग.
अर्जुन कपूर-मलायका अरोरा यांचे खासगी आयुष्य असो किंवा सोनाक्षी सिन्हाचा लठ्ठपणा, आराध्याचा हात ऐश्वर्याने धरावा का नाही आणि रणबीर सिंगने कोणता ड्रेस घातला होता यावरून सगळे सेलिब्रिटी सतत ट्रोल होत असतात. त्यावर असंख्य मिम्सचा भडिमार होत असतो. एकमेकांची थट्टा करणे, त्यातून आनंद मिळवणे हा प्रकार कोणालाच नवीन नाही. पण याच थट्टेचे रूपांतर दुसऱयाचा शारीरिक, भावनिक, आर्थिक, बौद्धिक किंवा मानसिक छळ करण्यासाठी जेव्हा केला जातो तेव्हा ते ट्रोलिंग होते. ऑनलाइन कम्युनिटीवर विषयाला सोडून किंवा टवाळखोर विषारी विधाने करून लोकांना अस्वस्थ करणे किंवा भांडण पेटवून देणे म्हणजे ट्रोलिंग. वंश, वर्ण, धर्म आणि जात अशा विवादास्पद गोष्टींवरून सोशल मीडियावर सतत मजकूर आणि फोटो टाकणे असे प्रकारही ट्रोल्स करतच असतात. एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवणे किंवा उद्योगधंदा बंद पाडणे इथपासून समाजमाध्यमांमधल्या ग्रुप्सवर अस्वस्थता आणि असंतोष पसरवणे हे सगळे प्रकार ट्रोलिंगमध्ये चालतात. सोशल मीडियातल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांच्यासारख्या साईटस्, इंटरनेट, चॅट रूम्स, ई-मेल ग्रुप्स, ब्लॉग्ज सर्वत्र ट्रोल्स असतातच.
राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जर काही घडामोडी चालू असतील – उदाहरणार्थ, क्रिकेटची मॅच, निवडणुका आदी तर फेसबुकवर ट्रोलर्सना ऊत येतो. अनेक फेसबुक पेजेसवर तेव्हा शब्दांचं मुष्टियुद्ध रंगलेलं दिसतं. एखाद्या पोस्टवर कॉमेंट करताना होणाऱया विधानांना अंत नसतो. तिथे आपापली मते मांडून वेगळेपणा जपायचा सगळे प्रयत्न करत असतात. यात मूळ मुद्दा अनेकदा बाजूला पडतो. अर्थात कोणतेही विधान करणे हे ट्रोलिंग नव्हे. एखाद्याने अस्थानी, विषारी किंवा खुनशी विधान केले तर ट्रोलिंग सुरू होते. उदाहरणार्थ, त्या पोस्टकर्त्याच्या आईबद्दल किंवा धर्माबद्दल विधान करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, द्वेषकारक, अपमानकारक पोस्टस् किंवा कॉमेंटस् करणे, दुसऱयाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे आणि लोकांच्या बुद्धिमत्तेला आवाहन करण्यापेक्षा भावनांना हात घालणे हे ट्रोलिंगचे काही प्रकार आहेत. मच्छीमार आपल्या बोटीच्या मागे मासे पकडण्यासाठी पाण्यावर गळ (ट्रोल्स) लावतो त्यावरून ट्रोलिंग हा शब्द आला आहे. इंटरनेटच्या जगात आपल्या विधानरूपी गळाला माणसंरूपी मासे लागावेत अशी ट्रोलर्सची इच्छा असते.
आजमितीला जगाची लोकसंख्या 730 कोटी आहे आणि त्यापैकी 317 कोटी लोक इंटरनेट वापरतात. त्यांच्यापैकी 90 टक्के म्हणजे 286 कोटी लोक निरनिराळी समाजमाध्यमे वापरतात. थोडक्यात आपण, आपले मित्र, जाहिरातदार, अनेक व्यावसायिक, सेलिब्रिटीज, उत्पादक सगळेजण समाजमाध्यमे वापरत असतातच. त्यामुळे सगळय़ांनाच आणि विशेषतः मोबाईल जनरेशनला निश्चितपणे ट्रोलिंगला सामोरे जावे लागते.
सुरुवातीला ऑनलाइन चर्चांना भलतीकडेच वळवण्यासाठी विचित्र विधाने करणे इतपतच अर्थ ट्रोलिंगमध्ये मर्यादित होता. यानंतरच्या काळात इंटरनेटचे टप्पे बदलत गेले. ई-मेल्स, फोरम्सपुरत्या मर्यादित असलेल्या इंटरनेटच्या विश्वात ई-कॉमर्स आणि सोशल मीडिया यांनी प्रवेश केला. ई-कॉमर्समुळे एखाद्याची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करणं सहजसाध्य झाले. सोशल मीडियामुळे लोकांची वैयक्तिक माहिती नको इतक्या प्रमाणात इंटरनेटवर उपलब्ध झाली. त्यातून लोकांचा छळ करणाऱयांचे चांगलेच फावले. गेल्या 20 वर्षांत ट्रोल हा शब्द आणि प्रकार इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात फोफावला. ट्रोलिंगचे वेगवेगळे प्रकार तयार झाले.
काही ट्रोल्स फक्त दुसऱयाचा अपमान करायला टपलेले असतात. अपमानास्पद लिहिताना कोणाचा द्वेष करायला त्यांना कारणही लागत नाही. काही जणांना फक्त वाद घालण्यात रस असतो. हे लोक संशोधनाने सिद्ध झालेल्या, पुरावे असलेल्या अशा सत्य गोष्टींवर आधारित एखादी पोस्ट टाकतात. त्या पोस्टच्या मजकुराबाबत फक्त आपण कसे बरोबर आहोत आणि इतरांचा दृष्टिकोन कसा चुकीचा आहे ते दाखवण्यात त्यांना पराकोटीचा अभिमान वाटतो. काही जणांना वादात भाग घेताना विषय बाजूला ठेवून भलत्याच गोष्टीत सविस्तर माहिती सांगायची खुमखुमी येते. मग ते आपला एखादा अनुभव घेऊन भलामोठा लेख कॉमेंटमध्ये लिहितात. त्यात कधी खोटी माहिती पण दडपलेली असते. आपल्याबद्दलची माहिती इतरांना ऐकायची असो वा नसो, ते लिहित राहतात.
काही ट्रोल्स दुसऱयांच्या व्याकरणातल्या चुका दाखवण्यात कुशल असतात. मजकूर इंग्रजीत असेल तर ते तत्काळ स्पेलिंग दुरुस्त करतात. तसेच पोस्टचा मुद्दा काय आहे हे पाहण्यापेक्षा केलेली शब्दयोजना कशी चुकीची आहे यावरून ते लिहिणाऱयाचा अपमान करतात.
अर्थात हे करणारे सगळे घातक ट्रोल्स नसतात. यापैकी काही जणांकडे तरी गंमत म्हणून पाहता येते. मग ट्रोल्स ओळखावेत कसे? एक तर आपल्या पोस्टवर कोणीही केलेल्या कॉमेंटमधले काही खरे आहे का ते तपासावे. फक्त द्वेषमूलक, कशावर तरी राग काढण्यासाठी, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून किंवा वैयक्तिक वैमनस्यातून कॉमेंट आली असेल तर ते ट्रोलिंग असते. तुम्ही तुमच्या पोस्टमधल्या चुकीबद्दल क्षमा मागितली तर त्यावरून उठलेले वादळ सरळपणे वागणाऱया माणसांसाठी थांबू शकतं, पण ट्रोल मात्र सहजासहजी थांबत नाही. ट्रोलर्सना समस्या सोडवण्यात रस नसतोच. त्यांना भांडणे, वाद उकरायचे असतात. शाब्दिक लढाई चालू राहील यावर त्यांचा भर असतो. त्यांच्याकडून सकारात्मक तडतोड शक्य नसते.
ट्रोल्सच्या बाबतीत महत्त्वाचं म्हणजे बुद्धी किंवा तर्कनिष्ठता न वापरता ते तुमच्या भावनांना हात घालतात. शक्यतो तुम्हाला राग येईल अशी भाषा वापरतात. ट्रोल्सचा ईगो प्रचंड वाढलेला असतो. जग फक्त आपल्याभोवतीच फिरते असे समजून ते बोलत असतात. एकूणच आविर्भाव मी कसा शहाणा असाच असतो. ट्रोल्सना गोष्टी असतात त्याच्या दसपट वाढवून सांगण्यात रस असतो. तुमची पोस्ट किंवा कॉमेंट यांचा रोख कशावरही नसला तरी ट्रोल्स प्रत्येक गोष्ट वैयक्तिक पातळीवर ओढवून घेतात. त्यांच्या लिखाणात विचारपूर्वक वापरलेली पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम अशी चिन्हे सहसा नसतात. याउलट जास्त करून ते उद्गारवाचक चिन्हे वापरतात. रोमन लिपीत लिहिले असेल तर सगळी अक्षरे कॅपिटलमध्ये किंवा मजकूर बोल्ड करतात. आयुष्यात जसे आपण काही एटिकेटस् पाळतो तसे अशा वेळी शांत राहणे हा एकमेव ‘नेटिकेट’ असतो.































































