विशेष – बेबी फूड व हेल्थ ड्रिंक्सचे घातक परिणाम 

>> अर्चना रायरीकर

सहा महिन्यानंतरच्या मुलांसाठी पूरक आहार म्हणून कृत्रिम, तयार डबाबंद अन्न म्हणजेच विशेषत पावडर यांचा अंतर्भाव गेल्या काही दशकांत सुरू झाला. या तयार उत्पादनांबाबत कायमच साशंकता असली तरी आता नव्याने काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या उत्पादनांमध्ये साखरेचा जास्त प्रमाणात अंतर्भाव केला जातो असे एका सर्वेक्षण अहवालाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. सोबतच आशियाआफ्रिका भागातील या उत्पादनांमध्ये साखरेचे हे प्रमाण जास्त असून अमेरिका, युरोप भागातील उत्पादनांमध्ये मात्र हेच प्रमाण कमी असते असेही या सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुळात सहा महिन्यानंतरच्या बालकांसाठी आहाराचे मूलभूत नियम असताना त्यांना डबाबंद अन्न देणं कितपत योग्य आहे यावरही चर्चा होणे गरजेचे आहे

पल्या मुलांचे चांगले पालन पोषण करावे, मुलांना उत्तम पोषण द्यावे असे कोणाला वाटणार नाही? बरेचदा पालक याबद्दल खूप जागरूक असतात. वैद्यकीय शास्त्र असे सांगते की, मातेचे दूध हे बाळासाठी सर्वश्रेष्ठ असे अन्न आहे. मुलांच्या पचनासाठी ते योग्य आहेच, परंतु त्याचे तापमानदेखील मुलांना योग्य असते. तसेच त्याच्यामधल्या चिकातून मुलांना रोगप्रतिकारक घटक मिळत असतात. कमीत कमी सहा महिने तरी बाळाला अंगावर पाजणे हे गरजेचे आहे, परंतु त्याच्या पुढे जाऊन दीड दोन वर्षेदेखील बाळाला अंगावर पाजता येते.

मानवी दुधामध्ये 3 ते 5 टक्के चरबी, 0.8 ते 0.9 टक्के प्रथिने, 6.9 ते 7.2 टक्के कार्बोहायड्रेट लॅक्टोज आणि 0.2 टक्के खनिज घटक असतात. ऊर्जा  प्रती 100 मिलीलिटरमध्ये 60-75 किला कॅलरी इतकी आहे. कोलोस्ट्रममध्ये प्रथिनांचे प्रमाण लक्षणीयरीत्या जास्त असते आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते.

मुले वाढतात तसे मुलांना आईचे दूध पुरेनासे होते. पुढे मुलांना घरचे पूरक पदार्थ स्तनपानाबरोबर थोडे थोडे चालू करता येतात. साधारण वर्षभरातच मूल घरातील सगळे पदार्थ खाऊ शकते ( मसालेदार आणि तेलकट सोडून). त्यातून अजून दोन गोष्टी आपल्या सोयीच्या ठरतात ते म्हणजे मातेचे दूध बाळाला कधीही कुठेही आणि केव्हाही देता येते. त्याला कुठलीही पूर्वतयारी आवश्यक नसते. त्याचप्रमाणे त्याला कुठलाही खर्च नसतो. त्यातून मातेचे आणि बाळाचे एक आपुलकीचे नाते तयार होते. शिवाय हे मातेच्या आरोग्यासाठीदेखील चांगले असते. इतकी काही नैसर्गिक सोय असताना कधी कधी अशी वेळ येते, मुलांना आईच्या दुधाऐवजी बाहेरचे काही पदार्थ सुचवले जातात.

याची अनेक कारणे असू शकतात. काही मुलांना भूक जास्त लागते, आईच्या दुधाने पोट भरत नाही किंवा आईचे दूध त्यांना पुरत नाही. कधी आईची तब्येत ठीक नसते किंवा मुलांना आईचे दूध ओढायला प्रॉब्लेम असतो. क्वचित त्यांना ते पचतदेखील नाही. अशा वेळेला पर्याय म्हणून बाजारातली पावडर सुचवली जाते. जेणेकरून मुलांचे पोट भरेल आणि त्यांची वाढदेखील चांगली होईल.

परंतु इकडे एक गोष्ट लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे की, अगदी अपवादात्मक उदाहरणे वगळता अशा प्रकारची पावडर घेणे हे योग्य नाही. बऱ्याच लोकांना हे कळत नाही आणि केवळ सोय म्हणून किंवा मुलांना सवय लागली म्हणून अशा प्रकारच्या पावडरचा खूप जास्त वापर केला जातो. तसेच या बेबी फूड बनवणाऱ्या कंपन्या आपले उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचावे म्हणून जाहिरातबाजी करतात. बरेचदा या मार्केटिंगचा परिणाम म्हणून गरज नसताना ही उत्पादने पालकांच्या आणि मुलांच्या गळी उतरवली जातात.

काही दिवसांपूर्वी एका नवीन अहवालातून असे समोर आले आहे की, जगातील सर्वात मोठय़ा बेबी फॉर्म्युल्याचा उत्पादक हिंदुस्थानात आणि इतर आशियाई आणि आफ्रिकन देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या लहान मुलांचे दूध आणि तृणधान्य उत्पादनांमध्ये ( जसे की तांदूळ ) खूप जास्त साखर टाकत आहे. खरे तर लहान मुलांना साखर देण्याची गरज नसते. आपण मुलांना जे काही इतर पदार्थ देत असतो, जसे की भाताची पेज, मुगाचे सूप, नाचणी सत्त्व, भाजी सूप, फळांचे गरगट, त्यात नैसर्गिक साखर असते. त्यामुळे अशा प्रकारच्या अन्न पदार्थांमध्ये अशी जास्तीची साखर टाकणे गरजेचे नाही.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मोठय़ा कंपन्या मुख्य युरोपियन बाजारपेठांमध्ये लहान मुलांसाठी फॉर्म्युलामध्ये साखर घालत नाहीत. आता ही साखर घातल्यावर काय होते, तर अर्थातच पदार्थाचे वजन वाढते आणि त्यात नफा जास्त मिळू शकतो.

संशोधकांना असे आढळून आले की, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिकेतील सहा महिने आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांसाठी तयार तृणधान्यांमध्ये प्रत्येक सर्व्हिंगसाठी सहा ग्रॅम साखर असते. स्वित्झर्लंडमध्ये विकल्या गेलेल्या त्याच उत्पादनात साखर नव्हती. हिंदुस्थानात विकल्या जाणाऱ्या बेबी फूड्स उत्पादनांवरील चाचण्यांमध्ये प्रत्येक सर्व्हिंगसाठी सरासरी 2.7 ग्रॅमपेक्षा जास्त साखर आढळली. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सनेदेखील (NCPCR) अहवालाची दखल घेतली आणि FSSAI ला (फूड सेफ्टी स्टँडर्ड्स आथॉरिटी ऑफ इंडिया) नोटीस बजावली. FSSAI याची पडताळणी करत आहे आणि हा अहवाल शास्त्रज्ञांच्या समितीपुढे मांडला जाईल.

याचे दुष्परिणाम काय आहेत ते बघा 

जगभरातील देशांमध्ये लठ्ठपणा हे एक प्रमुख सार्वजनिक आरोग्य आव्हान आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार (WHO), 2000 पासून पाच वर्षांखालील अधिक वजन असलेल्या मुलांची संख्या जवळपास 23 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये हिंदुस्थानात 5 ते 19 वयोगटांतील 12.5 दशलक्ष मुलांचे (7.3 दशलक्ष मुले आणि 5.2 दशलक्ष मुली) जास्त वजन होते, जे 1990 मध्ये 0.4 दशलक्ष होते. अलीकडील लॅन्सेट अहवालानुसार, जागतिक स्तरावर एक अब्जाहून अधिक लोक लठ्ठपणासह जगत आहेत.

हिंदुस्थानात बालरोगतज्ञ शिशू दोन वर्षांचे होईपर्यंत साखर न देण्याची शिफारस करतात. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) शिफारस केली आहे की, एकूण ऊर्जेच्या 5 ते 7 टक्क्यांपेक्षा साखर जास्त नसावी. वजन वाढणे आणि दात किडणे यांसारख्या जोखमींमुळे चार वर्षांखालील मुलांनी अतिरिक्त साखर असलेले अन्न टाळले पाहिजे. अमेरिकेतदेखील सरकारची मार्गदर्शक तत्त्वे दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी साखरेचे पदार्थ आणि पेये टाळण्याची शिफारस करतात.

दुसरीकडे, या कंपनीने एक पत्रक काढून म्हटले आहे की, आम्ही आमच्या उत्पादनांचे वेळोवेळी पुनरावलोकन करत असतो. गेल्या पाच वर्षांत आम्ही आमच्या उत्पादनांमधली त्यांच्या प्रकारांनुसार असणारी साखर 30 टक्क्यांनी कमी केली आहे. मुंबईचे डॉक्टर म्हणतात, लहान बाळांना नैसर्गिकरीत्या चवीचे आकलन नसते. जर त्यांना सुरुवातीपासूनच साखरेची सवय लागली तर मग त्यांना चटक लागते. वयानुसार ही साखरेची चटक वाढत जाते. मग अशी मुले नेहमीच भाजी-पोळी, वरणभात असे जेवण जेवायला नाही म्हणतात. तुम्हाला असे अनेक पालक दिसतील जे म्हणतात की, आमची मुले जेवत नाहीत. ज्यूस, मिल्क शेक, चॉकलेटवर पोट भरतात. अतिरिक्त साखर लहान मुलांच्या पोटात गेली तर ते आाढमक होतात, चिडचिड करतात आणि इतर अनेक दुष्परिणामांना त्यांना सामोरे जावे लागते.

केवळ बेबी फूड्समध्येच नाही, तर हेल्थ ड्रिंक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पावडरींमध्येदेखील खूप साखर असते. तुम्ही अनेक हेल्थ डिंक जाहिरातीच्या जिंगल्स ऐकल्या असतील. अमुक पावडर पिऊन मी उंच होणार किंवा ताकदवान होणार किंवा बुद्धय़ांक वाढणार वगैरे वगैरे.

या जाहिराती अत्यंत आकर्षक असतात आणि त्यांनी संपूर्ण पिढीला हे पटवून दिले आहे की, ही दुधात घातलेली पावडरयुक्त पेये मुलांच्या पोषण आणि आरोग्यामध्ये चमत्कार घडवू शकतात. तथापि यावरही आता लक्ष वेधले गेल्यामुळे आरोग्याचे हे दावे त्वरित कमी होत आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) अलीकडेच एक निर्देश जारी केला आहे, ज्यामुळे हिंदुस्थानातील हेल्थ ड्रिंक उत्पादक अनेक आरोग्य पेयांमधून ‘आरोग्य’ लेबल वगळण्याचा विचार करत आहेत.

5 ते 16 वयोगटातील मुले वेगाने वाढतात आणि या काळात त्यांना नियमित जेवण, निरोगी स्नॅक्स आणि भरपूर द्रव पदार्थांची आवश्यकता भासते. मात्र हिंदुस्थानसमोर एक विचित्र समस्या कायम आहे. आपल्या देशातील जवळपास निम्म्या मुलांना चांगले पोषण मिळत नाही आणि काहींचा विकास खुंटला आहे. खरे तर ही समस्या एकेकाळी इतकी व्यापक होती की, त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी प्रभावीपणे मोठी बाजारपेठ निर्माण झाली. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नेहमीच्या आहारात पूरक म्हणून दुधात पावडर घालून ते दूध मुलाला दिले तर मुलांची वाढ योग्य होईल, असा समज निर्माण करण्यात आला. हा ट्रेंड त्वरित पकडला गेला आणि अनेक खेळाडूंनी या पावडरींचे समर्थन करणाऱ्या जाहिराती केल्या. त्यातून संदेश असे दिले गेले की, अशी पेये तुमच्या मुलांना दुप्पट वेगाने वाढण्यास मदत करू शकतात. मुलांना ही पेये आवडतात. कारण ती साखरयुक्त असतात. परंतु पॅकेजिंगवर असे काहीही नमूद केलेले नसते, जे संभाव्य मातांना अतिरिक्त साखर खाल्ल्याने होणारे नुकसान सांगते. जबाबदारी ग्राहकांवर आहे. जर ग्राहकांनी लक्ष दिले नाही तर ‘पौष्टिक पेय’ उत्पादन करणारी मंडळी त्याच उत्पादनांची पी सुरू ठेवतील. कदाचित फक्त तुम्हीच ठरवू शकता की, तुमच्या मुलांसाठी काय चांगले आहे. एक गोष्ट चांगली झाली आहे की, ही जागृती आल्याने अनेक उत्पादकांनी आपल्या हेल्थ ड्रिंकमधील साखर कमी करायला सुरुवात केली आहे. त्याला ‘हेल्थ ड्रिंक’ म्हणायचे नाही तसेच आरोग्याबाबत खोटे दावेही न करण्याचे सकारात्मक बदल होणार आहेत.

[email protected]
(लेखिका आहार तज्ञ आहेत.)