
>> मिलिंद देखणे
महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग मंडळाची पहिली एसटी बस नगरच्या माळीवाडा भागातून पुण्यापर्यंत 1 जून 1948 रोजी धावली होती. त्या बसचे पहिले चालक किसन राऊत आणि पहिले वाहक होते लक्ष्मण केवटे. हे दोघेही नगर जिह्यातीलच होते. एसटीचे पहिले वाहक असलेल्या लक्ष्मण केवटे यांचं नुकतेच वृद्धापकाळानं निधन झालं.
नगरमध्ये एसटीचा प्रवास व्यवस्थितरीत्या सुखकर कसा व्हावा या उद्देशाने त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी सर्वसामान्य जनतेला सेवा दिली. ग्रामीण भागामध्ये त्या वेळेला शिक्षणाची म्हणावी अशी सोय नव्हती. अत्यंत गरीब कुटुंबातील केवटे हे कुटुंब होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळायची या उद्देशाने त्यांनी लहानपणापासूनच मनाशी खूणगाठ बांधून आपल्याला शहरामध्ये काम करायला जायचे असे ध्येय ठेवले व त्यादृष्टीने त्यांनी ग्रामीण भागामध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते नगर शहराकडे आले व पुढचे शिक्षण त्यांनी नगरमध्ये घेतले. त्या काळी नुकतीच एसटी महामंडळाची बस सेवा सुरू होणार असे समजले होते. आपणसुद्धा या सेवेमध्ये सामील व्हावे या उद्देशाने त्यांनी प्रयत्न सुरू केले व त्यांना त्यामध्ये यश आले. एसटीचा सुखकर प्रवास हा सगळय़ांना मिळावा हे ब्रीद घेऊन त्यांनी त्या काळी ग्रामीण भागामधील जोडलेली नाळ व एसटीची नवी ओळख कशा पद्धतीने होईल या उद्देशाने वाहक पदावर काम सुरू केले.
अतिशय जिद्दी, मेहनती व कष्टाळू म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती. आपल्याला या माध्यमातून जनतेची सेवासुद्धा करता येईल व ग्रामीण भागातील मुलांना शहराकडेसुद्धा या माध्यमातून आणता येईल असा निश्चयसुद्धा त्यांनी केला होता. त्यांना सामाजिक कार्याचीसुद्धा मोठी आवड होती व ग्रामीण भागामध्ये त्यांनी अनेक उपक्रम त्या काळी राबवलेले होते. अतिशय कष्टाळू जीवन ते जगले. लक्ष्मण केवटे हे नगर ते पुणे या बसचे पहिले वाहक होते. लक्ष्मण केवटे ज्या वेळी महामंडळात भरती झाले, तेव्हा त्यांना 80 रुपये पगार मिळत होता. पुढे त्यांना 150 रुपयांपर्यंत पगार मिळू लागला होता. नगर ते पुणे या अंतरासाठी पहिल्या बसचं भाडं हे अडीच रुपये होते. साधारणपणे नगर ते पुणे हे अंतर सव्वाशे किलोमीटर होते. बस स्थानकातून बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक उभे होते. नागरिकांनी बसचे पूजनदेखील केले होते. 1948 साली महाराष्ट्रात सुरू झालेल्या एसटीचे पहिले वाहक म्हणून सेवा बजावणारे लक्ष्मण केवटे यांनी एसटी महामंडळाच्या सेवेत मोलाचे कार्य केले आहे. त्यांची अलौकिक सेवा सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. महाराष्ट्रात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या एसटी सेवेने असंख्य प्रवाशांना आपलेसे केले आहे.
ग्रामीण भागामध्ये सर्वत्र शिक्षणाचे दारे उघडली पाहिजेत व प्रत्येकाने शिकले पाहिजे असे सांगून त्यांनी ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी एसटीची सेवा कशा पद्धतीने वाढवता येईल याकरिता पुढाकार घेतला. ग्रामीण भागामध्ये एसटीचे महत्त्व काय आहे व ही आपली कशा पद्धतीने जननी आहे हे सर्वांना कळले पाहिजे, अशी भावना त्यांच्या मनामध्ये सातत्याने होती. या एसटीच्या प्रवासाची महाराष्ट्रात सुरुवात करणाऱ्या लक्ष्मण केवटेंचा जीवनप्रवास जरी थांबला असला तरी एसटीच्या इतिहासात त्यांच्या कार्याची दखल कायमस्वरूपी घेतली जाईल. एसटीच्या जन्माची कहाणी ज्यांच्या तोंडून आपण ऐकली, ती शक्ती आज अनंतात विलीन झाली. एसटी महामंडळाच्या आपल्या कार्यकाळामध्ये केवटे यांनी अतिशय चांगल्या प्रकारची सेवा केल्याबद्दल त्यांना वेगवेगळय़ा पद्धतीने गौरवण्यातसुद्धा आलेले होते. अतिशय चांगले संबंध त्यांनी या महामंडळाच्या माध्यमातून जनसामान्यांशी जोडले होते.


























































