ठसा – शांता तांबे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

मराठी  रंगभूमी आणि मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ पाहिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांनी कोल्हापूर (करवीर नगरी) येथे अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूरच्या सावली केअर सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने एका सुवर्णयुगाचा साक्षीदार आपण गमावला आहे. मराठी नाटकापासून त्यांनी आपल्या अभिनयाचा श्रीगणेशा केला आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार, कसदार अभिनयाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या प्रवासात त्यांना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने यांच्यासारखे दिग्दर्शक लाभले.

मोहित्यांची मंजुळा, सवाल माझा ऐका, आई पाहिजे, बाई मोठी भाग्याची, मोलकरीण, दोन बायका फजिती ऐका, पाटलांची सून, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाडय़ा, चंदनाची चोळी, मुंबईचा फौजदार, खुर्चीसम्राट, सासरचं धोतर अशा शंभरहून अधिक मराठी चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी आपल्या भूमिकांतून प्रेमळ सासूची भूमिका केली तशी कजाग आणि खाष्ट सासूची भूमिका करून  त्यात असे काही ठसकेबाज खलनायिकेचे रंग भरले की, रसिक प्रेक्षकांची त्यांच्या अभिनयास भरभरून दाद मिळाली. ‘पाटलांची सून’ या चित्रपटातील त्यांची खाष्ट सासूची भूमिका पाहून एका प्रेक्षकाने पडद्यावर चप्पल फेकून मारून आपला संताप व्यक्त केला होता याविषयीची आठवण शांताबाईंनी आपल्या एका मुलाखतीत सांगून अशी प्रतिक्रिया येणे म्हणजे यशाची पोचपावती असल्याचे आवर्जून नमूद केले होते. त्या रस्त्यात दिसल्या की, ‘‘हीच ती बाई, जिने सुनेला खूप छळले होते,’’ अशाही प्रतिक्रिया त्यांच्या अभिनयाच्या बाबतीत उमटत असत, ऐकायला मिळत असत. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्या काळचे कथानक वेगळे होते, आताचे वेगळे आहे. त्या काळी मला चांगले दिग्दर्शक मिळाले असल्याने चांगला अभिनय करता आला.

शांताबाईंचे माहेर सोलापूर जिह्यातील बार्शी. विवाहानंतर त्या कोल्हापुरात आल्या. तेथील देशबंधू संगीत मंडळीत दोन-चार महिने काम केले. तेथील वास्तव्यात त्यांना अनेक चांगली माणसं भेटली, अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मात्र घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्याने त्यांनी चित्रपटात काम करण्याचे ठरवले. या सुरुवातीच्या प्रवासात त्यांना चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, दिनकर पाटील, अनंत माने यांच्यासारखे दिग्गज दिग्दर्शक भेटले. तेव्हापासून सुरू झालेला प्रवास सात दशकं सुरूच होता. अ. भा. चित्रपट महामंडळाने त्यांच्या कार्याची नोंद घेऊन पुरस्काराने सन्मानित केले. ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांच्यासमवेत त्यांनी ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या नाटकात भूमिका केली होती, तर ‘झी’च्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत त्यांनी छोटी भूमिका केली होती. तीच त्यांची शेवटची भूमिका ठरली. पडद्यावर शांताबाई खाष्ट सासू असल्या तरी प्रत्यक्षात त्या अतिशय प्रेमळ स्वभावाच्या व सर्वांना आपलेसे करणाऱ्या होत्या.